महाराष्ट्रात माळीण आणि ईशाळवाडीसारख्या घटना का घडतायेत? 'आयआयटी'च्या संशोधनातून गंभीर बाब समोर

landslide in Maharashtra : पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली भीती
landslide in Maharashtra
landslide in Maharashtra esakal

मुंबईतील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीने (IIT) केलेल्या संशोधनातून भारताच्या पश्चिम प्रदेशात होणारी जमिनीची धूप ही मागील तीस वर्षात ९४ टक्क्याने वाढली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यात महाराष्ट्र राज्याची टक्केवारी ९७ टक्के आहे. तर तामिळनाडू राज्यात ही धूप वाढ १२१ टक्के झाली आहे. एकूणच भारताच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर असून यामुळे भविष्यात माळीण आणि ईशाळवाडीसारख्या घटना महाराष्ट्रात पुढेही घडू शकतील असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

आयआयटीने केलेले संशोधन नेमके काय?

पश्चिम प्रदेशातील मातीची धूप (Soil Erosion) ही गेल्या तीस वर्षात ९४ टक्क्याने वाढली आहे. यामध्ये गुजरात पासून ते महाराष्ट्र, गोवा, केरळ, तामिळनाडू पर्यंतच्या राज्यांतर्गत येणाऱ्या पश्चिम प्रदेशाचा अभ्यास करण्यात आला आहे. १९९० ते २०२० दरम्यान ही धूप कशी वाढत गेली हे या संशोधनातून समोर आले आहे

भारताचा पश्चिम प्रदेश जगातील वारसास्थळ

भारताची गुजरातपासून ते केरळ तामिळनाडूपर्यंत पश्चिम किनारपट्टी किंवा पश्चिम प्रदेश हा युनेस्कोने (UNESCO) जागतिक वारसास्थळ (world heritage) म्हणून घोषित केलेला आहे. पृथ्वीवरील ३६ जैवविविधता (Biodiversity)असलेल्या ठिकाणांमध्ये हा पश्चिम प्रदेश आहे. अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी, पक्षी जे फक्त याठिकाणीच आढळतात

जमिनीची धूपवाढ कोणत्या राज्यात किती झाली?

  • तामिळनाडू १२१ टक्के

  • गुजरात ११९ टक्के

  • महाराष्ट्र ९६ टक्के

  • केरळ ९० टक्के

  • गोवा ८० टक्के

  • कर्नाटक ५६ टक्के

जमिनीची धूप होणे म्हणजे काय?

भू भागावरील मातीचे एका जागेवरुन दुस-या जागेवर स्थलांतर होणे म्हणजेच जमिनिची धूप होय. प्राणी व वनस्पती यांची हालचाल तसेच पर्जन्य यांचे परिणाम तसेच मानवी हस्तक्षेपामुळे भूपृष्ठावरील मातीचे कण एकमेकांपासून विलग होतात. असे हे विलग झालेले कण वारा व जमिनीवरुन पावसाचे वाहणारे पाणी यांच्या बरोबर वाहून नेले जाते व अशा प्रकारे जमिनीची धूप होते.

भारताच्या पश्चिम प्रदेशात ही धूप का वाढली आहे?

पश्चिम प्रदेशात धूप वाढण्याच्या कारणांमध्ये वातावरणातील बदल आणि जमिनीचे चुकीचे व्यवस्थापन ही प्रमुख दोन कारणे आयआयटीने नमूद केली आहेत. तज्ज्ञांच्या मते झाडे कापली गेली हे कारण आहेच पण फक्त हेच कारण नाही तर अनेक दगडखाणींचे काम (mining) होते आहे, डोंगर पोखरले जात आहेत. त्यामुळे ही धूप फार मोठया प्रमाणात होते आहे.

जमिनीची धूप न होणे का आवश्यक?

जमिनीच्या पृष्ठभागावरील वरच्या स्तरातच पिकांना पोषक अन्नद्रव्यांचा साठा असतो. हा वररचा स्तरच धुपेने वाहून गेल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते. जमिनींची धूप होवून त्यातील मुरुम, रेती, दगड, गोटे इत्यादि प्रवाहाबरोबर वाहत आल्याने सुपिक जमिनी निकामी होतात आणि सर्व सुपीक जमीन पाण्यासोबत वाहून जाते. त्यामुळे नदीत गाळ निर्माण होतो. जमिनीची पाणी साठविण्याची क्षमता कमी होऊन जमिनीत पाणी जिरणे कमी होते. त्यामुळे पाण्याची टंचाई (Water shortage) निर्माण होऊ शकते. धुपेमुळे जमिनींचे लहान लहान तुकडे पडतात , जमीन भुसभुशीत होते. त्यामुळे भूस्खलन (land sliding) होऊ शकते जे मानव आणि एकुणातच नैसर्गिक अधिवासासाठी घातक ठरू शकते.

पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ म्हणतात...

जिथे डोंगर पोखरले जातायेत, सपाटीकरणाच्या नावाखाली ट्रकच्या ट्रक भरून नेल्या जातायेत, गाळाने नद्या भरल्या जातायेत आणि यातून पाण्याचे प्रवाह बदलून पूर येतायेत, गावाच्या गावं उद्वस्थ होताना आपल्याला दिसतायेत तरीही याचे अजून काय परिणाम आपल्याला हवे आहेत.

जमिनीची धूप झाली नाही की जमिनीची पकड घट्ट असते. माळीण आणि इर्शाळवाडीसारख्या घटनांच्या बाबतीत अनेकदा जमिनीची धूप खूप प्रमाणात झाल्याने तेथील जमिनीचे भूस्खलन होते. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात अशा मोठ्या घटना घेण्याचे प्रमाण वाढले आहे. गावंच्या गावं गाडली गेली आहेत. या सगळ्याविषयी मी माझ्या पुस्तकांमध्ये देखील सविस्तरपणे लिहिले आहे. हे थांबले नाही तर कदाचित आणखी अनेक गावांच्या बाबतीत या गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आयआयटीने सांगितलेले उपाय:

१) स्थानिक शासकीय कार्यालये आणि आयआयटीने एकत्रित काम केल्यास शक्य

हे संशोधन करणारे आयआयटी मुंबईचे प्राध्यापक पेन्नम चिन्नासामी यांनी सांगितले की, या परिस्थितीने धोरणकर्त्यांसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे. या परिस्थितीवर संबंधित राज्यांत प्रभावित क्षेत्रांवर मातीची धूप रोखण्याचे काम केले पाहिजे. प्रदेशिक पातळीवर जी स्थानिक कार्यालय आहेत त्यांच्या माध्यमातून मातीचे संवर्धन केले पाहिजे. यासाठी आयआयटी मुंबई या कार्यालयांना सल्ला देण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी शासनाशी हातमिळवणी करण्यास तयार आहे.

२) शास्त्रीय पद्धतीने आणि डेटाच्या आधारे यावर काम होणे आवश्यक

याबाबत प्रा.पेन्नम चिन्नासामी सांगितले यांनी की, या विषयावर ज्या ठिकाणी मातीची धूप सर्वाधिक झाली आहे अशा केंद्रांवर काम होणे गरजेचे आहे. आयआयटीकडे असणाऱ्या डेटाच्या आधारे शास्त्रीय पद्धतीने सरकार किंवा पर्यावरण विषयक संस्थांनी पुढे येत यात काम केल्यास हे मृदा संवर्धन करणे आणि ही धूप कमी करणे शक्य होईल.

३) स्थानिकांनी एकत्र येत आवाज उठवणे आवश्यक आहे.

उपायांबाबत बोलताना माधव गाडगीळ म्हणाले, मोठ्या प्रमाणात जी खाणकाम चालतात या विरोधात तेथील स्थानिकांनी एकत्र येत त्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनेने अनेक अधिकार दिले आहेत त्याचा वापर करून निसर्गाची हानी करणाऱ्या प्रकल्पांना विरोध दर्शविणे शक्य आहे.

-------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com