पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'त्या' अधिकाऱ्यांतील वाद चव्हाट्यावर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

  • गैरव्यवहाराचा ठपका असलेल्यांनी मागवली अन्य अधिकाऱ्यांची माहिती 

पिंपरी : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश निघाले आणि अधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध चव्हाट्यावर आले. गैरव्यवहाराचा ठपका ठेवलेल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यापार किंवा धंदा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची माहिती माहिती अधिकारात मागवली आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा जीव पाण्याअभावी होतोय 'पाणी-पाणी'

शैक्षणिक संस्थाचालक म्हणतायेत, 'खर्च भागवायचा तरी कसा?' 

वायसीएम रुग्णालयात साहित्य खरेदीसाठी ठेकेदाराची नियुक्ती केलेली होती. त्याच्याकडून थेट बॅंक खात्यात पैसे स्वीकारल्याचा ठपका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, बायोमडिकल अभियंता सुनील लोंढे आणि कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर यांच्यावर आहे. ठेकेदाराकडील जमा-खर्च नोंदवही आणि लेखापरीक्षण अहवालातही ही बाब नमूद आहे. या प्रकरणी नियुक्त केलेल्या त्रीसदस्यीय चौकशी समितीने त्यांचा अहवाल आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे दिला आहे. त्यानुसार तिघांच्याही खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. डॉ. रॉय यांनी मुलाचा व्यवसाय व बेळगावकर यांनी पत्नीच्या व्यवसायाबाबत कळविलेले नाही, असेही आदेशात म्हटले आहे. 

पिंपरी महापालिकेतील आगामी विरोधी पक्षनेता कोण?, राष्ट्रवादीकडून हे पाच जण इच्छुक 

दरम्यान, महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबातील (प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसहित) व्यापार किंवा धंदा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची माहिती अशा अधिकारी, कर्मचाऱ्यामार्फत महापालिकेस कळविण्यात आलेली आहे. त्या सर्व कागदपत्रांचा जानेवारी 2015 पासूनचा तपशील व त्यासंबंधीची माहिती, त्या सर्व कागदपत्रांचा तपशील व त्यासंबंधी नस्तीतील कागदपत्रे मिळावीत, अशी माहिती डॉ. रॉय यांनी मागविली आहे. 

महापालिकेत चर्चेचा विषय 

महापालिकेतील काही अधिकाऱ्यांची मुले व्यावसायिक आहेत. डॉक्‍टर आहेत. अनेकांच्या मुलांचे महापालिकेत लागेबांधे आहेत. साटेलोटे आहे. काही अधिकारी तर कंत्राटे घेत आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी मुलांच्या, पत्नीच्या व्यवसायाची माहिती महापालिकेला कळवलेली नाही. शिवाय, काही अधिकारी एकमेकांना शह-काटशह देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा महापालिकेत ऐकायला मिळत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dispute between officials of pimpri chinchwad municipal corporation