कांद्याचा झाला वांदा ; शेतकऱ्यांची पसंती गहू आणि ऊस लागवडीस

केशव कचरे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

पाऊस, ढगाळ वातावरणाचा फटका खटाव तालुक्‍यातील कांद्याच्या लागवडीस बसला आहे. यामुळे क्षेत्रात निम्म्याहून अधिक लागवडीची घट झाली आहे.

बुध (जि. सातारा) : माण, खटाव तालुक्‍यांचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकाची लागवड करण्यात डिस्कळ, ललगुणसह बुध परिसरातील शेतकरी वर्ग सध्या गुंतला आहे. ही लागण आता अंतिम टप्प्यात आली आहे. अतिवृष्टी, खते, मजुरीच्या दरातील भरमसाट वाढीमुळे यंदाच्या कांदा लागवडीचे प्रमाण गत चार वर्षांच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी झाल्याचे दिसून येत आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

यावर्षी उन्हाळी कांद्याला अखेरच्या टप्प्यात चढा भाव मिळाल्याने व पाण्याच्या उपलब्धतेमुळे यावर्षी अधिक क्षेत्रावर कांदा लागवडीची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार राजापूर परिसराने मोठ्या प्रमाणात आगाप कांदा लागवड करून चांगली सुरवातही केली होती. मात्र, ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सारे गणित बिघडवले. घातीवर येत असलेल्या जमिनी पुन्हा पाण्याखाली गेल्या.

हेही वाचा : कोल्हापूरपेक्षा या गावात मटणाचा दर जादा 

राजापूर परिसरात आगाप कांदा लागवड झालेल्या क्षेत्रात महिनाभर पाणी साचून राहिल्याने कांदा पीक कुजून गेले. दरम्यान उन्हाळी कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपे सततचा पाऊस, दव व धुक्‍यामुळे वाया गेली. अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा रोपे टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधूनमधून येणारा पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा मोठा फटका रोपांना बसल्याने लागवडीसाठी रोपे उपलब्ध होऊ शकली नाहीत.

हेही वाचा : महाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये

एक एकर लागवडीसाठी किमान तीन ते चार किलो बियाणाची गरज असते. सुरवातीला 600 ते 700 रुपये किलो दराने गरव्या कांद्याचे बी शेतकऱ्यांकडे मिळत होते. मात्र, आता ते बियाणे 1500 ते 2000 हजार रुपयापर्यंत पोचले आहे. या शिवाय कांदा पिकासाठी शेत तयार करणे, खते, तणनाशके फवारणे, लागवडीवर येणारा एकरी नऊ हजार रुपये खर्च अशा अनेक कारणांमुळे कांदा उत्पादन खर्चात यावर्षी दुपटीने वाढ झाली आहे. 

ऊस व गहू लागवडीस पसंती

अतिवृष्टीमुळे कांदा लागवडीचा कालावधी महिनाभराने लांबला असून गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व रोगट हवामानामुळे तालुक्‍यातील कांदा पीक धोक्‍यात आले आहे. पिकाला आवश्‍यक असलेला थंडीचा कालावधीही लांबल्याने उत्पन्नात मोठी घट होण्याची साशंकता शेतकरी व्यक्त करीत आहेत. थंडी कितपत साथ देईल, त्यावरच कांद्याचे अपेक्षित उत्पन्न अवलंबून आहे. मुबलक प्रमाणात पाणी असताना केवळ रोपांच्या व बियाणाच्या उपलब्धतेअभावी इच्छा असूनही बहुतांशी शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करता आली नाही. परिणामी शेतकऱ्यांनी आपला मोर्चा पुन्हा गहू आणि ऊस लागवडीकडे वळवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due To Heavy Rainfall Onion Cultivation Has Led To More Than Half The Cultivation In Khatav Taluka