esakal | गडहिंग्लज : तेवीस हजार गणेश मूर्तींचे पर्यायी व्यवस्थेत विसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज : तेवीस हजार गणेश मूर्तींचे पर्यायी व्यवस्थेत विसर्जन

गडहिंग्लज : तेवीस हजार गणेश मूर्तींचे पर्यायी व्यवस्थेत विसर्जन

sakal_logo
By
अवधूत पाटील

गडहिंग्लज: गडहिंग्लज तालुक्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात दोन हजाराहून अधिक तर ग्रामीण भागात २१ हजार ५७५ गणेश मूर्ती पर्यायी व्यवस्थेत विसर्जित करण्यात आल्या. तसेच साडेआठ टन निर्माल्याचे संकलन झाले. प्रशासनाच्या प्रयत्नांना स्थानिक तरुण मंडळांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे पाणी प्रदुषण रोखण्यास मोठी मदत झाली आहे.

हेही वाचा: शाहू साखर कारखाना भरवणार कुस्ती स्पर्धा

गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मंगळवारी (ता.१४) निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यात आले. नदी, ओढा, तलाव, विहिरींचे प्रदुषण टाळण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाचे आवाहन केले होते. त्याला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. प्रत्येक गावात ग्रामपंचायतींनी मूर्ती विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था केली होती.

ग्रामस्थांनी त्यामध्ये मूर्तींचे विसर्जन केले. तसेच काही ठिकाणी कुंभारांना मूर्ती दान देण्यात आल्या. विसर्जनाच्या ठिकाणीच निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली होती. त्यासाठी ट्रॅक्टर्स व घंटा गाडींचा वापर केला होता. या कामात स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले.

शहरात नगरपालिकेने २२ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली होती. या ठिकाणी विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. बहुतांश नागरीकांना नदीघाटावर गणेश विसर्जनासाठी न जाता या ठिकाणी घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन केले. सायंकाळी सातपर्यंत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या १०५५ तर शाडूच्या ७७० गणेश मूर्तींचे या ठिकाणी विसर्जन झाले होते. त्यानंतरही अनेक भाविकांनी गणेश मूर्तींचे येथे विसर्जन केले. नदीवेस भागातील कुंडात सर्वाधिक ६५१ मूर्तींचे विसर्जन झाले.

दृष्टीक्षेपात आकडे...

- ग्रामीण भागात पर्यायी व्यवस्थेत विसर्जित मूर्ती....२०,५७९

- ग्रामीण भागात कुंभारांना दिलेल्या मूर्ती.....................९९६

- ग्रामीण भागातील निर्माल्य संकलन.........................८,७८१ किलो

- शहरात पर्यायी व्यवस्थेत विसर्जित मूर्ती ............दोन हजाराहून अधिक

loading image
go to top