‘Financial Dating’ म्हणजे काय? तुम्ही कधी गेलाय का अश्या डेटवर? काय बोलायचं असतं अश्या वेळी जाणून घ्या..

फेब्रुवारी महिना म्हणजे सर्व तरुणाईला भुरळ पाडणारा आणि हवाहवासा वाटणारा...
Financial Dating
Financial Dating esakal

सेक्शन : विशेष

आनंद पोफळे
anandpophale@gmail.com


फेब्रुवारी महिना म्हणजे सर्व तरुणाईला भुरळ पाडणारा आणि हवाहवासा वाटणारा... कारण तरुणांमध्ये उत्सुकता असते ती १४ फेब्रुवारीची म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ची. पूर्वी एखादं फुल किंवा एखादी भेटवस्तू देऊन आपलं प्रेम व्यक्त केला जाणारा हा दिवस, पण आत्ता याची परिभाषा बदलली आहे.

बदललेल्या लाईफस्टाईलमध्ये अनेक जण या ‘व्हॅलेंटाईन डे’चे सेलिब्रेशन करतात. आपणही आपल्या प्रियजनांसाठी भेटवस्तू देणे, सरप्राईज गिफ्ट्स, बाहेर जेवण असे ग्रँड प्लॅन नक्कीच करत असाल.

यंदाच्या वर्षी ‘हटके’ काय करायचं याचा विचारही एव्हाना सुरु झाला असेल. मग या वर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने आपल्या प्रियजनांसोबत ‘फायनान्शियल डेट’वर गेलो तर? कशी वाटते कल्पना? या लेखात आपण एका अनोख्या पद्धतीने ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा कसा करू शकाल, याचा आढावा घेऊ.


‘फायनान्शियल डेट’ची खरच गरज आहे का, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. कारण डेट म्हटलं की कँडललाईट डिनर, रोमँटिक भेट असेच चित्र डोळ्यासमोर उभे राहील, यात शंका नाही आणि या उलट ‘फायनान्शियल डेट’ म्हणजे काहीतरी रूक्ष असणार, त्याला खूप वेळ लागेल आणि याची गरज आहे का, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.

पण जरा खोलात विचार केला, तर आपण आपल्या जोडीदाराला आपल्या आर्थिक बाबींबद्दल सर्व माहिती देऊन दोघांनीही त्याबद्दल सखोल चर्चा केल्यास नात्यातली खोली अधिक वाढेल, असे नाही का वाटत?


बऱ्याचदा आपण नवे संबंध प्रस्थापित करताना जोडीदाराबद्दल जी माहिती घेतो, त्यात त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल अधिक खोलात जाऊन माहिती घेत नाही.

याबाबत थोडा वरवरचा विचार केला जातो. खरं तर नवदाम्पत्यामध्ये देखील आर्थिक बाबींवर चर्चा होणे अधिक गरजेचे आहे; अन्यथा आर्थिक बाबींत भ्रमनिरास होण्याचा अधिक संभव असतो.

अमेरिकेतील अॅरिझोना विद्यापीठामध्ये केलेल्या एका रिसर्चनुसार, जे जोडीदार आपल्या आर्थिक बाबी एकत्र सांभाळतात, ते दीर्घकाळ एकमेकांसोबत चांगले आयुष्य व्यतीत करू शकतात.

मग या वर्षी आपण देखील आपल्या सुखी आणि समाधानी, एकत्र आयुष्याच्या या प्रवासात या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘फायनान्शियल डेट’ने सुरवात केल्यास नक्कीच हा प्रवास अधिक सुखकर होईल.

‘फायनान्शियल डेट’ म्हणजे नक्की काय?

आता या ‘फायनान्शियल डेट’मध्ये नक्की करायचे काय, हाच पहिला प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. थोडक्यात, ‘फायनान्शियल डेट’ म्हणजे आपल्या जोडीदारासोबत आपल्या आर्थिक बाबींबद्दल खुलेपणाने चर्चा करणे.

मग यात सध्याची आर्थिक स्थिती, भविष्यातील उद्दिष्ट्ये, ती गाठण्यासाठी आपण एकत्रपणे काय करू शकतो यासंबंधीची चर्चा. तेव्हा यासाठी तयारी करणे पण आलेच. आपली तयारी पूर्ण असेल तरच ही ‘डेट’ रंगतदार ठरेल आणि परिणामकारकही होईल.

अतुल व अनघा यांची ‘फायनान्शियल डेट’

अतुल (वय ३२ वर्षे) आणि अनघा (वय २८ वर्षे) यांचे लग्न होऊन साधारण चार वर्षे झाली. मुलांचे संगोपन आणि संसारातील इतर जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी अनघाने गेली तीन वर्षे ‘ब्रेक’ घेतला.

नुकतेच नवे घर आणि गाडी घेतल्याने कर्जाचे EMI वाढले होते आणि एकूणच आर्थिक बाबींमध्ये थोडी ओढाताण होऊ लागली, अनघाला जॉब करणे शक्य नसल्याने सध्या केवळ अतुलच्या पगारातच सर्वकाही भागवताना काही अडचणी येऊ लागल्या.

अनघा आणि अतुल एकमेकांना खूपच चांगल्या पद्धतीने समजून घेत होते आणि त्यांनी एक संपूर्ण आठवडा एकत्रपणे आपल्या आर्थिक घडीचा आढावा घेतला आणि पुढील आर्थिक उद्दिष्ट्य गाठण्यासाठी एकत्र कसे प्रयत्न करता येतील, याची चर्चा केली.

संसारातील जबाबदारीमुळे अनघाला पूर्णवेळ जॉब करणे शक्य नसले तरी अतुलने तिला तिच्या आवडीचे ‘बेकिंग’चे प्रोफेशनल स्कील जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि लगेच शक्य नसले तरी अजून एखाद्या वर्षाने अनघा आपला स्वत:चा व्यवसाय चालू करू शकेल अशा उद्देशाने प्लॅनिंग सुरु केले.

अनघानेही नव्या उत्साहाने संसारातील जबाबदाऱ्या सांभाळत बेकरी आणि पेस्ट्री आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला आणि अवघ्या वर्षभरात तिने आपला केक मेकिंगचा व्यवसाय सुरु केला. अनघाचा आता या व्यवसायात जम बसला आहे, तिला जमेल अशाच ऑर्डर ती घेते आणि अतुलसोबत घरखर्चाची जबाबदारी देखील!


अनघा आणि अतुलने एकत्रपणे आणि मोकळेपणाने आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला, भविष्यातील आर्थिक उद्दिष्ट एकत्र पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

अडचणीत असताना एकमेकांना समजून घेत, एकमेकांना आधार देत, आर्थिक भविष्याबाबत आशावादी विचार करून त्यासाठी योग्य निर्णय घेणेही त्यांची ‘फायनान्शियल डेट’च नव्हती का?

‘फायनान्शियल डेट’साठी पूर्वतयारी

यासाठी आपण अगदी साध्या आणि सोप्या गोष्टींपासून सुरवात करू शकता. पूर्वतयारी म्हणून पुढील गोष्टींपासून सुरवात करता येईल-


• सर्व बँक खात्यांचा आढावा आणि खर्चाचे विभागीकरण
सर्वप्रथम आपल्या सर्व बँक खात्यांची माहिती एकत्र करू शकता आणि सध्या किती रक्कम आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्या खात्यामध्ये आहे, त्याचा अंदाज येईल.
याच्यापुढे जाऊन मागील एक वर्षाच्या उत्पन्न आणि खर्चाचे विभागीकरण करू शकता.


मागील वर्षात आपल्या सर्व खात्यामध्ये मिळून किती उत्पन्न जमा झाले याचा आढावा घ्या. तसेच खर्चाचे पुढीलप्रमाणे विभागीकरण करू शकता
१. घरखर्चासाठी केलेली रक्कम
२. इन्शुरन्स प्रीमियमसाठी खर्च केलेली रक्कम
३. कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्यासाठी दिलेली रक्कम
४. गुंतवणुकीसाठी वापरली असणारी रक्कम
वरील माहिती आपण एखाद्या एक्सेल शीटमध्ये लिहिल्यास उत्तम.

या खेरीज आपली मागच्या वर्षात याच दिवशी किती शिल्लक होती आणि या वर्षी ती किती आहे हे देखील पाहता आले तर आपली सध्याची आर्थिक स्थिती काय आहे, हे लक्षात येईल.
याच अनुषंगाने आपल्या उत्पन्नामधील किती रक्कम गुंतवणुकीसाठी जाते, याचा अंदाज येईल.

• आपल्या गुंतवणुकीची माहिती एकत्र करा.
आपण नियमित करत असलेल्या गुंतवणुकीची सर्व माहिती एक्सेल शीटमध्ये भरू शकता. उदाहरणार्थ,
- आपला पीएफ बॅलन्स
- एफडी, पीपीएफ बॅलन्स
- म्युच्युअल फंड, शेअरमधील गुंतवणूक
- सोने-चांदीमधील गुंतवणूक

• आपल्या कर्जासंबंधी माहिती लिहून ठेवा.
- गृहकर्ज, कारलोन, पर्सनल लोन आदी घेतले असल्यास आताच्या घडीला किती कर्ज फेडणे शिल्लक आहे आणि अजून किती वर्षांसाठी कर्ज राहिले आहे, याची माहिती देखील लिहून ठेवा.

• आपल्या इन्शुरन्स कव्हरचा आढावा घ्या.
- आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांसाठी कोणत्या प्रकारचा इन्शुरन्स घेतला आहे, त्याची माहिती एकत्र लिहून ठेवा. हेल्थ, लाईफ, पर्सनल ॲक्सिडेंट, क्रिटिकल इलनेस यांसारख्या इन्शुरन्सची माहिती लिहून ठेवा.

अशी कराल ‘फायनान्शियल डेट’

आपल्या पार्टनरला यासंबंधी आधी कल्पना देऊन यासाठी दोघांचा वेळ याकरिता राखून ठेवा. घरीच भेटण्यापेक्षा एखाद्या निवांत कॉफी शॉपमध्ये देखील आपण भेटू शकाल, शक्यतो गर्दी नसलेली वेळ निवडा. आपला लॅपटॉप सोबत ठेवा.

प्रत्यक्ष भेटीत शक्यतो भूतकाळातील चुका उगाळत बसण्यापेक्षा आता यापुढे आपली आर्थिक घडी कशी नीट बसवता येईल, यावर अधिक चर्चा करा. आपण केलेल्या पूर्वतयारीनुसार आपण पुढील मुद्द्यावर अधिक फोकस करू शकता-

१. आपली सध्याची आर्थिक स्थिती कशी आहे, यात आपले सेव्हिंग किती होते आहे, आता किती गुंतवणूक आहे, कर्ज किती शिल्लक आहे; तसेच इन्शुरन्स कव्हर किती आहे, याची कल्पना आपल्या पार्टनरला द्या. याबद्दल त्यांचे मत जाणून घ्या.
२. आपले भविष्यातील आर्थिक उद्दिष्ट काय आहे, याबद्दल एकत्र चर्चा करा. यात नजीकच्या भविष्यात येणारे मोठे खर्च, त्यासाठीची तरतूद; तसेच आपली आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी आपण एकत्र काय प्रयत्न करू शकतो, याबाबत देखील चर्चा करा. उदाहरणार्थ, सध्या उत्पन्नाच्या २० टक्के सेव्हिंग होत असेल तर त्यामध्ये कशा प्रकारे वाढ करून आपली गुंतवणूक वाढवत नेत आर्थिक उद्दिष्ट वेळेत पूर्ण करू शकतो, या पर्यायांचा विचार करता येईल.
३. आपल्या आर्थिक प्रवासातील धोके ओळखून त्यासाठी आपण कोणते इन्शुरन्स कव्हर घेणे आवश्यक आहे, याचा देखील आढावा घ्या. उदाहरणार्थ, साधारण ४० वर्षानंतर आरोग्यासंदर्भात येणारे खर्च लक्षात घेऊन हेल्थ इन्शुरन्स कव्हर वाढवता येईल का? किंवा आपल्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन पुरेसे लाईफ इन्शुरन्स कव्हर घेतले आहे का, यावर देखील चर्चा करा.
४. आपली ही ‘डेट’ अधिक रंगतदार करण्यासाठी आपण आपल्या जोडीदारासोबत पुढील ५ वर्षांत, १० वर्षांत स्वत:साठी किंवा आपल्या कुटुंबासाठी काय नियोजन करत आहात, हे देखील शेअर करा. तसेच त्यांनादेखील त्यांचे नियोजन काय आहे, हेदेखील आवर्जून जाणून घ्या. यामध्ये आपल्या करिअरबद्दलचे नियोजन, एखादे नवे स्कील शिकणे, कुटुंबासोबत इंटरनॅशनल ट्रीप याबाबतच्या नियोजनाबाबत देखील चर्चा करू शकता.
५. आपल्या जोडीदाराची आवड जोपासून त्याच्या आवडीचे पर्यावसन व्यवसाय किंवा कामात करता येईल का, याचादेखील आपण विचार करू शकता, यातूनच भविष्यातील आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यास नक्कीच मदत होईल.
६. आपल्या ‘विल प्लॅन’बद्दल देखील आपण जरूर चर्चा करू शकता.

Financial Dating
Valentines Day : ‘व्हॅलेंटाइन’चा आनंद होणार द्विगुणित ; ४० जोडप्यांचा नोंदणी पद्धतीने ‘प्रेमविवाह’

वरील चर्चेतून ठळक गोष्टी लिहून ठेवा, जेणेकरून आपण त्यावर आठवणीने काम करू शकाल.

अर्थात ही ‘डेट’ एकदाच करण्यापेक्षा आता सुरवात करून नियमितपणे करत राहणे नक्कीच फायदेशीर ठरेल. या प्रवासात एकत्र राहून आणि एकमेकांना आधार देत आपला आर्थिक प्रवास अधिक सुखकर करण्याची ‘कमिटमेंट’ एकमेकांना नक्की द्या आणि न विसरता पुढच्या ‘डेट’ची वेळ आणि ठिकाण आताच निश्चित करा.


वरील गोष्टींसाठी वयाचे बंधन नक्कीच नाही आणि याआधी आपण कधी अशा प्रकारे ‘व्हॅलेंटाईन डे’ला ‘फायनान्शियल डेट’ प्लॅन केली नसेल, तर हा अनुभव एकदा नक्कीच घ्या आणि आपल्या जोडीदारासोबत आर्थिक भविष्याची स्वप्नं रंगवत हा प्रवास एकत्रपणे करून अधिक सुखकर करा.

मग करताय ना, आपल्या जोडीदारासोबत या ‘व्हॅलेंटाईन डे’ला ‘फायनान्शियल डेट’? आणि देताय ना आपल्या प्रियजनांना एखादी अर्थपूर्ण भेट? आपला पहिल्या ‘फायनान्शियल डेट’चा अनुभव नक्की कळवा. आपल्या एकत्र आर्थिक प्रवासास अनेक शुभेच्छा!


आपल्या प्रियजनांना ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त द्या अर्थपूर्ण भेट!

‘व्हॅलेंटाईन डे’ फक्त आपल्या जोडीदारासोबतच नाही, तर आपल्या प्रियजनांसाठी मनापासून भावना व्यक्त करण्याची एक चांगली संधी आहे. यात आपले पालक, भावंडं, मुलांचा देखील समावेश आहे.


या प्रेमाच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांचे भविष्य आणि आर्थिक गरजा सुरक्षित करण्याहून अधिक चांगली भेट काय असू शकेल?


अर्थपूर्ण भेटीसाठी अशा काही चांगल्या कल्पना, ज्यांचा आपण जरूर विचार करू शकता-
१. आर्थिक घडामोडींबाबत अधिक सजगता येण्यासाठी ‘सकाळ मनी’च्या अंकाची वार्षिक वर्गणी भेट म्हणून देऊ शकाल.
२. आपल्या प्रियजनांसाठी हेल्थ इन्श्युरन्स, टर्म इन्श्युरन्स यांसारखी उपयुक्त भेट देखील देऊ शकता.
३. आपल्या जोडीदारासाठी डी-मॅट अकाउंट उघडू शकता आणि त्यात काही शेअर घेण्यासाठी पैसे ट्रान्स्फर करु शकता किंवा त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड खरेदी करू शकता.
४. अगदी साधी, सोपी गिफ्ट म्हणजे काही रकमेचे ‘किसान विकास पत्र’ आपण भेट देऊ शकता.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आणि विमर्श कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संचालक आहेत. मोबाईल ७७२०००६४५३)

------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com