esakal | रेनवॉटर हार्वेस्टींगः श्रीपूरच्या 'ब्रिमासागर'ने एकाच पावसात केली कमाई
sakal

बोलून बातमी शोधा

रेनवॉटर हार्वेस्टींगः श्रीपूरच्या 'ब्रिमासागर'ने एकाच पावसात केली कमाई

'ब्रिमासागर'च्या तलावात सुमारे पन्नास लाख लिटर पाणी आले आहे. रविवारी एकाच दिवशी येथे अडीच इंच पाऊस पडला. या एका दिवसात सुमारे तीस लाख लिटर पाणी जमा झाले आहे.

रेनवॉटर हार्वेस्टींगः श्रीपूरच्या 'ब्रिमासागर'ने एकाच पावसात केली कमाई

sakal_logo
By
मनोज गायकवाड

श्रीपूर (सोलापूर) : रेनवॉटर हार्वेस्टींगच्या माध्यमातून येथील 'ब्रिमासागर' (brimasagar) महाराष्ट्र डिस्टीलरीने एका दिवसात सुमारे पंचवीस लाख लिटर पाणी (Water) मिळविले आहे. यंदा 15 मे पासून आज अखेर येथे सुमारे पाच इंच पाऊस पडला असून, त्यातून 'ब्रिमासागर'ने सुमारे पन्नास लाख लिटर पाण्याची कमाई केली आहे. (brimasagar of Sripur has got 25 lakh liters of water in a one day)

हेही वाचा: विठ्ठला, जग कोरोनामुक्त कर..! 40 किलोमीटर दंडवत; वारकऱ्याची अनोखी भक्ती

दहा वर्षापासून रेनवॉटर हार्वेस्टींग

'ब्रिमासागर'चे एकूण परिसर क्षेत्र साधारणतः साठ एकर आहे. त्यातील सुमारे तीस एकर परिसरात आसवनी, मद्यार्क निर्मिती, सहउद्योग, साठवण टाक्या, जलसंचय तलाव, कार्यालये व गोदामे आहेत. या सर्व इमारतींच्या छतावर व मोकळ्या जागेत पडणारे पावसाचे पाणी एकत्र करून तेे स्वतंत्र वाहिनीच्या माध्यमातून जलसंचय तलावात सोडलेले आहे. कारखाना परिसरातील सुमारे तीस एकर परिसरात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गोळा करण्यात हा उद्योग यशस्वी झाला आहे. त्यामुळे कारखान्याची पाण्याची गरज भागवायला मोठी मदत होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात आजअखेर येथे साधारणतः पाच इंच पाऊस पडला आहे. त्यातून 'ब्रिमासागर'च्या तलावात सुमारे पन्नास लाख लिटर पाणी आले आहे. रविवारी (दि.13) एकाच दिवशी येथे अडीच इंच पाऊस पडला. या एका दिवसात सुमारे तीस लाख लिटर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे, तलावाची पाणीपातळी कमालीची उंचावली असून, 'ब्रिमासागर' परिवारात आनंदाची भावना निर्माण झाली आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या आषाढीच्या महापुजेला धनगर समाजाचा विरोध

'ब्रिमासागर'चे जलनियोजन

साधारणतः 15 कोटी 30 लाख लिटर एवढी या उद्योगाची वार्षिक पाण्याची गरज आहे. पाणी साठवणुकीसाठी सुमारे पाच एकर जागेत साधारणतः पाच कोटी लिटर क्षमतेचा तलाव तयार केलेला आहे. निरा पाटबंधारे विभाग हा त्यांचा मुख्य जलस्त्रोत आहे. याशिवाय, गेल्या दहा वर्षापासून रेनवॉटर हार्वेस्टींगच्या माध्यमातून देखील पाणी मिळविले जात आहे. गेल्यावर्षी येथे 36.40 इंच पाऊस पडला होता. वरवर पडलेल्या या पावसापासून साधारणतः दोन कोटी लिटर एवढे पाणी उपलब्ध झाले होते. यंदा पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीलाच पावसापासून पाण्याची मोठी कमाई झाल्याने व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: अक्कलकोट-सोलापूर महामार्ग पाच महिन्यात होणार पूर्ण, लवकरच टोलही सुरू

ग्रीनवॉल्स ची तटबंदी

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दरवर्षी कारखान्यांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य दिले जाते. त्यामुळे, पाच जूनला जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अनेक कारखाने वृक्षारोपनाचे सोपस्कर पार पाडतात. गेल्या काही वर्षात हजारो झाडे लावल्याचा आभास निर्माण करतात. त्यामुळे वृक्षारोपनाचे कार्यक्रम आणि वास्तव हा सार्वत्रिक थट्टेचा विषय झाला आहे. मात्र, 'ब्रिमासागर'ने केलेली वृक्षलागवड आणि संवर्धन त्याला अपवाद आहे. गेल्या दहा वर्षात या उद्योगाने सुमारे आठ हजार रोपांची लागवड करून त्यांचे वृक्षात रूपांतर केले आहे. त्यात निंब, करंज, वड, पिंपळ, गुलमोहर, आंबा, नारळ, अशोक अशा पर्यावरणपूरक झाडांचा समावेश आहे. रसत्यांच्या दुतर्फा, तलावांच्या शेजारी, खतनिर्मिती प्रकल्प, आसवनी व मद्यार्क निर्मिती प्रकल्प आदी ठिकाणी आखीव रेखीव नियोजन करून लावलेल्या रोपट्यांचे आता वृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे.

हेही वाचा: दिलासादायक! सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख रुग्णांनी कोरोनाला हरविले

पर्यावरणपूरक अनेक उपक्रम यशस्वी केलेल्या या उद्योगाने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व संगोपन करून ग्रीनवॉल्स (हिरव्या तटबंदी) च्या संकल्पना अस्तित्वात आणल्या आहेत. 'ब्रिमासागर'चे संचालक भरतकुमार सेठीया, व्यवस्थापक दिनकर बेंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपव्यवस्थापक चंद्रकांत भागवत, नरेश पाठक, जयंत अरगडे, सहाय्यक अरविंद इंगळे यांनी त्यासाठी अतिशय परिश्रम घेतलेले आहेत. 2015 साली जिल्ह्यात दुष्काळ आणि मोठी पाणीटंचाई होती. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू होती. पाण्याअभावी अकरा महिने 'ब्रिमासागर'चे उत्पादन ही थांबले होते. मात्र, त्याही परिस्थितीत टँकरने विकत पाणी आणून झाडे जगविण्याचा संकल्प व्यवस्थापनाने तडीस नेला. सतत काळजी घेतल्यामुळे येथे केलेली वृक्षलागवड आणि बहरलेले वृक्ष या संख्येत येथे विशेष तूट झालेली नाही.

हेही वाचा: पुणे-सोलापूर महामार्गावर रसायनमिश्रीत सांडपाण्याचे तळे

शासकीय परिपत्रकासाठी किंवा प्रसिध्दीसाठी आम्ही कोणताही उपक्रम करीत नाही. जे करायचे ते प्रामाणिकपणे करायचे हे आमचे धोरण आहे. कोणतेही काम प्रामाणिकपणे केले की, त्याचे चांगले परिणाम मिळतातच.

- दिनकर बेंबळकर, व्यवस्थापक.

आम्ही केवळ रोपे लावली नाहीत तर, काळजीपूर्वक वाढविली आहेत. त्यामुळे कारखाना परिसरात हरितबन निर्माण झाले आहे. या वनराईमुळे वातावरणातील प्रसन्नता वाढली आहे. या वातावरणामुळे आमचा उत्साहदेखील वाढला असून, त्याचा चांगला परिणाम आमच्या कार्यक्षमतेवर झाला आहे.

- चंद्रकांत भागवत. उपव्यवस्थापक.

(brimasagar of Sripur has got 25 lakh liters of water in a one day)

loading image