दोन वर्षांत उदगिरी कारखाना कर्जमुक्त करू : पतंगराव कदम

दत्तात्रेय मेटकरी
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

उदगिरी शुगरच्या पाचव्या गळीत हंगामाचा प्रारंभ

कदम घराण्याने समाजकारण पाहत असताना राजकारण कधीही केले नाही. तोच वारसा घेऊन आमची नवी पिढी समाजकारणात सक्रिय आहे, आजवर कदम घराण्याला जनतेने जो आशिर्वाद दिला तो यापुढेही मिळावा. उदगिरी कारखाना हा इतक्‍या चांगल्या पध्दतीने सुरू आहे की, भविष्यात हा कारखाना सोनहिरापेक्षाही चांगला चालला दर देईल. 
डॉ. विश्‍वजीत कदम

विटा : कदम कुटुंबाने मोठ्या धाडसाने स्वतःचा म्हणून पहिलाच खाजगी साखर कारखाना म्हणून उदगिरी कारखान्याची उभारणी केली आहे, ऊसाला दर देण्याचे ना कारखान्याच्या हातात आहे ना दर शेतकऱ्यांच्या हातात आहे. आमच्या सर्व संस्थांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. येत्या दोन वर्षात उदगिरी कारखान्यावरील कर्ज फेडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आणि परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी केले. 

पारे- बामणी (ता.खानापूर) येथील उदगिरी शुगर ऍण्ड पॉवर लि. कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शिवाजीराव कदम, संचालक रघुनाथ कदम, युवा नेते जितेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 
डॉ. कदम म्हणाले, नागेवाडीचा यशवंत कारखाना बंद पडला होता. त्यावेळी खानापूर तालुक्‍यातील अनेक मंडळी आमच्याकडे आली. आम्हाला वाऱ्यावर सोडू नका, म्हणाली. त्यामुळे सोनहिरा कारखान्याने यशवंत कारखाना विकत घेण्यासाठी जादा दराने निविदा भरली. पण तो मिळाला नाही. मी सहकारमंत्री असल्यामुळे सहकार क्षेत्राची मला चांगली जाण आहे. सहकारातील बंद पडलेल्या संस्था सहकारी संस्थांनीच चालवल्या पाहिजेत, असा निर्णय घ्यायला पाहिजे होता पण दुर्दैवाने तो घेतला नाही. माझा तो सल्ला ऐकला असता तर तासगाव कारखाना बुृडला नसता. त्यामुळे खानापूर आणि तासगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ऊस घालण्यासाठी होणारी गैरसोय ओळखून उदगिरी शुगरची मोठ्या धाडसाने उभारणी केली. तो चांगल्या पध्दतीने सुरू आहे. 
उत्पादित साखरेपैकी 80 टक्‍के साखर शीतपेयांसाठी जाते तर उरलेली 20 टक्‍के केवळ लोकांना मिळते, शासनाची धोरणे अतिशय चुकीची आहेत केंद्रियमंत्री रामविलास पासवान साखरेचा साठा करण्याचे धोरण घेतात अशातही उदगिरी कारखान्याने कर्जात असतानाही तब्बल 40 ते 50 कोटी रूपये शेतकऱ्यांसाठी अधिकचे खर्च केले आहेत, आम्ही कारखान्यात हाणाहाणी करत नाही, संस्था उत्तम चालल्या पाहीजेत हा माझा आग्रह असतो त्यानुसारच हा कारखाना चालला आहे. 

स्वागत व प्रास्ताविक उपाध्यक्ष एन. एस. कदम यांनी केले, यावेळी प्रा.डी.ए.माने, बाळकृष्ण यादव, प्रकाश पाटील यांची भाषणे झाली. यावेळी जेष्ठ नेते रामरावदादा पाटील, प्रतापशेठ साळुंखे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीआण्णा देशमुख, जयसिंगराव कदम, राजेंद्र माने, शशिकांत देठे, शंकरनाना पवार, विटा बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुरेश पाटील, प्रल्हाद पवार यांच्यासह शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, आभार प्रशासकीय अधिकारी बशीर संदे यांनी मानले. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: sangli news patangrao kadam speaks on udgiri sugar factory loan