सव्वाशे कोटींच्या कर्जापोटी आजरा कारखान्यावर कुणाचा ताबा?..... जाणून घ्या

सव्वाशे कोटींच्या कर्जापोटी आजरा कारखान्यावर कुणाचा ताबा?..... जाणून घ्या

आजरा : थकीत कर्जासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने  आजरा साखर कारखान्याचा मंगळवारी ताबा घेतला. जिल्हा बॅंकेचे कारखान्यावर 125 कोटींचे कर्ज आहे. बॅंकेच्या चार अधिकाऱ्यांच्या पथकाने गवसे येथील कारखाना कार्यस्थळावर येऊन साखरेच्या चार गोदामांसह स्टोअर विभाग व मशिनरी विभाग सील केला. सुमारे अडीच तास कारवाई सुरु होती. 

बॅंकेने 30 नोव्हेंबर 2019 कारखान्याला 125 कोटींच्या कर्जाची परतफेड करण्याची नोटीस दिली होती. त्यानंतर 13-2 नोटीस 23 जानेवारीला 2020 दिली होती. यामध्ये कर्जफेडीसाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. कारखान्याने साखर विक्रीतून 24 कोटींची परतफेड केली. सध्या बॅंकेचे कारखान्यावर 101 कोटींचे कर्ज आहे. मध्यम मुदत, माल तारण अशी नऊ प्रकारची कर्जे कारखान्यावर आहेत. बॅंकेने आजअखेर आजी-माजी संचालकांना 13-4 नोटीस बजावली होती. दहा दिवसांची मुदत होती. ती मुदत आज (ता. 26) संपली. त्यामुळे बॅंक अधिकाऱ्यांनी सकाळी साडेअकराला कारखाना स्थळावर येऊन ताबा घेण्याची प्रक्रिया सुरु केली. ती दुपारी दोन वाजता संपली. 

गवसे, दर्डेवाडीतील मिळून 95 एकर जमीन त्याचबरोबर कारखान्याची इमारत, कार्यालयीन इमारत, गोदाम, निवास स्थाने, मशिनरी, फर्निचर, संगणक, चार गोदामातील कच्ची व तयार साखर ताब्यात घेतली आहे. प्राधिकृत अधिकारी व्ही. डी. जगताप, द्वितीय श्रेणी अधिकारी जे. ए. फरास, विशेष वसुली अधिकारी आर. ए. पाटील, द्वितीय श्रेणी अधिकारी एस. पी. करंजगेकर, गोदाम किपर आर. बी. देसाई आदींनी कारवाई केली. कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे, संचालक मुकुंदराव देसाई, मलिककुमार बुरुड आदी उपस्थित होते. 

  • दृष्टिक्षेपात
  • कारखान्यावर माल तारण, मध्यम मुदतीचे जिल्हा बॅंकेचे 9 प्रकारचे 125 कोटींचे कर्ज. 
  • नोटीस मिळाल्यावर साखर विक्रीतून 24 कोटींच्या कर्जाची परत फेड, 101 कोटींचे कर्ज शिल्लक. 
  • गोदामात 1 लाख 71 हजार क्विंटल साखर शिल्लक. 
  • शिल्लक असलेल्या साखरेची अंदाजे किंमत 53 कोटी आहे. 


गडहिंग्लज, दौलतच्या मार्गावर आजरा कारखाना 
कर्जाच्या बोज्यामुळे सहकारातील गडहिंग्लज साखर कारखाना अडचणीत आला. संचालकांनी वेळीच निर्णय घेउन तो खासगीकडे चालवायला दिला. चंदगडमधील दौलत साखर कारखाना यापूर्वी बॅंकेने ताब्यात घेतला आहे. तो सध्या खासगी कंपनीकडे चालवण्यास दिला आहे. आजरा कारखानाही या मार्गावरच गेला. त्यामुळे या उपविभागातील सहकारातील शेवटचा कारखाना ठरला आहे. 

निर्णय 30 मे रोजी 
आजरा कारखान्याचा आज ताबा जिल्हा बॅंकेने घेतल्यानंतर या कारवाईची माहिती 30 मे रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. या बैठकीतच हा कारखाना भाडे तत्त्वार देण्याचा निर्णय होऊन तशी निविदा प्रसिध्द केली जाण्याची शक्‍यता आहे. 

सातवा कारखाना गेला 
जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावरील सात कारखान्यांची विक्री किंवा ते कारखाने चालवण्यास दिले आहेत. जिल्हा बॅंक ज्या कारखान्यामुळे सुरूवातीला अडचणीत आली तो "दत्त-आसुर्ले' विकण्यात आला. त्यानंतर गडहिंग्लज, दौलत-हलकर्णी, पंचगंगा-इचलकरंजी, उदयसिंगराव गायकवाड-शाहुवाडी व इंदिरा महिला-तांबाळे असे सहा कारखाने मार्गी लागले आहेत. त्यात आता आजरा कारखान्याची भर पडली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com