मध्यमेश्वर देवस्थानच्या गुरु-शिष्यांवर प्रणघातक हल्ला

सुनील गर्जे
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पोलिस यंत्रणेने सकाळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले असता श्वान पथकाने मंदिरापासून बस स्थानाकापर्यंत सुमारे एक किलोमीटरचा माग काढला. ठसे तज्ज्ञ सहायक पोलिस निरीक्षक सुनीता धुमाळ यांच्या पथकाने स्थळावरील ठसे घेतले.

नेवासे : नेवासे मध्यमेश्वर महादेव देवस्थान मंदिरातील गुरु योगी लक्ष्मणनाथ महाराज व त्यांच्या शिष्याला पैशांची मागणी करत चाकू व कुर्‍हाडीने हल्ला करून जबर जखमी केल्याची घटना सोमवार (ता. २) रात्री बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान घटनेचे ठिकाण सर्वत्र रक्ताने माखलेले होते. हल्ल्यात जखमी झालेल्या गुरु-शिष्यांना उपचारासाठी नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नेवासे पोलिसात अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासे शहरापासून पूर्वेस काही अंतरावर प्रवरानदीकाठी असलेले मध्यमेश्वर मंदिराची देखभाल व पूजापाठ करणारे गुरु योगी लक्ष्मणनाथ महाराज (वय ७५, राहणार- गोरखपूर उत्तर प्रदेश) व शिष्य योगी केशवनाथ महाराज उर्फ किसन हरिभाऊ लांडे (वय ७०, राहणार- भायगाव, ता. शेवगाव) दोघेही हल्ली मध्यमेश्वर मंदिर, नेवासे येथे राहत आहेत. हे नेहमीप्रमाणे मंदिर परिसरातील राहत असलेल्या खोली बाहेर झोपलेले असताना सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास शिष्य योगी केशवनाथ हे तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी खोलीत गेले होते. त्यावेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी पैशाची मागणी करत त्यांच्यावर चाकू व कुर्‍हाडीने हल्ला करून मारहाण करत असतांना गुरु योगी लक्ष्मन्नाथ हे खोलीत आल्यावर त्यातील एका हल्लेखोरांने त्यांच्यावर कुर्‍हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात केशवनाथ यांच्या हातावर चाकू व कुर्‍हाडीचे घाव लागल्याने ते जबर जखमी झाले आहे. घटनेची माहिती समजचताच पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जांभळे, प्रमोद भिंगारे, रोहिदास माळी, पोलिस कॉन्टेबल विठ्ठल गायकवाड, संदीप अजबे, संदीप दरंदले, संभाजी गर्जे, अंकुश पोटे, अशोक नागरगोजे, सोमनाथ कुंढारे, बाबासाहेब लबडे यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी योगी केशवनाथ महाराज व योगी लक्ष्मणनाथ महाराज यांना तातडीने रुग्णालयात हलविले. 

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी केशवनाथ महाराज यांच्या फिर्‍यादिवरून नेवासे पोलिसांत चार अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश जांभळे करत आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nagar news madhyameshwar temple two attacked