
95606
शहरात आढळला दुर्मिळ ‘काळा कुडा’ वृक्ष
कोल्हापूर, ता. १३ ः कोल्हापूर शहर आणि परिसरातील वृक्षांचे सर्वेक्षण करताना वनस्पती अभ्यासक व वृक्षमित्रांना राजारामपुरी येथे नक्षत्र उद्यानामध्ये ‘काळा कुड्याचे’ दोन वृक्ष आढळले. सदर नक्षत्र उद्यान सन्मित्र हौसिंग सोसायटी आणि कोरगावकर हौसिंग सोसायटी यांच्या सदस्यांनी तयार केले आहे. याबरोबरच इतर महत्वाच्या वनस्पतींच्या जातीही या उद्यानामध्ये पाहावयास मिळतात. भारतामध्ये काळ्या कुड्याचे वृक्ष नैसर्गिकरित्या राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशातील आणि दक्षिण भारतात आढळतात. महाराष्ट्र तसेच जिल्ह्याच्या वनस्पती कोशामध्ये याची रितसर नोंद आढळते.
वनस्पती अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे आणि वृक्षमित्र पारितोष उरकुडे यांनी या वृक्षाचा शोध घेतला. काळा कुडा हा रुई (अॅ्पोसायनेसी) कुळातील वृक्ष आहे. या वृक्षाला मराठीमध्ये कृष्णकुटज, काळी कुडई, गोड इंद्रजव अशीही नावे आहेत. इंग्रजीमध्ये तो मिल्की वे ट्री, ब्ल्यू डायिंग रोझबे, डायर्स ओलिएंडर, पला इंडिगो, टूथएक प्लांट या नावांनी प्रसिद्ध आहे. काळा कुड्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव राइटिया टिंक्टोरिया असे आहे. हा पानझडी वृक्ष साधारणपणे ३-७ मीटर उंच वाढतो. याची फळे त्यास जोड फलिका (डबल फॉलिकल) प्रकारची असतात.
चौकट
लाकूड मजबूत
या वृक्षाचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. कोरीव कामासाठी आणि शेतीची अवजारे बनविण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. त्याला पॉलिश चांगले होते तसेच ते चमकदार असल्याने शोभेच्या वस्तू, कंगवे, मुर्ती, खेळणी इ. बनविण्यासाठी होतो. काळ्या कुड्याच्या पानांपासून निळा रंग तयार करतात. जनावरांना चारा म्हणूनही पाने उपयुक्त आहेत.
कोट
कोल्हापूर शहरातील औषधी गुणांनीयुक्त एकमेव अशा ‘काळा कुडा’ वृक्षाला ‘हेरीटेज ट्री अर्थात वारसा वृक्षाचा’ दर्जा देणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन वनस्पती अभ्यासकांच्या साहाय्याने दुर्मिळ हेरिटेज वृक्षांच्या रितसर नोंदी करावी. त्यातून दुर्मिळ वृक्षांचे जतन आणि संवर्धन करणे सोपे होईल.
-डॉ. मकरंद ऐतवडे, वनस्पती अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.