आता नवरात्रोत्सवावर व्यवसायाची भिस्त; कुंभार व्यावसायिकांना आशा

रमेश मोरे
Thursday, 1 October 2020

  • कुंभार व्यावसायिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न 

जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : "कोरोनामुळे उन्हाळी माठ पडून राहिले. त्यानंतर गणेशोत्सवही गेला. या दोन्ही महत्त्वाच्या सिझनमधे मोठी झळ सोसावी लागली. त्यामुळे दरवर्षी पन्नास हजारांचा लागणारा माल यंदा तीस हजार रुपयांचा भरला आहे. त्यातही किती विक्री होईल ही शंका आहे. आता नवरात्रोत्सवासह दिवाळी सणावर व्यवसायाची भिस्त आहे,'' असे कुंभार व्यावसायिक वंदना कुंभार सांगत होत्या. 

आश्चर्य! रेंज नसतानाही ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण 

जुनी सांगवीतील कुंभारवाड्यात लगबग सुरू आहे, ती पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची. मार्चमध्ये लॉकडाउन झाले. त्यामुळे उन्हाळ्यात लागणाऱ्या पाण्याच्या माठाची विक्री झाली नाही. गणेशोत्सवावरही बंधने आली. मंडळाचे सार्वजनिक गणेशोत्सव नसल्याने घरगुती गणेशमूर्ती विक्रीवरच कुंभार व्यावसायिकांना समाधान मानावे लागले. त्यातही अनेकांनी तोटा सहन करत व्यवसायात तग धरला. आता पुन्हा नव्या आशेने नवरात्रोत्सवाची लगबग कुंभारवाड्यात दिसून येतेय. 

पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटर होणार बंद; कारण ऐकून मिळेल दिलासा

निवृत्त झालेल्या ड्रायव्हर काकांसाठी अतिरिक्त आयुक्त स्वत: बनले ड्रायव्हर!

घटस्थापनेसाठी लागणारे काळ्या मातीचे 'सुगडं' (मडकं) तसेच, गुजराती, कडिया क्षत्रिय समाजबांधवांसाठी लाल मातीतील गरबा (मडके) कुंभारवाड्यात विक्रीला ठेवण्यात आला आहे. जुनी सांगवीत कडिया समाज बहुसंख्येने राहतो. त्यामुळे येथे नवरात्र उत्सवाची मोठी परंपरा आहे. मात्र, कोरोनामुळे सार्वजनिक उत्सवावर बंधने आली आहेत. परंतु, नवरात्रोत्सवासाठी कसे नियम असतील, उत्सव कशा पद्धतीने असेल, गुंतवणूक केलेला सर्व माल खपणार का, अशी चिंता कुंभार व्यावसायिकांना सतावत आहेत. 
 
असे आहेत मडक्‍यांचे दर 

  • काचखडे, लेस, रंगकाम, आकर्षक मणी व दुर्गा मातेचे चित्र असलेला गरबा 130 रुपये 
  • साध्या सजावटीचे 100 रुपये 
  • काळ्या मातीची सुगडी 50 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत 

आगीनं आमची रोजी रोटीच केली खाक; पिंपरीतील दीडशे महिलांचा आक्रोश

 
दरवर्षी उन्हाळ्यात पन्नास हजारांचे माठ व इतर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांच्या विक्रीसाठी गुंतवणूक केली होती. मात्र, भांडवलही निघाले नाही. वस्तू पडून आहेत. 
- कुसुम कुंभार 

यंदा घरगुती गणपतीच विक्रीसाठी ठेवता आले. दरवर्षी विविध प्रकार व उंचीच्या गणेशमूर्तींना मोठी मागणी असते. मात्र, यंदा एक फुटापर्यंतच मुर्त्या तयार कराव्या लागल्या. 
- अनिल कुंभार, मूर्तिकार 

व्यवसायाची स्थिती... 

  • लॉकडाउन काळात माठ विक्री ठप्प झाली 
  • गणेशोत्सवात मूर्तीच्या आकारावर बंधने आली 
  • कच्चा माल व गुंतवणूक करून नुकसान झाले 
  • आता नवरात्रोत्सवासह दिवाळी सणावर भिस्त 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: potters hope to have business on navratri in pimpri chinchwad