शिवसेना, एमआयएम नगरसेवकांवर पालकमंत्र्यांची कृपादृष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dattatraya bharane

दिलेल्या निधीतून विकास कामांचा उद्‌घाटन करण्यासाठी पालकमंत्री आठवड्यातून दोन दिवस सोलापुरात तळ ठोकत आहेत.

शिवसेना, एमआयएम नगरसेवकांवर पालकमंत्र्यांची कृपादृष्टी

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील शिवसेना, एमआयएम, वंचित या नगरसेवकांवर पालकमंत्र्यांची कृपादृष्टी झाल्याने प्रभागातील भकाससृष्टी दूर करण्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. दिलेल्या निधीतून विकास कामांचा उद्‌घाटन करण्यासाठी पालकमंत्री आठवड्यातून दोन दिवस सोलापुरात तळ ठोकत आहेत. एकूण 26 प्रभागापैकी काही मोजक्‍याच प्रभागात झालेली पालकमंत्र्यांची कृपादृष्टी महापालिका निवडणुकीत चमत्कार घडविणार का, या चर्चेला आता ऊत आला आहे.

हेही वाचा: सोलापूर : शहरातील 19 प्रभाग कोरोनामुक्‍त ! जिल्ह्यातील 34 महिला अन्‌ 97 पुरुषांवर उपचार

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप अंतर्गत वाद मिटविण्यात पक्षश्रेष्ठी, शहराध्यक्ष आपली ताकद पणाला लावत आहेत. या प्रयत्नाला थोडेफार यशही मिळाले आहे. तर शहर कॉंग्रेससमोर 113 उमेदवारांची यादी बनविणे आणि पक्षबदलू नगरसेवकांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तर 80 टक्‍के शिवसेना राष्ट्रवादीत विलीनी होणार असल्याने जे राहतील ते आपले या भुमिकेतून शिवसेनेने काम सुरू केले आहे. मात्र, महापालिकेत राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शिवसेना, एमआयएम, वंचित यांना सोबत घेऊन निवडणुकीची फळी मजबूत करण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांकडून होत आहे. प्रारंभीच्या काळात उपरा पालकमंत्र्यांमुळे खुद्द राष्ट्रवादी नगरसेवकांची नाळ पक्षश्रेष्ठींची जुळली नव्हती.

हेही वाचा: सोलापूर : जिल्ह्यात 16 नोव्हेंबरपासून बालसंजीवनी अभियान

मिशन इनकमिंगमध्ये दिग्गज नगरसेवकांचा समावेश होताना दिसताच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीदेखील जवळीकता साधत भेटी-गाठी सोशल मीडियातून प्रभावी अस्तित्व दाखविण्याचे प्रयत्न केले. पक्षप्रवेशासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या नगरसेवकांनीदेखील पालकमंत्र्यांच्या वाड्यातील चकरा वाढविल्या आहेत. शिवसेना, वंचित, एमआयएम पक्षातील ठराविक नगरसेवकांनी पालकमंत्र्यांच्या अवतीभवती घारीसारखे घिरट्या घालून कोट्यवधींची निधी मिळविली. त्या निधीतून करण्यात येत असलेल्या विकास कामांचा उद्‌घाटन कार्यक्रमदेखील तितक्‍याच धुमधडाक्‍यात करण्यात आला. तर गत निवडणुकीत राष्ट्रवादीतून एमआयएम पक्षात गेलेले नगरसेवक पालकमंत्र्यांच्या वाड्यावर नितांत क्षणी भेट घेऊन घरवापसीसाठी गुप्तगू करून निधी खेचून आणण्याचाही प्रयत्न करत आहेत. एरव्ही काम केल्याचा कांगावा करणाऱ्या नगरसेवकांनी निधीबाबत कमालीची गुप्तताही पाळली आहे, हे विशेषच.

हेही वाचा: सोलापूर एसटी विभागाला पाच कोटींचा फटका! 40 कर्मचारी निलंबित

पालकमंत्र्यांभोवती महापालिकेतील राजकारण

सध्या सोलापूर महापालिकेचे राजकारण पालकमंत्र्यांच्या अवती-भोवती घुटमळत असल्याचे दिसत आहे. बाळे येथील कुलदैवत श्री खंडोबाच्या दर्शनासाठी गेल्या सहा महिन्यात प्रभाग क्र. 5 मध्ये पालकमंत्र्याचे दौरे वाढले आहेत. सोलापूर शहरात एकूण 26 प्रभाग आहेत. त्यातील बोटावर मोजण्याइतपत प्रभागात आणि ठराविक नगरसेवकांसोबत पालकमंत्र्यांचे दौरे होतात. शिवसेना, एमआयएम नगरसेवकांवर पालकमंत्र्यांनी निधीतून कृपादृष्टी दाखविली असली तरी मर्यादित स्वरुपातील त्यांचे दौरे, संवाद महापालिका निवडणुकीत सत्तासमीकरण बदलाला मारक आणि तारक ठरणार, याबाबतची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

बातमीदार : प्रमिला चोरगी

loading image
go to top