सोलापूर महापालिका दवाखान्यांत औषध गोळ्यांचा ठणठणाट

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

अंदाजपत्रक उशीरा झाल्यामुळे औषधांची वेळत खरेदी झाली नाही. आता आठ लाखांच्या औषधांची खरेदी करण्यात येणार आहे. दरम्यान महापालिका दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना अडचण येऊ नये म्हणून शासकीय रुग्णालयातून परतीच्या अटीवर औषध-गोळ्या घेतल्या आहेत.
- डॉ. जयंती आडके, आरोग्याधिकारी सोलापूर महापालिका

परतफेडीच्या अटीवर शासकीय रुग्णालयातून घेतली औषधे

सोलापूर: स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागालाच दुर्धर समस्यांनी जडले आहे. पालिकेच्या सर्वच दवाखान्यातील औषध गोळ्यांचा साठा संपला असून, परतफेडीच्या अटीवर शासकीय रुग्णालयांतून औषध गोळ्या घेण्यात आल्या आहेत.

"जनसेवा हीच ईश सेवा' हे लोकप्रिय ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या 53 वर्षीय महापालिकेला शहरवासीयांना उत्तम आरोग्यसुविधा देण्यात मात्र साफ अपयश आले आहे. उत्तम इमारती, अत्याधुनिक यंत्रणा असतानाही सर्वसामान्य सोलापूरकर जादा पैसे मोजून खासगी दवाखान्याकडे का वळतो? याचे उत्तर शोधले तर महापालिकेच्या आरोग्यसेवेवरच उपचार करण्याची वेळ आली असल्याचे दिसून येते. औषध गोळ्या संपल्याची घटना तर संतापजनकच आहे. महापालिकेच्या दवाखान्यात रोजच्या रोज सरासरी शंभर ते सव्वाशे रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांच्यासाठी गोळ्या नसल्याने अडचण निर्माण होणार आहे.

नगरपालिका असताना शहरातील लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळत होत्या. महापालिका झाल्यानंतर अत्याधुनिक सेवा मिळतील, अशी लोकांची अपेक्षा होती; पण या सेवांचा उलटा प्रवास सुरू आहे. सुविधांचा बोजवारा उडाला आहेच; पण उपलब्ध उपचाराची उपकरणेही धूळखात पडली आहेत. लोकांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर असते. त्यासाठी शासनाकडून स्वतंत्र निधी मिळतो. नगरपालिका असताना ज्या सुविधा होत्या, त्याच महापालिका झाल्यानंतरही आहेत. शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाने आणि कारभाऱ्यांनीही प्रयत्न केला नाही. अपवाद वगळले तर बहुतांश डॉक्‍टर हे कंत्राटी आणि मानधन तत्त्वावरील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी टाकता येत नाही. गोळ्या संपल्या म्हणजे आरोग्य विभागाची दुर्दशाच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका आरोग्य विभागाची व्याप्ती

  • दवाखाने 18
  • प्रसुतीगृहे 11
  • संसर्गजन्य उपचार केंद्र 01
  • कुटुंबकल्याण केंद्र 09
  • आरसीएच सेंटर 06

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: solapur news solapur municipal hospital medecine