'ही' चौदा कारणे असतील तर तुम्ही रक्तदान करू शकत नाही

blood donation
blood donation esakal

रक्तदान (Blood Donation) हे श्रेष्ठदान मानले जाते. भारताची लोकसंख्या १३५ कोटींपेक्षा जास्त असूनही केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात, परिणामतः फक्त ७४ लाख ते सव्वा कोटी लाख लिटर रक्त संकलित होते. रक्त न मिळाल्यामुळे घडणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे. पण तुम्हाला माहिती आहे का 'ही' चौदा कारणे असतील तर तुम्ही रक्तदान करू शकत नाही..

डॉ. अविनाश भोंडवे

श्वास थांबला आणि हृदयाची धडधड बंद झाली म्हणजे मनुष्य मृत झाला, असे आपण म्हणतो. कारण श्वास घेणे आणि हृदयाचे स्पंदन चालू असणे ही माणसाच्या जिवंतपणाची मुख्य लक्षणे असतात. श्वासातून मिळणारा प्राणवायू रक्तातील तांबड्या रक्तपेशीतून शरीरातील सर्व पेशींना, उतींना आणि त्यांनी बनलेल्या अवयवांना पुरवला जातो.

साहजिकच जिवंत राहण्यासाठी गरज असते ती प्रवाहित राहणाऱ्या रक्ताची. रक्त हा आपल्या शरीरातील अत्यावश्यक घटकांपैकी एक असतो. रक्तप्रवाह आणि त्यातील घटक योग्य प्रमाणात असतील तरच शरीरातील सर्व संस्थांची सर्व कार्ये सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडतात.

शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेकदा रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होतो. अशा वेळेस त्याच्या शरीरातील रक्तपेशींशी जुळणारे रक्त एखाद्या सुदृढ व्यक्तीच्या शरीरातून काही प्रमाणात काढून घेऊन त्या रुग्णाला दिले जाते. बहुतेक रक्तदाते, स्वयंसेवकाच्या भूमिकेतून स्वखुशीने आणि विनामोबदला रक्त देतात, म्हणून या प्रक्रियेला रक्ताचे ‘दान’ म्हणजेच रक्तदान म्हणतात.

blood donation
Blood Sickness : रक्त विकारांना घेऊ नका सहजासहजी

रक्तदानाची गरज

अनेक प्रकारच्या आजारात आणि विकारात रुग्णांना रक्त देण्याची गरज भासते. मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

महाराष्ट्र राज्यात विविध आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. यातील ७० ते ७५ टक्के गरज पर्यायी बदली रक्तदाते किंवा व्यावसायिक रक्तदात्यांकडून भागविली जाते.

रक्तदानाची आवश्यकता साधारणतः खालील शारीरिक परिस्थितीमध्ये भासते.

अॅनिमिया : सर्वसाधारण कारणांमुळे दवाखान्यात येणाऱ्या व्यक्तीत कुपोषणामुळे, मूळव्याधीत रक्तस्राव खूप झाल्याने, मासिक पाळीत सातत्याने जास्त रक्तस्राव होत गेल्यास रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप खालावलेले दिसते.

सामान्यतः रक्तातील हिमोग्लोबिनची (Hemoglobin) पातळी, १०० मिलिलिटर रक्तामध्ये, १३ ते १५ मिलीग्रॅम (१३ ते १५ टक्के) असावी लागते. ही पातळी काहीशी कमी असल्यास औषधे किंवा इंजेक्शने आणि योग्य प्रथिनयुक्त आहार देऊन वाढवता येते. मात्र कित्येकदा काही रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण सहा टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी झाल्याचे आढळून येते. अशा वेळेस त्यांना रक्त देण्याचा निर्णय घ्यावा लागतो.

मोठे ऑपरेशन : पोटावरील किंवा अन्य दीर्घकाळ चालणाऱ्या काही शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाच्या शरीरातून रक्तस्राव होण्याची शक्यता असते. अशावेळेस रक्त देणे आवश्यक ठरते. त्यासाठी शस्त्रक्रियेच्या आधीच रक्तपेढीत रक्ताच्या मागणीची नोंद करण्यास सांगितली जाते.

अपघात : गंभीर अपघातात अनेकदा शरीरावर, हातापायांवर, डोक्यात खोल जखमा होतात, अंतर्गत अवयवांना दुखापत होऊन शरीराच्या आत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त कमी होते आणि रुग्णाला त्वरित रक्त देण्याची गरज भासते.

कर्करोगाच्या रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी किंवा नंतर रक्त देण्याची आवश्यकता असते.

बाळंतपणात पोस्ट-पार्टम हॅमरेज आणि तत्सम गंभीर कारणांमध्ये, रुग्णाला रक्त देण्याची परिस्थिती निर्माण होते.

नवजात बालकांना काही जन्मजात विकारात रक्त भरावे लागते.

हिमोफिलिया आणि थॅलसेमिया अशासारख्या आनुवंशिक विकारांमध्ये रुग्णांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण सतत आणि दीर्घकाळ कमी होत जाते. त्यामुळे त्यांना वरचेवर रक्त देणे हा उपचाराचाच एक भाग बनतो.

गंभीररित्या भाजलेल्या रुग्णांत, शरीरातील पाणी तसेच रक्त आणि रक्तातील पेशी नष्ट होतात. त्यांना रक्त देणे नितांत आवश्यक असते.

blood donation
Health Care News: उपाशी पोटी ही पाने चावा, दिवसभर कंट्रोलमध्ये राहील Blood Sugar

रक्तदानासंबंधी समज-गैरसमज

रक्त दिल्याने अशक्तपणा येतो. ही एक प्रचलित असलेली चुकीची समजूत आहे. मानवाच्या शरीरामध्ये साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्यावेळी केवळ ३०० मिलिलिटर रक्त काढले जाते.

प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमध्ये रक्तातील पाण्याचे प्रमाण वाढून शरीरातली रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमध्ये रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही. २४ ते ४८ तासांत रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन पुन्हा जैसे थे होते.

रक्तदान केल्याने तुम्ही आजारी पडू शकता. हे खोटे आहे, कारण रक्तदान सुरक्षित आणि पूर्ण निरामय असते.

वृद्ध लोक रक्त देऊ शकत नाहीत. हे अर्धसत्य आहे, कारण जो कोणी निरोगी आहे आणि पात्रता निकष पूर्ण करतो तो रक्तदान करू शकतो. रक्तदात्याचे रक्त घेण्यापूर्वी त्याच्या आरोग्याची आणि रक्त देण्याच्या पात्रतेसंबंधी पूर्ण तपासण्या आणि चौकशी डॉक्टरांकडून केली जाते. साधारणपणे १८ ते ६० वयाच्या स्त्रीपुरुषांनी रक्तदान करण्यास हरकत नसते.

जर कोणी काही दीर्घकाळ औषधे घेत असेल, त्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाही. हे खरे आहे. ज्या व्यक्तींना रक्तदाब, मधुमेह अशा आजारांची औषधे दीर्घकाळ चालू असतील, तर त्यांच्या रक्तातील त्या औषधांचे अंश रक्त घेणाऱ्या रुग्णाच्या शरीरावर परिणाम करू शकतात.

रक्त देणे वेळखाऊ आहे. हे चुकीचे आहे, कारण रक्तदाता रक्तपेढीत किंवा शिबिरात गेल्यानंतर होणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेस सहसा एक तासापेक्षा कमी वेळ लागतो.

तुम्ही रक्त दिल्यास तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. हे धादांत चुकीचे आहे, कारण रक्तदानासाठी वापरलेली सर्व उपकरणे निर्जंतुक आणि डिस्पोजेबल असतात.

blood donation
Health Tips : तुम्हीही कामाच्या नादात ८ तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसून राहता काय? जाणून घ्या तोटे

रक्तदानासाठी पात्रता

रक्तदान करणाऱ्या दात्यांसाठी खालील निकष पाळले जातात-

  1. वय १८ ते ६५ वर्षांच्या असावे.

  2. वजन ४५ किलोग्रॅमच्या वर पाहिजे.

  3. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असावे

  4. रक्तदाता पूर्णपणे निरोगी असणे आवश्यक आहे.

  5. निरोगी पुरुषांना दर ३ महिन्यांनी आणि स्त्रियांना ४ महिन्यांच्या अंतराने जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते.

रक्तदानासाठी अपात्र कोण ठरते?

  1. हिपॅटायटीस-बी आणि सी, टीबी, एचआयव्ही असे रक्तातून संक्रमित होणारे आजार असलेली व्यक्ती

  2. कुष्ठरोगाचा त्रास असलेली व्यक्ती

  3. कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा रुग्ण रक्तदान करू शकत नाही.

  4. दम्याशी संबंधित कोणताही आजार असलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.

  5. कुठल्याही रिक्रिएशनल किंवा अमली पदार्थांचे इंजेक्शन घेतले असेल तर रक्तदान करता येत नाही.

  6. रक्तदात्याने रक्तदान करण्याच्या १५ दिवस आधी कॉलरा, टायफॉईड, प्लेग यांची लस घेतलेली असेल तसेच रक्तदानाच्या एक वर्षापूर्वी रेबीजची लस घेतली असेल, तर त्यालाही रक्तदान करता येत नाही.

  7. दातांवरील उपचार सुरू असल्यास रक्तदान करण्यासाठी तुम्हाला २४ तास थांबावे लागते. दातांशी संबंधित मोठे उपचार सुरू असतील तर महिनाभर रक्तदान करता येत नाही.

  8. गर्भवती महिलांनी बाळाच्या जन्मानंतर किमान ९ महिने आणि बाळाने स्तनपान सोडल्यानंतर ३ महिने रक्तदान करू नये.

  9. रक्तदात्याने आधीच्या तीन दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतलेले असल्यास.

  10. रक्तदात्याला मागील ३ महिन्यांत मलेरिया झाला असल्यास.

  11. रक्तदात्याला मागील एका वर्षात विषमज्वर, कावीळ किंवा श्वानदंश होऊन त्याने रेबीजची लस घेतली असल्यास.

  12. ६ महिन्यांपूर्वी रक्तदात्याची मोठी शस्त्रक्रिया झाली असल्यास.

  13. ब्लड प्रेशर लो किंवा हाय असणाऱ्यांनी रक्तदान करताना रक्तदाबाची चाचणी करून पाहावी.

  14. उपाशीपोटी किंवा खाल्ल्यावर अर्धा-तासापर्यंत रक्तदान करू नये.

blood donation
Coffee For Health : खरंच कॉफी प्यायल्याने ब्लड प्रेशर वाढतं का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

रक्तदानाचे फायदे

  1. रक्तदान हे सर्वात महान दान मानले गेले आहे. ज्या रुग्णाला रक्त‍ दिले जाते त्यालाच रक्तदानाचा लाभ होतो असे नाही, तर रक्तदान करणाऱ्यालाही अनेक बाबतीत फायदा होतो.

  2. रक्तदानामुळे तुमच्या रक्ताची नियमितपणे तपासणी होते.

  3. रक्तदानामुळे तुम्हाला तुमचा रक्तगट कळू शकतो. रक्तदात्याच्या कार्डवर रक्तगट लिहिलेला असतो.

  4. रक्तदानामुळे मनुष्याचे हृदय आरोग्यपूर्ण बनते. कारण शरीरातील अतिरिक्त क्षार (मीठ) रक्तदानाद्वारे निघून जाते.

  5. रक्तदान करणाऱ्यांना जे रक्तदाता कार्ड मिळते, त्यामुळे त्यांना कधीही आपत्कालीन गरज पडल्यास रक्त मिळू शकते.

  6. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या शस्त्रक्रियांमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

रक्तदानानंतर रक्ताचा वापर

रक्तदानात गोळा केलेल्या रक्ताचा वापर संपूर्ण रक्त, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा अशी विविध रक्त उत्पादने तयार करण्यासाठी केला जातो. यामध्ये लाल पेशी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा, क्रायोडप्लेटेड प्लाझ्मा आणि क्रायोप्रेसिपिटेट अशा घटकांचा समावेश असतो. थोडक्यात आपण रक्ताची एक बाटली देतो, त्यातून निरनिराळ्या पाच व्यक्तींच्या जीवनाला पुन्हा पालवी फुटू शकते.

blood donation
लहान मुलांनी अस्थिर, चंचल असणं हे ADHD चे लक्षण आहे का?

रक्तदान प्रक्रियेतील टप्पे

रुग्णाला रक्त देण्यापूर्वी काही गोष्टी टप्प्याटप्प्याने केल्या जातात. रुग्णाचे रक्त आणि रक्तदात्याचे रक्त क्रॉसमॅच केले जाते. याकरिता जरी ते दोन्ही रक्तनमुने एकाच रक्तगटाचे असले, तरी ते एकत्रित केल्यावर त्यांच्यात काही प्रतिक्रिया होऊन रक्त गोठते का, हे पहिले जाते.

रुग्णांची रक्तदानासाठी संमती आणि त्याच्या आरोग्याची पार्श्वभूमी आणि त्याच्या आजाराचा इतिहास अभ्यासावा लागतो. लार्ज बोअर इंट्राव्हेनस सुई रुग्णांच्या हातावरील नीलेमध्ये टोचली जाते. त्यातून सलाईन देतात त्याप्रमाणेच रक्त दिले जाते.

रक्त देताना त्याचा वेग, पहिल्या १५ मिनिटांसाठी साधारणतः मिनिटाला २ मिलिलिटर म्हणजे तासाला १२० मिलिलिटर ठेवला जातो. नंतर तासाला १५० ते २५० मिलिलिटरपर्यंत किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाढवता येतो. सर्वसाधारपणे, रक्त देण्याची प्रक्रिया चार तासापर्यंत पूर्ण करावी, असा संकेत आहे.

एखाद्या रुग्णाला रक्त द्यावयाचे झाल्यास, त्याच्या वजनाच्या दर किलोमागे १० ते १५ मिलिलिटर, म्हणजे ५० किलो वजन असल्यास ५०० ते ७५० मिलिलिटर, असा संकेत आहे. जर रुग्णाला त्यापेक्षा जास्त रक्त देण्याची गरज असल्यास, रक्ताची एक पिशवी लावल्यानंतर दुसरी कालांतराने लावली जाते.

रुग्णाला एका पाठोपाठ एक असे जास्त प्रमाणात रक्त दिल्यास, त्याच्या रक्ताभिसरणामध्ये अतिरिक्त वाढ (सर्क्युलेटरी ओव्हर लोड) किंवा फुप्फुसात पाणी (पल्मनरी इडीमा) होण्याची शक्यता असते. त्यात रुग्ण अधिक गंभीर होऊ शकतो. म्हणूनच रुग्णामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी असल्यास, पॅक केलेल्या लाल रक्तपेशींचे रक्त (पीसीव्ही) दिले जाते.

blood donation
Ayurvedic Health Tips : ऑक्टोबर महिन्यात हे आयुर्वेदीक पदार्थ खा, तुम्ही कधीच आजारी पडणार नाहीत

रक्तदान शिबिरे

रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही आणि दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त माणसांना देणे सुरक्षित नसते. त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसे पाहता, कोणीही निरोगी व्यक्ती कोणत्याही मान्यताप्रत रक्तपेढीत जाऊन रक्तदान करू शकते.

पण असे स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांची संख्या खूपच मर्यादित असल्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठवण्यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित करावी लागतात. ब्लड बँकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये फक्त चार ते पाच आठवड्यांपर्यंत रक्त सुरक्षित ठेवता येते.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्यांकडून भागविली जाते.

भारताची लोकसंख्या १३५ कोटींपेक्षा जास्त असूनही केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात, परिणामतः फक्त ७४ लाख ते सव्वा कोटी लाख लिटर रक्त संकलित होते. रक्त न मिळाल्यामुळे घडणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे.

आधुनिक डिजिटल तंत्रामध्ये मानवी शरीरातील पेशी कृत्रिमरित्या तयार करण्याबाबतचे संशोधन यशस्वी झाले आहे. भावी काळात त्या तंत्रज्ञानातून रक्तपेशी आणि रक्तातील इतर घटक तयार करणे शक्य होईल, असा संशोधकांचा दावा आहे. असे झाल्यास रक्तदान आणि रक्तदानाची शिबिरे कदाचित कालबाह्य होतीलही. परंतु तोपर्यंत तरी रक्तदानाचे महापुण्य पदरी पडून घेणे मानवतेच्या दृष्टिकोनातून नितांत गरजेचे आहे.

=====

blood donation
Israel Attack : इस्त्राईलवरील हल्ल्यांचा महिला, मुलांवर मानसिक धक्का

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com