IFFI : गोव्यात झालेला यंदाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) विशेष ठरला तो अशा समकालीन प्रश्नांच्या मांडणीमुळे..

सोशल नेटवर्किंगपासून निसर्गाला आव्हान देणाऱ्या प्रयोगांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांपासून पती-पत्नीच्या नात्यातल्या अंतरापर्यंत किती तरी गोष्टी यंदा ‘इफ्फी’मध्ये उलगडल्या. या चित्रपटांवर एक नजर...
iffi
iffiesakal

आपल्या अवतीभोवतीचा सगळा अवकाशच बदलत असताना चित्रपटांसारख्या माध्यमानं या बदलाची दखल घेतली नसती तरच नवल. गोव्यात झालेला यंदाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) विशेष ठरला तो अशा समकालीन प्रश्नांच्या मांडणीमुळे.

सोशल नेटवर्किंगपासून निसर्गाला आव्हान देणाऱ्या प्रयोगांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांपासून पती-पत्नीच्या नात्यातल्या अंतरापर्यंत किती तरी गोष्टी यंदा ‘इफ्फी’मध्ये उलगडल्या. या चित्रपटांवर एक नजर...

मंदार कुलकर्णी

प्रानी ही एका शाळेतली शिक्षिका. खरं तर अगदी मूल्यं वगैरे पाळणारी, छोट्याछोट्या गोष्टी सांगत मुलांचं आयुष्य बदलून टाकणारी. एकदा बाजारात खाद्यपदार्थ घेण्यासाठी गेली असताना एक जण रांग मोडतो आणि त्याला सुनावताना प्रानी कुठला तरी अपशब्द वापरते.

नेमकं कुणीतरी त्याच वेळी शूटिंग करून त्याची क्लिप सोशल मीडियावर टाकून देतं. सरळ, मध्यममार्गी प्रानीचं आयुष्य बदलतं आणि तिचं सगळं कुटुंबही एका दुष्टचक्रात सापडतं. सोशल मीडियाचा कधीही वापर न करणारी प्रानी त्याचा जास्तच वापर करायला लागते आणि त्यातून आणखी गुरफटत जाते.

प्रानीचं पुढे काय होतं, तिच्या विद्यार्थ्यांचं तिच्याबद्दल मत बदलतं का, पालक काय करतात, शाळा काय करते अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो इंडोनेशियाचा अँड्रॉगॉगी हा चित्रपट.

गोव्यात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) या चित्रपटानं प्रेक्षकांची दाद मिळवलीच; पण आपल्याच हातातला मोबाईल उद्या आपल्यावरही ही वेळ आणू शकतो का, असा प्रश्नही त्यानं मनात उभा केलाच.

सध्याचं जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय, समाज बदलतोय आणि माणसांच्या व्यवहाराबरोबच त्याचे मनोव्यापारही बदलत आहेत. आपल्या अवतीभोवतीचा सगळा अवकाशच अशा प्रकारे बदलत असताना चित्रपटांसारख्या माध्यमानं या बदलाची दखल घेतली नसती तरच नवल.

यंदाचा ‘इफ्फी’ विशेष ठरला तो अशा समकालीन मुद्द्यांच्या मांडणीमुळे. सोशल नेटवर्किंगपासून निसर्गाला आव्हान देणाऱ्या प्रयोगांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांपासून पती-पत्नीच्या नात्यातल्या अंतरापर्यंत आणि ‘चट मंगनी पट ब्याह’सारख्या नात्यांत अडकण्याच्या वेगामुळे उद्‍भवणाऱ्या समस्यांपासून कोरोनासारख्या साथीनंतरच्या प्रश्नांपर्यंत किती तरी गोष्टी यंदा ‘इफ्फी’मध्ये उलगडल्या.

भवतालातला समाज जसजसा पुढे जातोय, तसे इफ्फीमधल्या चित्रपटांमधले विषयही कसे बदलत जातात, ते बघणं फार मजेचं असतं. कुठलेही चित्रपट हे पाण्यासारखे असतात.

संवेदनशील चित्रकर्मी आजूबाजूच्या जगाचं निरीक्षण करत असतात आणि त्यानुसार त्यांच्या चित्रकृतींचे विषय निवडत असतात आणि त्याचे आविष्कारही बदलत असतात. आजूबाजूच्या जगाचे रंग जसे असतात, तसेच रंग ते आपल्या चित्रपटांतही आणायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच चित्रपटांचे रंग खऱ्या अर्थानं काळाबरोबर बदलत जातात.

इफ्फीमध्ये तर जगभरातले प्रतिभावान चित्रकर्मी त्यांच्या चित्रकृती आणत असतात. त्यामुळे इतर देशांतले चित्रपट बघून आपल्या भोवतालाची ‘टॅली’ करण्याची मजा काही औरच असते आणि यंदा सगळ्याच प्रेक्षकांना तो आनंद मनमुराद लुटता आला.

या चित्रपटांच्या निमित्तानं मोरोक्कोपासून जपानपर्यंतच्या माणसांच्या अंतरंगांत डोकावता आलं आणि समकालीन प्रश्नांच्या धाग्यांनी आपण सगळेच कसे जोडले गेलो आहोत, तेही जाणून घेता आलं.

विषयाला व्यापकता देण्याची धडपड

प्रयोगासाठी प्रयोग असं न करता विषयानुसार प्रयोग अशी भूमिका अनेक दिग्दर्शक घेत आहेत, असं यंदा जाणवलं. त्याचबरोबर मूर्ताकडून अमूर्ताकडे नेण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि विषयाला एक व्यापक स्वरूप देण्याची त्यांची धडपड असते, हेही लक्षात आलं.

समाजाचे, समूहांचे प्रश्न मांडण्यापेक्षा माणसांचे प्रश्न मांडायचे आणि त्यातून समाजाची आणि समूहांची स्थिती अधोरेखित करायची, अशी भूमिका या वर्षीच्या अनेक चित्रपटांत दिसली. प्रश्नांची उत्तरं देण्याचा, शोधण्याचा प्रयत्न नव्हता, तर त्या प्रश्नात होरपळणाऱ्या विशिष्ट माणसांचं जगणं मांडण्याचा प्रयत्न होता.

जिगसॉ पझलसारखे तुकडे मांडायचे आणि प्रत्येक प्रेक्षकानं मनातल्या मनात ते तुकडे एकत्र करून त्या माणसाच्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आणि त्याच वेळी स्वतःच्या जीवनाचेही तुकडे कुठं जुळवता येतात का हे बघायचे, असा प्रकार होता.

त्यामुळेच एकेक चित्रपट बघून प्रेक्षक आनंदी होत होतो, चिडत होते, विकल होत होते, उन्मळून पडत होते आणि विलक्षण समाधानीही होत होते.

iffi
International Film Festival: 'कांतारा' पासून ते 'द केरळ स्टोरी' पर्यंत हे चित्रपट वाढतील 54 व्या IFFI महोत्सवाची शान!

समकालीन समस्यांची हाताळणी

लंबरजॅक द मॉन्स्टर हा जपानमधला चित्रपट. सस्पेन्स आणि थ्रिलरच्या बाबतीत सगळ्या वेब सिरीजना मागं टाकणारा. मात्र, मेंदूत चिप बसवून माणसाला ‘हैवान’ बनवता येऊ शकतं हे तो दाखवत असताना आपल्या आजूबाजूची ‘हैवानी’करणाची दुकानं दिसत होती आणि त्यांचा नुसता विचारसुद्धा थरकाप उडवत होता.

सीग्रास या चित्रपटात घटस्फोटापर्यंत आलेलं एक दांपत्य मुलांना घेऊन पर्यटनस्थळी जातं. त्यांच्यातला तणाव त्या पर्यटनस्थळाच्या पार्श्वभूमीवर कमी न होता आणखी वाढत जाताना दिग्दर्शक दाखवत होता आणि त्यातून दिसणारं समकालीन कुटुंबाचं चित्र अस्वस्थ करणारं होतं. द ककूज कर्स हा जर्मनीतला चित्रपट विलक्षण होता.

‘अमुक द्या आणि तमुक घ्या’च्या सध्याच्या जमान्यात दोन कुटुंबं ‘चेंज’ म्हणून महिन्याभरापुरती एकमेकांच्या घरांची अदलाबदल करतात आणि त्यातून होत जाणाऱ्या परिणामांनी बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. डिग्निटी हा ग्रीसमधला चित्रपट म्हणजे खरं तर आपल्या बागबानसारख्या चित्रपटांची आवृत्ती.

एका ज्येष्ठ नागरिकाच्या वाढदिवसानिमित्त त्याची तीन मुलं एकत्र येतात. ज्येष्ठ नागरिक ज्या मुलाच्या घरी आहे त्याला त्यांना सांभाळणं अवघड झाल्याचं वास्तव समोर आल्यावर सुरुवातीचा आनंदी माहौल नंतर ताणात बदलत जातो आणि ज्येष्ठांच्या समस्येला अक्षरशः ‘सीमा’च नाहीत याचीही दुःखद जाणीव झाली.

थक्क करणारे विषय

काही चित्रपटाचे विषय तर अक्षरशः थक्क करणारे होते. सध्या सगळ्यांचीच जीवनशैली बदलल्यामुळे झोपेवर परिणाम झाला आहे.

झोपेबाबत समस्या निर्माण झाली, तर कुटुंबाची मनोवस्था काय होऊ शकते याचं थरारक चित्रण स्लीप या चित्रपटात होतं. झेक रिपब्लिकमधील टॉक्सिक या चित्रपटात नात्यांमधला वरवरपणा किती ‘विषारी’ होऊ शकतो, हे दिग्दर्शकानं अतिशय तरलपणे दाखवलं.

मेमरी या चित्रपटात स्मृती गेलेली एक व्यक्ती आणि एका कटू स्मृतीमुळे आयुष्यावर परिणाम झालेली दुसरी व्यक्ती यांच्यातला उंदरा-मांजराचा खेळ रंजक होता.

iffi
Jio Mami Film Festival 2023: अनुराग कश्यपने दिली संधी, मराठमोळा तरुण 'मामी' गाजवतोय

भौगोलिकतेचं प्रातिनिधिक दर्शन

माणसाच्या अंतरंगात डोकावणारे चित्रपट यंदाच्या इफ्फीमध्ये होतेच आणि त्याचबरोबर विविध देशांतील समस्या तिथल्या माणसांवर काय परिणाम घडवतात याचंही दर्शन घडवणारे चित्रपट होते. त्यातल्या हाऊस इन जेरुसलेम या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली.

ब्रिटनमधून जेरुसलेममध्ये आलेल्या बाप-लेकीची कथा या चित्रपटात होती. छोट्या लेकीला जेरुसलेममध्ये काही भास होतात आणि त्यांच्यामागचं वास्तव हळूहळू उलगडत इस्राईलमधलं भीषण वास्तव लक्षात येतं. सध्या इस्राईल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटानं काळजाचा ठोका चुकवला.

फेझ समर या चित्रपटानं मोरोक्कोतल्या स्वातंत्र्य चळवळीची कथा सांगितली, तर ओकारिना चित्रपटानं ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या अल्बानियाच्या नागरिकांची समस्या मांडली. वन्स अपॉन अ टाइम इन अँडेस या चित्रपटात पेरू आणि चिली या देशांधल्या संघर्षात दोन्ही बाजूंकडची होरपळ मांडली.

प्रेमाला भाषा नसते हे त्या चित्रपटानं सांगितलं आणि भौगोलिक सीमांमुळे त्या प्रेमाला कसे तडे जाऊ शकतात याचंही दाहक दर्शन घडवलं.

iffi
IFFI 2023: IFFIमध्ये प्रथमच कन्नड चित्रपटाचा डंका! कांताराने जिंकला पुरस्कार तर 'पंचायत 2'ने..

एकुणात, यंदाचा ‘इफ्फी’ सर्वसामान्य प्रेक्षक, रसिक

आणि सामाजिक अभ्यासक म्हणूनही सुखावणारा होता. त्यानं प्रेक्षकांना एका वेगळ्या प्रतलावर नेलं आणि घुसळवूनही टाकलं. ‘ओटीटी’चा प्रभाव वाढल्यामुळे प्रत्यक्ष चित्रपटगृहांत जाऊन चित्रपट बघणारे प्रेक्षक कमी होत असताना ‘इफ्फी’तही त्याचं प्रतिबिंब उमटलंच.

यंदा नेहमीपेक्षा प्रेक्षकांची संख्या कमी असल्याचं जाणवलं. मात्र जे होते ते खऱ्या अर्थानं दर्दी होते. सगळी कामं बाजूला ठेवून, व्यवधानं विसरून फक्त आणि फक्त चित्रपटांच्या प्रेमापोटी आलेले हे लोक म्हणजे खऱ्या अर्थानं चित्रपंढरीचे वारकरी.

काही जण स्वतःच्या चित्रकृती घेऊन आले होते, काही जण स्वतःच्या चित्रकृती तयार करण्यासाठी प्रेरणा मिळवण्यासाठी आले होते. काही जण अभ्यासासाठी आले होते, तर काही जण कामाचा भाग म्हणून आले होते.

जे आले होते त्यांच्यासाठी ‘इफ्फी’चा पडदा हे साधन होतं... त्याच्या पलीकडची माणसं हे त्यांचं साध्य होतं. जपानमधला अकिरा, लात्वियामधली डायना, रोमानियामधला ओआना, इस्राईलमधील रिबेका, झेक रिपब्लिकमधला टॉमस असे सगळेजण पडद्यापलीकडे जमले होते.

पडद्यासमोरची माणसं आणि पडद्याआडची माणसं यांच्यातलं अंतर तीन तासांमध्ये हळूहळू धूसर होत गेलं. चित्रपट संपले; पण पडद्यामागचे अकिरा, डायना, ओआना, रिबेका, टॉमस त्यांच्या मनातच राहिले.

माणसांची ही भेट आणि ‘या हृदयीचे ते हृदयी घातले’ हा अनुभव हेच यंदाच्या इफ्फीचं संचित होतं. ते संचित दर वर्षी मिळतं म्हणून तर दर वर्षी चित्रपंढरीकडे पावलं वळतात. यात काय सुख असतं? कुणास ठाऊक.... चित्रपंढरीला जाणाऱ्या वारकऱ्याला असा प्रश्न पडतच नाही कधी!

वेगळे प्रयोग

समकालीन प्रश्नांच्या मांडणीबरोबर वेगळे प्रयोगही यंदा इफ्फीमध्ये दिसले. एमएमएक्सएक्स या चित्रपटानं केलेला प्रयोग उल्लेखनीय होता. कोरोना साथीमुळे माणसांच्या आयुष्यात अगदी शेवटच्या स्तरापर्यंत कोणते बदल झाले त्याच्या चार कहाण्या ख्रिस्ती पुइयू यांनी मांडल्या.

या कहाण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एका शॉटमध्ये केलेलं चित्रीकरण. अर्ध्या तासाचे एकेक शॉट्स केवळ तीन किंवा चार कलाकार यांनी सलग कसे काय चित्रित केले असतील, याचं आश्चर्य वाटत होतं. एका कहाणीतल्या एका कलाकाराची निवड तर एका रात्रीत झाली आणि तिनं केवळ एका रात्रीत तीस-पस्तीस पानं पाठ करून चित्रीकरण केल्याचं चित्रपटाचे निर्माते सांगत होते.

डिव्हिनिटी या चित्रपटात माणसाच्या मनातला काळेकुट्टपणा दाखवण्यासाठी ब्लॅक अँड व्हाइटचाच वापर करण्यात आला होता. वन्स अपॉन अ टाइम या चित्रपटात हजारो वेगवेगळी चित्रं, प्रतिमा आणि इफेक्ट्सचा केलेला वापर थक्क करणारा होता. ही थॉट ही डाइड या चित्रपटानं ‘ॲब्सर्ड’ मांडणीचा प्रयोग करत माणसाच्या आयुष्याची नश्वरता दाखवली.

--------------

iffi
PIFF : पुणे चित्रपट महोत्सवात ५१ देशांतील १४० कलाकृती; संचालक डॉ. जब्बार पटेल यांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com