यामुळे येथे येतात रुग्ण

नानासाहेब पठाडे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

- मांगी येथे गुडघी, मांड, करक या शिवाय जनावरांवरही तीवा, गुगघी, शिलकने या दुर्धर आजारावर मोफत व पारंपारिक पद्धतीने उपचार

- सोलापूर जिल्ह्यासह नगर, पुणे, उस्मानाबाद येथून येतात रुग्ण

-  मांगी ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासून जपली परंपरा

पोथरे ( सोलापूर) : विज्ञानाने प्रगती केली तरी ग्रामीण भागात अद्यापही अनेक ठिकाणी पारंपरिक वैद्यकीय उपचार पद्धती टिकून आहे. मांगी (ता. करमाळा) येथे गुडघी, मांड, करक या शिवाय जनावरांवरही तीवा, गुगघी, शिलकने या दुर्धर आजारावर मोफत व पारंपारिक पद्धतीने उपचार केला जात आहे. आजही या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यासह नगर, पुणे, उस्मानाबाद अश्या अनेक ठिकाणाहून रुग्ण येतात व बरे होऊन जातात. देवाने गावाला दिलेले हे एक वरदान आहे या भावनेतून गावातील ठरावीक लोक दर शनिवारी व रविवारी आलेल्या रुग्णांची मोफत सेवा करत आहेत.

हेही वाचा : सोलापूर जिल्ह्यातील 'या' आमदारांनी घेतली शपथ

परंपरा जपली

विज्ञानाने मानवाचा मेंदू व हृदय काढून बसवण्यात पर्यंत संशोधन केले. असे असताना ही ग्रामीण भागात मात्र पारंपरिक उपचारपद्धती टिकून आहे. पूर्वी हाड मोडले, कावीळ, जखम अशा आजारांवर झाडपाल्याचे उपचार केले जायचे. रुग्णांनाही त्यावरती विश्‍वास असायचा. या प्राथमिक उपचारा बरोबर मंत्र टाकण्याचीही परंपरा असायची. यातून रुग्ण पूर्ण बरे होत. उपचार हा झाडपाल्याचा की मंत्राचा या वरती विचार न करता आजार बरा झाला याला प्रधांन्याने दिले जायचे. तीच परंपरा मांगी ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासून जपली आहे. आजही दर शनिवारी व रविवारी सकाळी सात वाजता गुडघी, मांड, करक, लहानमुलांच्या पोटातीलआलेले रुग्ण पांडुरंगाच्या मंदिराजवळ येऊन बसतात.

तीन शनिवार व रविवार

गावातील ठराविक लोक या रुग्णांना एरंडाचे तेल लावून चोळतात व चोळत चोळत मंत्रही टाकतात. तीन शनिवार व रविवार हा उपचार घेतल्यानंतर रुग्ण पूर्णतः बरे होतात. गुण मंत्राने आला की औषधी वनस्पतीने आला या खोलात न जाता आजही अनेक रुग्ण या ठिकाणी येऊन उपचार घेऊन बरे होत आहेत.

हेही वाचा : पवारांची फत्तेशिकस्त...
या आजारावर केला जातो उपचार
गुडघी, मांड, करक, कुत्रेचावल्यावर, विंचूचावल्यावर, लहाणमुलांच्या पोटातील आलेल्यावर, जनावरांवर तीवा, गुगघी, शिलकने

उपचार करणारे व्यक्ती
राहुल जाधव, नीळकंठ बागल, अमोल गायकवाड, सुभाष बागल, गणेश जाधव, विलास जाधव, पोपट क्षीरसागर, उद्धव नरसाळे, दीपक नरसाळे, देविदास बागल.

70 टक्के फरक

माझ्या लहान मुलाला गुडघी झाली आहे. अनेक ठिकाणी उपचार घेतले परंतु गुडघे वर इलाज झाला नाही दोन शनिवार व रविवार आलो आहे. आता 70 टक्के फरक पडला आहे.

- संग्राम माने, रुग्ण

-

मला गुडघी झाली आहे. दोन शनिवार या ठिकाणी येत आहे आता चांगला फरक पडला आहे.

तुकाराम कारंडे, कर्जत

हेही वाचा : ७९ वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलानांना कळलेच नाहीत

जनसेवा हीच ईश्वर सेवा

मांगी गावाला गुडघी, मांड, आदी आजारांवर इलाज होण्याचे वरदान आहे. असे आमचे पूर्वज सांगत आहेत. रुग्णांवर इलाज करून त्यांना फरक पडल्यानंतर मारूतीला एक नारळ फोडण्याची परंपरा आहे. कुठलीही अपेक्षा न ठेवता आलेल्या रुग्णांवर येथे मोफत इलाज केला जात आहे. आतापर्यंत हजारो लोकांवर हे मोफत उपचार केले असून दर शनिवारी व रविवारी किमान आठ-दहा तरी याठिकाणी येतात. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून गावातील ठराविक लोक हे काम अगदी प्रामाणिकपणे करत आहेत. त्यामुळे आमच्या गावाचे नाव लौकीक झाले आहे.

- सुजीत बागल, सामाजिक कार्यकर्ते, मांगी

-

यापेक्षा दुसरे समाधान नाही

मी लहान असताना आमच्या वडिलांनी आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आम्हाला शिकवण दिली. अनेकांवर उपचार केल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान पाहून मलाही ही समाधान वाटते. आपल्या हातून पीडितांची सेवा घडती यापेक्षा दुसरे समाधान नाही.

- राहुल जाधव, मांगी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is why patients come here