esakal | दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइनच घ्या; विद्यार्थी, पालकांची मागणी

बोलून बातमी शोधा

Students parents demand to Take 10th, 12th exams online

दीड महिन्यांनी काय स्थिती असेल, हे कोणालाच स्पष्ट सांगता येत नसल्याने काही विद्यार्थी व पालकांनी ‘ऑनलाइन’च परीक्षा घ्याव्या, असाही मतप्रवाह व्यक्त केला आहे. 

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइनच घ्या; विद्यार्थी, पालकांची मागणी
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सुधारित वेळापत्रकानुसार दहावी, बारावी या दोन्ही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने जाहीर केलेला ऑफलाइन परीक्षेचे वेळापत्रक बारगळले आहे. दीड महिन्यांनी काय स्थिती असेल, हे कोणालाच स्पष्ट सांगता येत नसल्याने काही विद्यार्थी व पालकांनी ‘ऑनलाइन’च परीक्षा घ्याव्या, असाही मतप्रवाह व्यक्त केला आहे.  गतवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर १६ मार्च २०२० पासून शाळा बंदचे आदेश दिले होते. कोरोनाचा मोठा परिणाम शिक्षणावर झाला. यंदा तब्बल १३ महिने शाळा, महाविद्यालय बंद राहिली. शिक्षण संस्थांनी ऑनलाइनने अध्यापन केले. पण शहरात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे, दिवसाला अडीच हजार रुग्ण सापडल्याने पुन्हा धोका वाढतोय हे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. दहावी, बारावीचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांपेक्षा सध्या पालकांत मोठी धास्तीचे वातावरण आहे. सुधारित वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा मे मध्ये तर दहावीची जूनमध्ये होणार असल्याचे जाहीर केले आहे. 

ऑनलाइन परीक्षा घ्यावी. 
ऑनलाइन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित राहील. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा कशासाठी? ऑनलाइन सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. नाहीतर दहावीच्या मुलांना पहिली व अकरावीप्रमाणे पुढच्या वर्गाच प्रमोट करावे. ऑनलाइन परीक्षेचा निर्णय योग्यच आहे. महामंडळाने दीड महिन्यांनी उद्‌भवणाऱ्या स्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा. 
- इखलास सय्यद, पालक सेंट ॲन्ड्र्युज स्कुल 

हे वाचा - उद्या मध्यरात्रीपासून ‘लॉकडाउन’? पंधरा दिवस पुन्हा टाळेबंदीचे संकेत

‘‘कोरोनाची दिवसेंदिवस भयावह होणारी परिस्थिती लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दहावी व बारावी परीक्षा घेण्याऐवजी शासनाने चालू वर्षी अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण करण्याबाबत निर्णय घ्यावा.’’ 
-एस.. ए. बोरसे , एक पालक 

सुलभतेचा विचार करावा 
कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करून ऑफलाईन परीक्षा घेतल्‍याने बाधित होण्याची भीती मुलांमध्ये आहे. त्यामुळे पारंपरिक परीक्षा पध्दतीपेक्षा यंदा ऑनलाइन परीक्षा घ्यावी. काठिण्य पातळीऐवजी सुलभतेचा विचार केला पाहिजे. असे वाटते. 
- आकांक्षा कांबळे, दहावी -विद्यार्थिनी, प्रेरणा हायस्कूल 

मुंबईकरांनो जरा जपून.... वाचा चिंता वाढवणारी बातमी

परीक्षा घ्यावी 
‘‘करियरसाठी बारावीचे वर्षाला फार महत्त्व असते. पुढील जीवनाची दिशा यावर ठरत असल्यामुळे याकडे विद्यार्थ्यांपेक्षा पालकांची भीती अनाठायी वाटते. यामध्ये मुले, पालकांची नकारात्मकता सोडली तर ऑफलाईन परीक्षा निर्णयाचे सर्वांनी स्वागत करावे.’’ 
-ओंकार डोंगरे, बारावी -विद्यार्थी, गेंदीबाई ताराचंद चोपडा कनिष्ठ महाविद्यालय 

मुलांच्यादृष्टीने ऑनलाइन परीक्षा 
कोरोना परिस्थितीचा विचार करूनच परीक्षा महामंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतु मुलांच्यादृष्टीने ऑनलाइन परीक्षा घेणेच सुरक्षित राहील. असाही वर्षभर अभ्‍यास हा ऑनलाइनच केलेला आहे. 
-हरी पानचावरे, विद्यार्थी, विद्याविनय निकेतन माध्यमिक विद्यालय 

पुन्हा ‘लॉकडाउन’? पुन्हा शेअर खरेदीची संधी?
 

ऑनलाइन घ्याव्यात 
‘‘दहावी - बारावीचे वर्ष मुलांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात. कारण मुलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. ’’ 
-बीजी गोपकुमार, सीएमएस स्कूल, मुख्याध्यापिका 

स्‍मार्ट फोन नाहीत 
‘‘ऑफलाईन परीक्षा घ्यावी, कारण मुलांकडे स्‍मार्ट फोन नाहीत. 
रेंजची समस्या येऊ शकते. मुलांच्या आरोग्‍याची काळजी घेउन परीक्षा घ्यावी.’’ 
-विक्रम काळे, प्राचार्य, गेंदीबाई ताराचंद चोपडा कनिष्ठ महाविद्यालय

मुंबईकरांनो जरा जपून.... वाचा चिंता वाढवणारी बातमी