esakal | यंदा सर्वांचा लाडका बाप्पा वाजत-गाजत येणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus effect on ganesh festival

यावर्षी गणेश उत्सव होईल की नाही? मंडळांना लागणाऱ्या मोठ्या गणपती मुर्तींची विक्री होईल की नाही, असे प्रश्‍न मुर्तीकारांसमोर उभे आहेत. 

यंदा सर्वांचा लाडका बाप्पा वाजत-गाजत येणार का?

sakal_logo
By
अमोल सावंत

कोल्हापूर : गणेश मुर्ती तयार करणे, मुर्तीची विक्री करणे अन्‌ मुर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेवर कोरोना लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे; कारण गणेश मुर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा बाहेरील राज्यातून येतो. अशावेळी लॉकडाऊन पुन्हा वाढविले तर हा माल इथपर्यंत येईल का, असा प्रश्‍न गणेश मुर्तीकारांनी केला आहे. 

यावर्षी गणेश उत्सव होईल की नाही? मंडळांना लागणाऱ्या मोठ्या गणपती मुर्तींची विक्री होईल की नाही, असे प्रश्‍न मुर्तीकारांसमोर उभे आहेत. 

गतवर्षी शहर, जिल्ह्यात महापुराचे आसमानी संकट उभे राहीले. महापुरामध्ये शाहुपूरी, बापट कॅम्प, गंगावेश येथील मुर्तीकारांचे खूप नुकसान झाले. अनेक मुर्ती पाण्यामध्ये विरघळल्या. काही मुर्ती तर टाकून द्याव्या लागल्या. तरीही तग धरत गतवर्षीचा गणेश उत्सव पार पडला. आता कोरोना विषाणूचे जागतिक महासंकट उभे राहीले. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन केले. लॉकडाऊनचा परिणाम जसा अन्य व्यवसायांवर झाला. तसा तो गणेश मुर्ती निर्मितींवरही होत आहे. दुसरे म्हणजे, दिवाळीपर्यंत होणारे सर्व सण-उत्सव सर्वांनी एकत्रितपणे येऊन साजरे करण्यावर बंधन येण्याची शक्यता आहे. कोविड-19 चा प्रभाव कधी कमी होईल, हे आजतरी कोणी सांगू शकणार नाही. अशावेळी 22 ऑगस्टला होणारा सार्वजनिक गणेश उत्सव कसा साजरा होईल? मोठी मंडळे गणेश मुर्ती विकत घेतील का, असे प्रश्‍न आज मुर्तीकारांसमोर उभे ठाकले आहेत. 

हे पण वाचा - कुटुंब नियोजनावर असा झाला आहे कोरोनाचा परिणाम!

घरगुती गणेश मुर्तींचे पूजन होईल; पण मोठ्या मंडळांच्या गणेश मुर्तींचे पूजन होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. 

गणेश मुर्तीची निर्मिती कधीही दसऱ्यापासून सुरु होते. शहर, जिल्ह्यात हजारोंपेक्षा जास्त मुर्तीकार कुटुंबे मुर्ती तयार करतात. शहरातील हे प्रमाण सातशे-आठशे असे आहे. शहरातील मंडळांसाठी दहा ते 15 हजार गणेश मुर्ती लागतात; तर घरगुती पुजेसाठी पाच लाखांपर्यंत मुर्ती लागतात. मुर्तीसाठी लागणारा कच्चा माल लॉकडाऊनमुळे कधी येईल, हे माहिती नाही. मुर्तीला लागणारा गबाळा केरळ, आंध्रपद्रेश तर प्लास्टर ऑफ पॅरिस राजस्थानमधील बाडनेर, बिकानेर तसेच रबर बंगळूर, हैदराबाद, पुणे येथून येते. या राज्यातून हा माल कधीपर्यंत येणार हे सांगता येत नाही; कारण जूनपासून पावसाला सुरवात होते. 22 ऑगस्टला गणेश उत्सव असल्यामुळे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गणेश मुर्ती तयार कराव्या लागणार आहेत. हा माल लवकर आला तर मुर्ती तयार करण्यास गती येईल. जिथून हा माल येतो. त्या राज्यांनी हा माल वेळाने पाठविला तर मुर्ती निर्मितीला वेळ लागेल हे निश्‍चित. मुर्ती तयार केल्यानंतर बापट कॅम्पपर्यंत नेण्यासाठी, उत्तर कर्नाटक, गोवा, बंगळूर, हैदराबादपर्यंत नेण्यासाठीची परवानगी पोलिसांनी दिली पाहिजे. यासाठीचे अत्यावश्‍यक पास कुंभार समाजातील मुर्तीकारांना दिले पाहिजे. जेणेकरुन मुर्ती दुसरीकडे नेता येईल. 

हे पण वाचा - कोरोनाशी लढणार आता ही गोळी 
 

मुर्ती तयार करण्यासाठी मुर्तीकारांना बॅंकांमधून सीझनल कर्जे घ्यावी लागतात. तरच कच्चा माल विकत घेणे, मुर्ती तयार करणे ही प्रक्रिया सोपी होते. मागील वर्षी आलेल्या महापुराने खूप नुकसान कुंभार समाजाचे झाले. आता कोरोना लॉकडाऊनमुळे जर माल वेळेत आला नाही? णछोट्या अन्‌ मोठ्या मुर्ती जर विकतच घेतल्या नाही तर कर्जांचे काय करायचे, हा प्रश्‍न उभा राहील. अनेकांनी विविध बॅंकांकडून कर्जे घेतली आहेत. त्या कर्जांची परतफेड कशी करायची, असे प्रश्‍न मुर्तीकारांसमोर आहेत. 

""कास्टिंग, फिनिशिंग करणारे तंत्रज्ञ, मजूरांचा तुटवडा जाणवत आहेत. आता 50 ते 60 टक्के मुर्ती तयार आहेत. जर या मुर्ती मंडळांनी विकत घेतल्या नाही तर या मुर्तींचे काय करायचे, हा प्रश्‍नच आहे. शेतकऱ्यांसाठी जशी कर्जमाफी होते; तशी कर्जमाफी कुंभार समाजालाही द्यावी.'' 

- उदय कुंभार, मुर्तीकार (शाहुपूरी)