Testosterone Therapy: अधिक जोमदार वाटण्यासाठी पुरुषांसाठीची 'टेस्टोस्टेरॉन' थेरपी किती उपयोगी?

त्या औषधात काय आहे? ते किती प्रमाणात आहे? त्याचा खरंच उपयोग होतो का? आपण ही औषधे घेणे कितपत योग्य आहे? यांचा विचार न करता ही औषधे घेणे आरोग्याच्या दृष्टीने हे खूपच धोक्याचे ठरू शकते.
testosterone therapy
testosterone therapy esakal

टेस्टोस्टेरॉन थेरपी घ्यावी किंवा नाही याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा. वयोमानानुसार उद्‍भवणाऱ्या बदलांसाठी टेस्टोस्टेरॉनचा काडीमात्रही उपयोग होत नाही, तरीही चिरतरुण राहण्यासाठी अनेकांना तो एक जालीम उपाय वाटू लागतो. म्हणूनच टेस्टोस्टेरॉनचे फायदे, त्याच्या मर्यादा आणि तोटे याबद्दल माहिती असावी लागते.

डॉ. अविनाश भोंडवे

बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व या जीवनप्रवासातल्या पायऱ्या सर्व स्त्रीपुरुषांच्या आयुष्यात येत असतात.

पुरुषांमध्ये वयाची पन्नाशी उलटली की शरीराचा जोम कमी होऊ लागतो. आजवर उत्साहात कामे केली, पण आता दमल्यासारखे वाटू लागते.

दिवसातली धावपळ, हालचाली नेहमीच्याच असतात; पण दिवस संपला की अंगातली ऊर्जा संपल्याची जाणीव होत जाते.

शरीर अशक्त आणि स्नायू कमजोर वाटू लागतात. कामवासना कमी होते, लैंगिक कार्यक्षमता उताराला लागते.

अगदी कालपरवापर्यंत आकाशात उंच उडणारा पतंग, दोर कापल्यासारखा भिरभिरू लागतो आणि खाली खाली झेपावू लागतो.

ही सर्व लक्षणे साहजिकच शरीर वृद्धत्वाकडे झुकल्याची असतात. मात्र याचे मुख्य कारण पुरुषांच्या शरीरात असणारा टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी कमी होऊ लागलेली असते.

वाढत्या वयातही तरुण आणि अधिक जोमदार वाटण्यासाठी अनेक पुरुषांना टेस्टोस्टेरॉन थेरपी दिली जाते. वृद्धत्वाच्या सावल्यांनी आयुष्य झाकोळू लागल्यावर टेस्टोस्टेरॉन थेरपी अनेकांना आशादायक वाटू शकते.

वयोमानानुसार उद्‍भवणाऱ्या बदलांसाठी टेस्टोस्टेरॉनचा काडीमात्रही उपयोग होत नाही, तरीही चिरतरुण राहण्यासाठी अनेकांना तो एक जालीम उपाय वाटू लागतो.

त्याकरिता टेस्टोस्टेरॉनचे फायदे, त्याच्या मर्यादा आणि तोटे याबद्दल माहिती असावी लागते.

टेस्टोस्टेरॉनची कार्ये

टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांच्या अंडकोषात तयार होणारा एक हार्मोन असतो. त्याची कार्ये म्हणजे -

  • हाडे मजबूत करणे

  • शरीरामध्ये चरबीचे वितरण करणे

  • स्नायूंची ताकद आणि आकारमान वाढवणे

  • दाढी आणि वरच्या ओठांवर मिशा, तसेच शरीरावर केसांची वाढ करणे

  • लाल रक्तपेशींच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवणे

लैंगिक इच्छा

अंडकोषामधील शुक्राणूंची निर्मिती करण्यास प्रेरित करणे

टेस्टोस्टेरॉनच्या निर्मितीतील कमतरता

वयोमानः पौगंडावस्थेपासून आणि प्रौढत्वाच्या सुरुवातीपर्यंत टेस्टोस्टेरॉनची पातळी शिखरावर असते. वाढत्या वयानुसार टेस्टोस्टेरॉनची पातळी हळूहळू कमी होऊ लागते. साधारणतः वयाच्या ३०व्या वर्षांनंतर ती दरवर्षी १ टक्क्याने कमी होत जाते.

हायपोगोनॅडिझमः अंडकोषाच्या किंवा अंडकोष नियंत्रित करणाऱ्या पिट्यूटरी ग्रंथीच्या विकारामुळे टेस्टोस्टेरॉन तयार करण्याच्या क्षमतेत जन्मजात अडथळा येतो.

शरीरातील टेस्टोस्टेरॉनची कमतरता, इंजेक्शन्स, गोळ्या, पॅच किंवा जेलच्या स्वरूपात केल्या जाणाऱ्या टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीद्वारे पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेची चिन्हे आणि लक्षणे सुधारता येतात.

टेस्टोस्टेरॉनची पातळी नैसर्गिकरित्या कमी झाल्यामुळे पुरुषांच्या आरोग्यात काही चिन्हे आणि लक्षणे दिसू लागतात.

शारीरिक बदलः शरीरात मेदवृद्धी होणे, स्नायूंची संख्या आणि ताकद कमी होणे, हाडांची घनता कमी होणे, केस गळणे, नैसर्गिक ऊर्जेची पातळी घटणे.

गायनॅकोमॅस्टियाः साधारणतः पुरुषांचे स्तन छातीलगत असतात. टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे पुरुषांच्या स्तनांमध्ये मेदवृद्धी होऊन ते मोठे होतात, त्यांना सूजही येऊ शकते.

लैंगिक कार्यः लैंगिक इच्छा कमी होणे, झोपेच्या दरम्यान लैंगिक उत्स्फूर्तता न होणे, वंध्यत्व येणे.

भावनिक बदलः स्वयंप्रेरणा, आत्मविश्वास, उत्साह, मानसिक एकाग्रता, स्मृती या भावनिक आणि बौद्धिक क्रिया क्षीण होऊ लागतात. मनोवृत्ती उदास होते. आवडत्या गोष्टीतले स्वारस्य कमी होणे लक्ष केंद्रित करण्यात किंवा गोष्टी लक्षात ठेवण्यात त्रास होणे असे भावनिक बदल लक्षात येतात.

बरेच महत्त्वपूर्ण नैदानिक निष्कर्ष आणि महत्त्वाचे आजार टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या पातळीशी संबंधित असतात असे निरनिराळ्या आजारांबाबत गेल्या ३०-३५ वर्षात झालेल्या अनेक संशोधनांतून (एपिडेमियोलॉजिकल स्टडीज) सिद्ध झाले आहे.

यामध्ये ऑस्टिओपोरोसिस (कॅम्पियन अॅण्ड मॅरीकिक, २००३), अल्झायमर डिसीज (मोफट आणि इतर, २००४), कमजोरी, लठ्ठपणा (स्वार्टबर्ग, वॉन मुहलेन, सुंडस्फजॉर्ड आणि इतर, २००४), मधुमेह (बॅरेट कॉनर, १९९२), हायपरकोलेस्टेरोलेमिया (बॅरेट-कॉनर, १९९२),

हायपरकोलेमिया (पॉटेलबर्घ आणि इतर, २००३), उच्च रक्तदाब (फिलिप्स आणि इतर, १९९३), अचानक हृदयक्रिया बंद पडणे (टॅपलर आणि कातझ, १९७९; कोंटोलिऑन आणि इतर, २००३), आणि इस्कीमिक हृदयरोग (बॅरेट- कॉनर आणि खाव १९८८) आदी अभ्यास महत्त्वाचे आहेत.

कोरोनाच्या जागतिक साथीत आपण पाहिले, की कोरोनाची लागण होण्याची आणि आजार गंभीर होण्याची शक्यता वृद्धांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होती.

टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे असे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता कितपत वाढते? आणि अशा संसर्गजन्य आजारांच्या उपचारांमध्ये टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी उपयुक्त ठरू शकते का? या आणि इतर अनेक अनुत्तरित प्रश्नांवर जगभरात अनेक ठिकाणी संशोधने होत आहेत.

यापैकी काही चिन्हे आणि लक्षणे, औषधांचे दुष्परिणाम, झोपेत अडथळा आणणारा स्लीप अॅप्निया, थायरॉईडचे विकार, मधुमेह आणि नैराश्य यामुळेही उद्‍भवत असतात. या कारणांमुळेही टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होत असल्याने टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंटमुळे ही लक्षणे काबूत येऊ शकतात.

निदान

टेस्टोस्टेरॉनच्या पातळीचे निदान करण्यासाठी रक्त चाचणी केली जाते. साधारणपणे ४० ते ५० वर्षे वयात १०० मिलीलिटर रक्तामध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी २५२ ते ९१६ नॅनोग्रॅम, तर ५० ते ५९ वर्षांच्या वयात २१५ ते ७७८ नॅनोग्रॅम असते.

रक्तातील टेस्टोस्टेरॉनच्या पातळीमध्ये दैनंदिन तफावत असते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर पातळी वाढलेली दिसून येते. ती ७०० नॅनोग्रॅमपर्यन्त राखली जाऊ शकते. त्याकरिता तपासणीसाठी रक्ताचे नमुने नेहमी सकाळी ११च्या आधी घ्यावे लागतात.

रक्ताच्या चाचणीत पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी नॉर्मल पातळीपेक्षा खूप जास्त आढळल्यास त्यांच्या अंडकोष किंवा अधिवृक्क ग्रंथींमध्ये ट्यूमर असू शकतो.

पण चाचणीमध्ये ती पातळी कमी आढळली तर तो जुनाट आजार, बिघडलेली चयापचय क्रिया, वेगवेगळ्या विषारी पदार्थांचा संपर्क, काही विशिष्ट औषधी किंवा औषधे, पिट्यूटरी ग्रंथीतील अडथळे किंवा आनुवंशिक परिवर्तनशीलतेचाही परिणाम असू शकतो.

महिलांमध्येदेखील ही चाचणी केली जाते. ज्या महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त आढळते, त्यांना अधिवृक्क ग्रंथीचा किंवा अंडाशयाचा कर्करोग असण्याची शक्यता असते. तसेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोममध्येही ही पातळी जास्त असते.

टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असल्यामुळे ओव्ह्युलेशन दरम्यान स्त्रियांचे बीजांड विकसित होत नाही किंवा बीजांड कोषाच्या बाहेर पडत नाही. ज्या स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी अत्यंत कमी असते त्यांना अॅडिसन्स डिसीज हा पिट्यूटरी ग्रंथीचा विकार असू शकतो.

चाचणी परिणामांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी नॉर्मल नसल्याचे दिसून आल्यास, मान्यताप्रत डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार घ्यावेत.

तारुण्य आणि चैतन्य

हायपोगोनॅडिझममुळे उद्‍भवणाऱ्या लक्षणांत टेस्टोस्टेरॉन थेरपीमुळे उत्तम सुधारणा होते, पण नैसर्गिकरित्या आलेल्या वृद्धत्वाच्या लक्षणांमध्ये टेस्टोस्टेरॉन थेरपीचा फायदा होतोच, असे दिसून येत नाही.

टेस्टोस्टेरॉन औषधे घेतल्याने आपण तरुण दिसतो आणि आपला जोम वाढतो असे अनेक पुरुषांना वाटते. परंतु निरोगी पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन वापरल्याने काही फायदे होतात असे संशोधकांना आढळून आलेले नाही.

अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन्सच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, टेस्टोस्टेरॉन थेरपीमुळे काही पुरुषांच्या लैंगिक कार्यात थोड्याबहुत प्रमाणात सुधारणा होते. परंतु त्यामुळे चैतन्य आणि ऊर्जा वाढते असे सिद्ध करणारे शास्त्रीय पुरावे नाहीत.

टेस्टोस्टेरॉन थेरपीचे धोके

कारणांशिवाय घेतलेल्या टेस्टोस्टेरॉन थेरपीमध्ये विविध धोके उद्‍भवू शकतात-

स्लीप अॅप्निया ः झोपेच्या संदर्भातील हा संभाव्य गंभीर विकार उद्‍भवतो, यात झोपेमध्ये व्यक्ती घोरते आणि त्याचा श्वासोच्छ्वास वारंवार थांबतो व सुरू होतो.

वृद्धत्वातही चेहऱ्यावर आणि पाठीवर मुरमे उठणे.

टेस्टोस्टेरॉन थेरपीमध्ये कर्करोग नसलेली प्रोस्टेटची वाढ अनेकांत आढळून येते, परंतु उपचाराआधीपासून प्रोस्टेटचा कर्करोग असल्यास तो बळावतो.

ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथे केलेल्या एका संशोधनात, (डेव्हिड जे. हँडल्समन आणि इतर, २०२३) नव्याने मधुमेह झालेल्या, पण हायपोगोनॅडिझम नसलेल्या १,००७ व्यक्तींना, दर १२ आठवड्यांनी एक अशी टेस्टोस्टेरॉनची इंजेक्शन्स दोन वर्षे सलग दिली गेली. त्या व्यक्तींचे सर्वेक्षण पाच वर्षांपेक्षा जास्त काळ केले गेले. त्यातून सिद्ध झालेल्या निष्कर्षांमध्ये-

  • टेस्टोस्टेरॉन थेरपीचा मधुमेहावर कोणताही परिणाम होत नाही.

  • थेरपीमध्ये प्रोस्टेटचा कर्करोग कोणालाही झाल्याचे आढळले नाही.

  • हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजारात वाढ झाल्याचे आढळले नाही.

  • स्लीप अॅप्नियाच्या विकारांचा प्रादुर्भाव झालेला दिसला.

गायनॅकोमॅस्टिया ः

  • पुरुषांमध्ये स्तनवृद्धी होणे.

  • शुक्राणूंची निर्मिती कमी होणे

  • अंडकोष लहान होणे.

रक्तातील लाल रक्तपेशींची संख्या वाढते. यामुळे रक्ताची गुठळी होऊन, ती रक्तप्रवाहातून फुप्फुसात जाण्याची शक्यता असते. त्यातून पल्मोनरी एम्बोलिझम ही गंभीर स्थिती उद्‍भवून रक्तप्रवाह अवरोधित होऊ शकतो.

टेस्टोस्टेरॉन थेरपीमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, असेही काही संशोधनात दिसून आले आहे.

--------------

testosterone therapy
आयुर्वेदिक सौंदर्य थेरपी कार्यशाळा

टेस्टोस्टेरॉन थेरपी घ्यावी किंवा नाही याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा. हा उपचार घेतल्यास जोखीम जास्त आहे का? त्यातून फायदा होईल का हे डॉक्टरांना ठरवू द्यावे. टेस्टोस्टेरॉन थेरपीची शिफारस करण्यापूर्वी डॉक्टर कदाचित टेस्टोस्टेरॉनची पातळी कमीतकमी दोनदा तपासायला सांगू शकतात.

अनेक वर्तमानपत्रात, टेलीव्हिजनवर आणि इंटरनेटवर जोमवर्धक औषधांच्या जाहिराती असतात. अनेक व्यक्ती त्या जाहिरातीतील बलदंड व्यक्तीच्या चित्राला भाळून ती औषधे वर्षानुवर्षे घेत राहतात.

त्या औषधात काय आहे? ते किती प्रमाणात आहे? त्याचा खरंच उपयोग होतो का? आपण ही औषधे घेणे कितपत योग्य आहे? यांचा विचार न करता ही औषधे घेणे आरोग्याच्या दृष्टीने हे खूपच धोक्याचे ठरू शकते.

नैसर्गिक वृद्धत्वातून उद्‍भवणाऱ्या लक्षणांसाठी, विशेषतः लैंगिक कार्यातील लक्षणांसाठी, टेस्टोस्टेरॉन थेरपीचा उपचार योग्य नसतो.

टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत घट व्हायला कारणीभूत असलेला वैद्यकीय विकार नसल्यास, वजन कमी करणे आणि जिममधील स्नायूवर्धक अनेरोबिक व्यायाम करणे असे टेस्टोस्टेरॉन वाढवण्याचे नैसर्गिक मार्ग आचरणात आणावेत.

नैसर्गिक उपचारांमध्ये आहार आणि व्यायाम महत्त्वाचे असतात. आहारामध्ये अधिक प्रमाणात प्रथिने, डी-अॅसपार्टिक अॅसिड दररोज ६ मिलीग्रॅम, झिंक, मॅग्नेशिअम, ड जीवनसत्त्व दररोज किमान ३३०० इंटरनॅशनल युनिट, डिहायड्रोएपिअॅन्ड्रोस्टेरॉन (डीएचसीए) सप्लिमेंट, अश्वगंधा यांचा समावेश असणे उपयुक्त असते.

कमी चरबीयुक्त आहार आणि संतृप्त चरबी, कोलेस्टेरॉल आणि शर्करायुक्त कर्बोदकांमधे जळजळ वाढविणारे अन्न दोन्ही टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करू शकतात. याच सोबत नियमित व्यायाम, ताणतणावांचे नियंत्रण आणि पुरेशी झोप आवश्यक असते.

-------------------

testosterone therapy
कोरियातील मुलींना आवडतेय 'स्लॅप थेरपी'; काय आहे हे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com