विनय चाटी
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवितानाच भारताने ‘हायब्रीड वॉरफेअर’मधील सामर्थ्यही जगाला दाखवून दिले. पाकिस्तानला आर्थिक, व्यापारी, ऊर्जा आणि पाणी अशा सर्वच आघाड्यांवर जेरीस आणतानाच अपेक्षित असलेला लष्करी घाव घालून, लष्कर आणि अस्थिरतेच्या चरकात आधीच पिळून निघालेल्या पाकिस्तानला भारताने जिव्हारी लागणारा धक्का दिला.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मिरातील पहलगाम येथे पर्यटकांवर धर्म विचारून हल्ला केला. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या कारवाईचे पूर्ण युद्धात रूपांतर होऊ नये, यासाठी भारताने नियोजित आणि नियंत्रित स्वरूपात ही कारवाई सुरू केली.
मात्र, या संघर्षाचे रूपांतर युद्धात करण्याचे प्रयत्न पाकिस्तान करत आहे. त्याचाच भाग म्हणून पाकिस्तानने भारताच्या संपूर्ण पश्चिम सीमारेषेवर हवाई हल्ले आणि लष्करी कारवाईला सुरुवात केली आहे.