सोलापूर : सेनेच्या तानाजी सावंतांचा चुकला निर्णय : Election Result 2019

तात्या लांडगे
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादीतून माढा लोकसभा निवडणूक लढविलेले संजय शिंदे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यांना माजी आमदार जयवंतराव जगताप यांची साथ मिळाली. त्यामुळे सहानुभूतीचा सर्वाधिक फायदा नारायण पाटील यांना झाला.

सोलापूर : शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांचा निर्णय सोलापूर जिल्ह्यात चुकीचा ठरला आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून महेश कोठे यांनी उमेदवारीची मागणी करुनही त्यांना डावलून पक्षांतर करणारे दिलीप माने यांना उमेदवारी दिली.

दुसरीकडे करमाळ्यात विद्यमान आमदार नारायण पाटील यांना बाजूला करुन राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या रश्‍मी बागलांना उमेदवारी दिली. मात्र, कोठे यांचा फायदा काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना झाला, तर नारायण पाटील यांना जनतेची सहानुभूती मिळाली.

- सांगली जिल्ह्यात भाजपचा वारु आघाडीने रोखला 

राज्यातील 50 आमदार विजयी करण्याची जबाबदारी तानाजी सावंत यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यानुसार त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारी वाटपात मोठा हस्तक्षेप केला. त्यावर नाराज होऊन महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी बंडखोरी केली आणि त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसला. तर 2014 च्या मोदी लाटेत करमाळ्यातून एकमेव शिवसेनेचे उमेदवार म्हणून नारायण पाटील यांनी विजय मिळविला होता. तरीही त्यांना यंदा उमेदवारी नाकारली.

- भाजपला मोठा झटका; काँग्रेस 'या' पक्षासोबत सत्ता स्थापनेच्या तयारीत?

राष्ट्रवादीतून माढा लोकसभा निवडणूक लढविलेले संजय शिंदे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यांना माजी आमदार जयवंतराव जगताप यांची साथ मिळाली. त्यामुळे सहानुभूतीचा सर्वाधिक फायदा नारायण पाटील यांना झाला. निवडणुकीपूर्वी भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेले नागनाथ क्षिरसागर यांना उमेदवारी दिली अन्‌ मनोज शेजवाल यांना डावलले. आता संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी आग्रह धरलेले शिवसेनेचे तिन्ही उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत.

- माढा : बबनराव शिंदे सलग सहाव्यांदा विजयी; औपचारिकता बाकी I Election Result 2019

शिवसेना करणार मोठी खांदेपालट

संपर्कप्रमुखपदाची धुरा खांद्यावर घेऊन शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करतानाच तानाजी सावंत यांनी आपला वेगळा गट तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी उमेदवारी देताना करमाळा, शहर मध्य आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलले. शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्‍का बसला असून आता शिवसेना पक्षप्रमुख मोठी खांदेपालट करणार, अशी चर्चा आहे. आता तानाजी सावंत यांच्याऐवजी जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्याकडे की अन्य पदाधिकाऱ्याला संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Solapur trends afternoon