Premium: Ganpati Utsav: गावातल्या नदीवरून मातीचा गोळा आणून त्यातून मूर्ती घडवताना माझी तंद्री लागायची‌

Eco-friendly Ganesha: माती परीक्षण करूनच तयार होणाऱ्या मूर्ती तयार करताना ते दोषविरहित माती असावी यावर भर देतात..
eco friendly ganesha
eco friendly ganeshaEsakal
Updated on

पृथा वीर

पर्यावरणाची हानी व ग्राहकांची फसवणूक लक्षात घेत सलग पाच वर्षं मेहनत घेतली. पुन्हा गाव गाठलं. लाल माती, काळी चिकणमाती, मुरूम, पोयटा, कॅल्शियमयुक्त माती एकत्र करून जैविक माती तयार केली.

माझे वडील, आजोबा गणपती मूर्ती करायचे. हळूहळू मलाही तो छंद लागला. गावातल्या नदीवरून मातीचा गोळा आणून त्यातून मूर्ती घडवताना माझी तंद्री लागायची‌. मी काही ठरवून या क्षेत्रात आलो नाही, पण कदाचित ही सेवा माझ्या प्रारब्धात होती. आता मात्र मी पूर्णवेळ शाडू मातीच्या गणपती मूर्ती तयार करतो. मूर्ती लहान असो की मोठी, मला वेळ तितकाच लागतो. माझी आवड, कला कधी माझ्या आराधनेत बदलली हे मला कळलेच नाही,’’ या शब्दांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या मंगलमूर्ती कला केंद्राचे संचालक प्रमोद डवले आपल्या भावना व्यक्त करतात.

गणेशोत्सवाचे वेध लागले, की लोकांची पावलं मंगलमूर्ती कला केंद्राकडे आपोआप वळतात. त्याला कारणही तसंच आहे. डवले केवळ शाडू मातीच्या मूर्तीच घडवत नाहीत, तर शाडू मातीसुद्धा स्वतः तयार करतात. माती परीक्षण करूनच तयार होणाऱ्या मूर्ती तयार करताना ते दोषविरहित माती असावी यावर भर देतात.

‘‘वीस वर्षांपूर्वी हौस म्हणून मी मूर्ती तयार करायचो. मित्र, ओळखीच्या व्यक्तींना‌ २०-२२ मूर्ती तर अगदी सहजच करून द्यायचो. हळूहळू मी गणेशोत्सवाच्या काळात व्यावसायिकरित्या मूर्ती करायला सुरुवात केली आणि आता मी पूर्णवेळ हेच काम करतो.‌ २० वर्षांच्या या वाटचालीत मी खूप बदल पाहिले. सुरुवातीला लोकांना शाडू मातीचं महत्त्व पटायचं नाही. नंतर नंतर मात्र ग्राहक जोडले गेले आणि आता संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आपली मूर्ती निवडतात.’’

स्वतः माती करण्याकडे कसे वळालात हे विचारल्यावर ते सांगतात, ‘‘सुरुवातीला गंमत झाली. जी माती मी शाडू माती म्हणून विकत घ्यायचो ती बॉम्बे क्ले निघाली. ग्राहकांनी तक्रार केली, की तुमच्या मूर्तीचं विघटन होत नाही. ही बाब मी खूप मनावर घेतली. माझी मूर्ती पर्यावरणपूरकच असावी हा माझा आग्रह होता. फायर क्ले असू दे किंवा चायना क्ले किंवा बॉम्बे क्ले, या क्लेपासून तयार होणाऱ्या मूर्तीचं विसर्जन केल्यावर त्या मातीतून अंकुर येत नाही. ज्या कुंडीमध्ये ही माती टाकली जाते त्यातील रोपटं मरून जातं. पर्यावरणाची हानी व ग्राहकांची फसवणूक लक्षात घेत मी सलग पाच वर्षं मेहनत घेतली. पुन्हा गाव गाठलं.

eco friendly ganesha
Premium|Ganesh Festival: गणेशाच्या भक्तिरसाचा आनंदोत्सव

लाल माती, काळी चिकणमाती, मुरूम, पोयटा, कॅल्शियमयुक्त माती एकत्र करून जैविक माती तयार केली. मातीच्या गुणधर्माचा अभ्यास करताना या मातीत गहू पेरल्यावर अंकुर फुटले. वेळ गेला, पण मला दोषविरहित माती तयार करता आली.’’ संशोधनातून तयार झालेल्या जैविक मातीला त्यांनी ‘प्रथमांकूर’ नाव दिलं. ही माती पूर्णपणे पर्यावरणपूरक अर्थात जैविक असल्याचं प्रमाणपत्रही एमजीएमच्या कृषी विज्ञान केंद्र प्रयोगशाळेतून मिळालं आहे.

हेच वेगळेपण पाहून या मूर्ती इतक्या प्रसिद्ध झाल्या, की आता दरवर्षी मूर्तींना मागणी वाढत गेली. केवळ छत्रपती संभाजीनगर नव्हे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मूर्ती जाऊ लागल्या. यंदा तर पुण्यासह कॅनडा, दुबईला मूर्ती गेल्या. दरवर्षी जैविक शाडूची मागणी वाढतच आहे. अंकुरित जैविक मातीचा केवळ लाल रंग असलेल्या मूर्ती आणि रंग नसलेल्या मातीच्या मूर्ती आवर्जून नेल्या जातात.

‘‘आजवर हजारो मूर्ती तयार करताना आणि शहराचं नाव सातासमुद्रापार नेताना आनंद तर होतोच, आणि समाधानही मिळतं. तुमच्या मूर्ती खूप सुंदर आहेत, आम्ही आता तुमच्याकडूनच मूर्ती नेणार असे ग्राहक म्हणतात, तेव्हा ही श्रीगणेशाची कृपा आहे असे वाटते,’’ डवले सांगतात.

(पृथा वीर दै. सकाळच्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीमध्ये बातमीदार आहेत.)

---

सगुण सुंदर!

तुषार संगीता आत्मा गुरूम

गणू साकारताना एक कलाकार म्हणून आपली परीक्षा असते, पण या परीक्षेचा निकाल कायम १०० टक्केच लागतो. कारण बाप्पाची प्रत्येक मूर्ती गोंडसच होते. हा माझ्या कार्यशाळेचा दांडगा अनुभव आहे. जेव्हा बाप्पाचं स्वरूप पूर्णत्वाकडे जात असतं, त्यावेळी एका कलाकारासाठी तो भावनिक क्षण असतो. कलेच्या अधिपतीला साकारण्याची संधी असते ती, तो क्षण शब्दात व्यक्त करणं अवघड आहे.

बाप्पा प्रत्येकाच्याच जवळचा असतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण एका कलाकारासाठी तर बाप्पा म्हणजे जीव की प्राणच असतो. मीही एक कलाकार म्हणून काम करत असताना माझं बाप्पाशी एक वेगळं नात जोडलं गेलं आणि हा बाप्पा माझ्यासाठी ‘गणू’ झाला.

आमच्या घरी आमच्या पूर्वजांपासून कधीच कुणी बाप्पाची स्थापना केली नव्हती. पण मला नेहमी वाटायचं, की आपल्या घरीपण गणू यावा, आपण सुंदर देखावे करावेत, त्यांत गणूची स्थापना करावी. अखेर मी नववीत असताना खूप हट्ट करून गणूला घरी आणण्यासाठी घरच्यांना तयार केलं. एका कलाकाराच्या घरातला बाप्पा नेहमी त्या कलाकाराच्या हातूनच घडतो. मग काय, घेतली माती आणि केलं काम सुरू! पहिल्या वर्षापासून आत्तापर्यंत मी पर्यावरणपूरक बाप्पाची स्थापना करत आहे.

eco friendly ganesha
Ganesha Chaturthi: बाप्पांचा हेल्दी डाएट!नैवेद्याला आहारशास्त्राच्या दृष्टीने खास महत्त्व

गणूचा सगळीकडे वास असतो. या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत त्याचं अस्तित्व असतं, असं माझं मत आहे. त्यामुळे नकळतच निसर्ग हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय झाला. म्हणूनच ठरवलं, की आपण पर्यावरणपूरक मूर्ती तयार करायची. सर्वांनीच ‘पर्यावरणपूरक बाप्पा’ हा विचार पुढे नेला, तर नक्कीच त्याचा निसर्गाला फायदा होईल या विचारानं मागच्या वर्षी मी ‘ट्री गणेशा’ कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेत पूर्णपणे पर्यावरणपूरक लाल मातीची बाप्पाची मूर्ती साकारून गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना राबवली. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे यात आम्ही एक रोपट्याचं बीज टाकलं, जेणेकरून विसर्जनानंतर तोच बाप्पा निसर्गरूपाने कायमसाठी आपल्यासोबत राहतो.

गणू साकारताना एक कलाकार म्हणून आपली परीक्षा असते, पण या परीक्षेचा निकाल कायम १०० टक्केच लागतो. कारण बाप्पाची प्रत्येक मूर्ती गोंडसच होते. हा माझ्या कार्यशाळेचा दांडगा अनुभव आहे. जेव्हा बाप्पाचं स्वरूप पूर्णत्वाकडे जात असतं, त्यावेळी एका कलाकारासाठी तो भावनिक क्षण असतो. कलेच्या अधिपतीला साकारण्याची संधी असते ती, तो क्षण शब्दांत व्यक्त करणं अवघड आहे. गणू माझ्या आयुष्यात माझ्या जवळच्या मित्रांपैकी सगळ्यात वर आहे. त्याचं आणि माझं नातं जगापलीकडचं आहे. तो कायम माझ्या सोबत राहावा या विचारानंच या कार्यशाळेचा जन्म झाला आणि आता दरवर्षी आम्ही ही कार्यशाळा घेतो.

एक माणूस म्हणून जगताना गणू माझा आधार आहे. कलाकृती घडवताना तो माझा गुरू आणि आयुष्यात तो माझा आदर्श आहे. त्याचं माझं नातं अनामिक आहे. तो माझ्या आयुष्यात सर्वस्व आहे, ही माझी एकट्याची नाही, तर प्रत्येक कलाकाराची भावना आहे. ज्यावेळी हा गणू त्याच्या सगुण रूपातून निसर्गाच्या निर्गुण रूपात जातो, त्यावेळी एक कलाकार म्हणून त्याचा आनंद होतोच, पण एक भक्त म्हणूनही शांतता आणि सुख प्राप्त होतं!

(तुषार संगीता आत्मा गुरूम बीए साहित्यिक मराठी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाचे नाशिकस्थित विद्यार्थी आहेत.)

------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com