सॅनिटरी पॅड प्रकरणी स्कूलची कसून चौकशी...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील घटनेची आज शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने स्कूल भेट देऊन चौकशी केली आहे. त्यात पालक व स्कूलचे प्राचार्य, उपप्राचार्य, सफाई कामगार यांचे जबाब नोंदवले आहेत. गटशिक्षण अधिकारी यांचा सविस्तर अहवाल आल्यानंतर तो कारवाईसाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवला जाईल.
- अविनाश फडतरे, गटविकास अधिकारी पंचायत समिती, कऱ्हाड

कऱ्हाड (सातारा): शाळेच्या बाथरूममध्ये न टाकलेले सॅनिटरी पॅड उचलण्यास विद्यार्थीनीवर शाळेने सक्ती केल्याप्रकरणी आज (बुधवार) येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची चार तास कसून चौकशी झाली. येथील पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. एम. गायकवाड यांच्या पथकाने चौकशी केली. त्या चौकशीत पालकांसह स्कूलचे प्राचार्य, उपप्राचार्य, सफाई कामगारांचे जबाब नोंदवले आहेत, असे शिक्षणाधिकारी श्री. गायकवाड यांनी सांगितले.

बाथरूममध्ये न टाकलेला सॅनिटरी पॅड उचलण्यास विद्यार्थीनीवर सक्ती केल्याचा प्रकार तीन दिवसापूर्वी येथे उघडकीस आला. तो प्रकार पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला होता. त्याबाबत संबधित मुलींच्या पालकांनी येथील पोलीस ठाणे, पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याकडे तक्रार दिली आहे. संबंधित मुलीस 'तू जर तो नॅपकीन न उचलल्यास तुझ्या पालकांना बोलावून उचलण्यास लावू, शिवाय हा प्रकार घरी सांगितल्यास तुझ्यावर कारवाई करू, असेही तिला धमकावून दबाव टाकल्याचे तक्रारीत म्हटले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी चोवीस तासात खुलासा करण्याची नोटीस दिली होती. आज त्या शाळेत पंचायत समितीचा शिक्षण विभाग चौकशी करणार होता. त्यानुसार शिक्षणाधिकारी श्री. गायकवाड यांच्या पथकाने स्कूलमध्ये चौकशी केली. या प्रकरणाशी संबंधितांना चौकशीसाठी स्कूलमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज दुपारी एक वाजता शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी व्ही. एम. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विस्ताराधिकारी आनंदा पळसे, जे. यु. मुलाणी, सी. वाय. निकम यांचे पथक चौकशीसाठी स्कूलमध्ये गेले.

विद्यार्थीनींच्या पालकांचे स्वतंत्रपणे म्हणणे जाणून घेवून त्यांचा जबाब नोंदवला आहे. त्यानंतर स्कूलचे म्हणणे जाणून घेण्यात आले. यावेळी येथील प्राचार्य, उपप्राचार्य व सफाई कामगारांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. त्याचा अहवाल गटविकास अधिकारी यांना देणार आल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्री. गायकवाड यांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news karad sanitary pad issue school investigation