Vidhan Sabha 2019 : 'भाजप'ने केली 'रासप'ची गोची; कार्यकर्ते संतप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

सोमवारी मुंबईत होणाऱ्या रासपच्या बैठकीकडे आता राज्यभरातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

बारामती : ऐनवेळेस भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय समाज पक्षाची कोंडी केल्यामुळे आता महादेव जानकरांनी निर्णायक भूमिका घ्यावी, यासाठी रासपच्या कार्यकर्त्यांनी जानकर यांच्यावर दबाव वाढविण्यास सुरवात केली आहे.

दौंड आणि जिंतूर या दोन्ही ठिकाणी रासपच्या उमेदवारांना एबी फॉर्म देत भाजपने रासपची गोची केली आहे. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले आहेत. याबाबत आता काहीतरी निर्णय घ्यावा, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.

दरम्यान, या संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता.7) सकाळी 11 वाजता मुंबईत रासपच्या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्राचे रासपचे अध्यक्ष माणिकराव दांगडे-पाटील यांनी याबाबत माहिती दिली. रासपला विविध प्रकारे जागांचे आश्वासन देऊन सरतेशेवटी दोनच जागा देण्याची भूमिका भाजपने घेतली होती. या दोन जागा देतानाही भाजपतर्फे रासपच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिलेला असल्यामुळे भाजपने रासपची फसवणूक केली आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना तयार झाली आहे.

त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता महादेव जानकर यांनी काहीतरी ठोस भूमिका घ्यावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. सोमवारी मुंबईत होणाऱ्या रासपच्या बैठकीकडे आता राज्यभरातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये सर्व साधक-बाधक गोष्टींची चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे माणिकराव दांगडे यांनी सांगितले.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- आंबेडकरांच्या अटकेच्या निषेधार्थ बारामतीत फोडली एसटी

- Vidhan Sabha 2019 : राणे घेणार कुडाळ - मालवणच्या उमेदवारीबाबत निर्णय

- Vidhan Sabha 2019 : राज्यात नाही, पुण्यातील मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मनसेच्या पाठिशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP cheated RSP while allocating election tickets for Maharashtra Vidhansabha 2019