सोलापूर : शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीव मुठीत!

अशोक मुरुमकर
रविवार, 30 जुलै 2017

आलेश्‍वर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील गाव असलं तरी येथील शासकीय कामे सोडून सर्व व्यवहार करमाळ्यात होतात. सातवीपर्यंत येथे शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परगावी जावे लागते. परांड्यातून येथे दिवसा दोन वेळा तर करमाळ्यातून पाच वेळा एसटी बस येते. नदीला पाणी आल्यानंतर करमाळ्याची एसटी बस करांजे येथील नदीच्या कडेपर्यंत येते.

सोलापूर : लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या केवळ दुर्लक्षामुळे परंडा तालुक्‍यातील आलेश्‍वर (जि. उस्मानाबाद) येथील 50-60 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सीना नदीवर पूल होत नसल्याने त्यांना करमाळ्याला (जि. सोलापूर) शाळेत येण्यासाठी नावेतून प्रवास करावा लागत आहे. वाळू उपशामुळे खोल खड्डे झाल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. यातून धोका होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात अतिरिक्‍त पाणी आले तर परीक्षेलासुद्धा जाता येत नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. 

आलेश्‍वर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील गाव असलं तरी येथील शासकीय कामे सोडून सर्व व्यवहार करमाळ्यात होतात. सातवीपर्यंत येथे शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परगावी जावे लागते. परांड्यातून येथे दिवसा दोन वेळा तर करमाळ्यातून पाच वेळा एसटी बस येते. नदीला पाणी आल्यानंतर करमाळ्याची एसटी बस करांजे येथील नदीच्या कडेपर्यंत येते. या एसटीसाठी विद्यार्थी व नागरिकांना नावेतून यावे लागते. आलेश्‍वर व करांजेला जोडणारा 100-150 मीटरचा पूल होण्यासाठी येथील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कारही घातला होता. राजकीय नेते मंडळींनी पूल करण्याचे अश्‍वासन दिले होते. प्रशासनानेही पुलासाठी पाहणी केली, परंतु पुढे काहीच झाले नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

सुरक्षिततेचा प्रश्‍न 
आलेश्‍वरपासून नदीकडे (करांजे) विद्यार्थ्यांना कच्च्या रस्त्याने चालत यावे लागते. दोन्ही बाजूने चिलाराची झाडे व ऊस आहे. नावेतून नदी पार करून आल्यानंतरही विद्यार्थी व विद्यार्थिनींना बसण्यास जागा नसते. जीव धोक्‍यात घालून मिळेल तेथे थांबावे लागत आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. सकाळी सहा, नऊ, साडेदहा, सायंकाळी साडेचार व सहा या वेळेत येथे एसटी येते. बस मिळावी यासाठी विद्यार्थ्यांची पहाटेपासून लगबग सुरू असते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Solapur news school student issue