ज्येष्ठ नागरिकांना 'या' शहरात "दिलासा'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

■ सोलापूर पोलिस आयुक्‍तालयात स्वतंत्र हेल्पलाइन सेवा 
■ व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून होणार विचारपूस 
■ सोलापूर शहरात 30 हजार ज्येष्ठ नागरिक 
■ ज्येष्ठांना सर्वप्रकारची केली जाणार मदत

सोलापूर : सोलापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या पुढाकारातून "दिलासा' नावाची हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे. सोलापुरातील 16 ज्येष्ठ नागरिक संघातील सुमारे 30 हजार ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्‍न सुटावेत, त्यांचे आयुष्य निरोगी राहावे, आर्थिक फसवणूक होऊ नये, एकटेपणा घालवण्यासाठी मनोरंजन व्हावे, या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे. त्यासाठी पोलिस आयुक्‍तालयाने स्वतंत्र व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केले आहेत. 

हेही वाचा : बापरे! उजनी जलाशयात मगर... 

सोलापुरात ज्येष्ठ नागरिकांचे एकूण 16 संघ असून त्यात सुमारे 30 हजार ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी झाली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुले-मुली शिक्षण अथवा नोकरीच्या निमित्ताने परगावी गेली आहेत, अशा एकट्या ज्येष्ठ नागरिकांची दररोज विचारपूस केली जाणार आहे. शहरातील नऊ पोलिस ठाण्यातील ठरावीक कर्मचाऱ्यांकडे त्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे त्या-त्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची यादी देऊन दररोज त्यांच्या घरी जाऊन अथवा फोन करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी पोलिस आयुक्‍तालयाने आतापर्यंत सात व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केले आहेत. दरम्यान, शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी 0217-2744611 या क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन पोलिस आयुक्‍तालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 

हेही वाचा : या पोलिस आयुक्तालयाने दिला महिलांना भरोसा

सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक संघ 
साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघ, जुळे सोलापूर, स्नेहबंध महिला ज्येष्ठ नागरिक संघ, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, कर्णिकनगर, एकतानगर ज्येष्ठ नागरिक संघ, विवेक ज्येष्ठ नागरिक संघ, सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ, हत्तुरेनगर ज्येष्ठ नागरिक संघ, आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, उमानगरी, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघ, उत्कर्ष महिला ज्येष्ठ नागरिक संघ, बंथनाळ ज्येष्ठ नागरिक संघ, ओंकार ज्येष्ठ नागरिक संघ, एकतानगर, जागृती ज्येष्ठ नागरिक संघ, अशोक चौक असे 16 संघ सोलापुरात आहेत. 

हेही वाचा : मंत्री व्हायचे आहे... मोदी, शहांवर करा टिका

हेही लक्षात असू द्या... 
■ सुरक्षिततेसाठी एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांना द्यावी माहिती 
■ पोलिस आयुक्‍तालयाच्या 1090 या हेल्पलाइनवर ज्येष्ठ नागरिकांनी करावा संपर्क 
■ ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिस आयुक्‍तालयात होणार स्वतंत्र कक्षाची स्थापना 
■ ऑनलाइन व्यवहार, निरोगी आरोग्य व मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन 
■ परिसरातील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून दररोज होणार विचारपूस 

ऑनलाइनबाबत जागृती 
ज्येष्ठ नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी व त्यांचा एकटेपणा घालवण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. डिजिटलच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाणही वाढले असून त्याबाबतीत जागृती केली जाणार आहे. पोलिस आयुक्‍तांच्या मार्गदर्शनातून नियोजित कार्यक्रमाचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल. 
- अभय डोंगरे, सहायक पोलिस आयुक्‍त, सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reassuring senior citizens in this city