दिवाळीत यंदा गृहसजावटीचा नवा ट्रेंड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - दिवाळी म्हटलं, की दारात रेखाटलेली सुबक रांगोळी, विविध आकारांच्या पणत्या, आकाशकंदील ही सजावट ओघाने येतेच. या सजावटीसोबत यंदा गृहसजावटीचा नवा ट्रेंड आला आहे

कोल्हापूर - दिवाळी म्हटलं, की दारात रेखाटलेली सुबक रांगोळी, विविध आकारांच्या पणत्या, आकाशकंदील ही सजावट ओघाने येतेच. या सजावटीसोबत यंदा गृहसजावटीचा नवा ट्रेंड आला आहे. शहरात भरलेल्या विविध प्रदर्शनांतून विक्रीस ठेवलेल्या आर्टिफिशियल सजावटीच्या वस्तू ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागल्या आहेत. यात घराच्या भिंतींच्या सौंदर्यात भर टाकणारे वॉलपीस, खिडक्‍यांचे पडदे, तोरणे आणि घरातही दिवे लावता येतील असे कॉर्नरपीस यांचा समावेश आहे. 

बांबूच्या आकाशकंदिलांचे विविध प्रकार कोल्हापूर बाजारात 

दिवाळी जसजशी जवळ येईल, तसतशी घराची साफसफाई व सजावट या कामांना वेग आला आहे. खास दिवाळीत घराची सजावट करण्यासाठी अनेक जण विविध वस्तू खरेदी करताना दिसतात. तसेच दिवाळीतल्या महत्त्वाच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घर कसे आकर्षक करता येईल, याकडे महिलावर्गाचे अधिक लक्ष असते. लक्ष्मीपूजनाच्या समोर  ठेवण्यासाठी ॲक्रॅलिकपासून तयार केलेल्या विविध आकारांच्या पणत्या लक्षवेधी ठरत आहेत. तर घरातील कॉर्नरपीसवर कायम राहणाऱ्या डेकोरेटिव्ह पणत्यांनाही मागणी आहे.

कोल्हापूर बाजारात मॅजिक दिव्यांसह विविध कंदीलही 

लक्ष्मीपूजनासाठी खास तयार केलेले हळदी-कुंकवाचे करंडेही बाजारात उपलब्ध आहेत. हॉलमधील टिपॉयवर फुलांची आरास करून त्यामध्ये पणत्या लावूनही दिवाळीत घराची सजावट केली जाते. त्यासाठी फोम आणि ॲल्युमिनियमपासून तयार केलेल्या पणत्यांनाही मागणी आहे. तसेच सजावटीसाठी घरातही आकाशकंदील लावले जातात. यात कटिंग लॅंपस्‌, काचेच्या विविध लाईट इफेक्‍ट, पारंपरिक वस्तूंना आधुनिक टच देऊन तयार केलेले आकाशकंदिलही ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. तसेच दिवाळीचे संदेश देणारे वॉलपीस, वॉलपेंटिंगही लक्षवेधी ठरत आहेत.

अंधशाळेत उजळते डोळस दिवाळी.... 

खिडक्‍यांसाठी विशिष्ट झालर
बाजारात सोनेरी किंवा इतर चमकदार रंगांत छान तरीही स्वस्त असे जाळीचे कापड मिळते. या कापडाची झालर करून खिडकीच्या पडद्यांवरून सोडल्यास घरातील खिडकीचे सौंदर्य वाढते. विविध रंगसंगतीतील हे कापड सध्या लक्षवेधी ठरत आहे. तसेच खिडक्‍यांच्या आतील बाजूस लावता येणारे आकर्षक व कलाकुसरीतील तोरणही विविध प्रदर्शनांत उपलब्ध आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New trends in home decor this year Diwali in Kolhapur