Pasta lovers : हॅपिनेस इज... पास्ता!

पास्ता हे त्यांचं मुख्य अन्न, त्यांच्या खाद्यपरंपरेचा अविभाज्य भाग!
Food Recipe
Food Recipe esakal

इरावती बारसोडे

पास्त्याचा चाहते आपल्याकडे भरपूर आहेत. मीही त्यांच्यातलीच! पास्त्यासाठी माझ्या पोटात नेहमीच एक कप्पा रिकामा असतो.

पास्त्याविषयी काहीही दिसलं, मग ती रेसिपी असो अथवा काही संशोधन, मी आवर्जून वाचून काढते. गेल्या महिन्यात सोशल मीडियावर एक पोस्ट दिसली, पास्ता खाल्ल्यावर तुम्ही आनंदी होता, असं शास्त्र सांगतं. मग मी ते संशोधन शोधून काढलं.

इटलीमधल्या फ्री युनिव्हर्सिटी ऑफ लँग्वेजेस अॅण्ड कम्युनिकेशन्स आययूएलएम इथल्या बिहेव्हिअर अॅण्ड ब्रेन लॅबमधल्या संशोधकांनी हे संशोधन केलंय.

या संशोधनासाठी पंचवीस ते पंचावन्न वयोगटातील वीस स्त्रिया आणि वीस पुरुषांचा अभ्यास करण्यात आला.

या व्यक्तींना त्यांच्या आवडीचा पास्ता खायला देण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांना आवडत्या गोष्टी करण्यास सांगितलं, म्हणजे गाणी ऐकणं किंवा एखादा खेळ खेळणं वगैरे. या दोन्ही कृतींनंतर निर्माण होणाऱ्या भावनिक प्रतिसादांची तुलना करण्यात आली.

या तुलनेमध्ये या व्यक्ती आपली आवडती कृती करताना जेवढ्या आनंदी होत होत्या, तेवढ्याच आनंदी पास्ता खातानासुद्धा होत होत्या; काहींच्या बाबतीत तर पास्ता जिंकला, असं संशोधनाच्या अहवालात म्हटलं आहे.

एखाद्याला चांगल्या आठवणींमुळे आनंद होतो, तेव्हा जी भावनिक प्रतिक्रिया येते, तशीच प्रतिक्रिया आवडीचा पास्ता खाल्ल्यानंतर येते, असंही त्या संशोधनात म्हटलं आहे.

Food Recipe
White Sauce Pasta Recipe : रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस पास्ता कसा बनवायचा?

या संशोधनात सहभागी झालेले सगळेच इटालियन होते. पास्ता हे त्यांचं मुख्य अन्न, त्यांच्या खाद्यपरंपरेचा अविभाज्य भाग! पण या चविष्ट, आनंद देणारा पास्त्याला जगातला दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय इटालियन पदार्थ म्हणता येईल! (पहिला नंबर लागतो अर्थातच पिझ्झ्याचा.)

पास्ता भारतात, महाराष्ट्रातसुद्धा खूपच छान रुळला आहे. मोठमोठ्या कॉन्टिनेंटनल रेस्तराँपासून गल्लीतल्या छोट्याशा कॅफेमध्येसुद्धा आता पास्ता मिळतो. आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत असलेले पास्त्याचे प्रकार म्हणजे स्पॅगेटी, मॅक्रोनी, पेने वगैरे.

पण प्रत्यक्षात पास्त्याचे चाळीसहून जास्त प्रकार आहेत; ग्नोकी, फुसिली, लजानिया, रॅव्हिओली, रिगाटोनी, फारफाली, फुत्तुचिनी वगैरे वगैरे. त्यांचा आकार (लांबी, रुंदी इत्यादी), शिजवण्याची पद्धत यानुसार त्यांची वर्गवारी केली जाते.

Food Recipe
Food Recipe : घरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखा White Sauce Pasta

पास्ता सॉसचे प्रकारही अनेक. अॅराबिता (रेड सॉस) आणि अल्फ्रेडो (व्हाइट सॉस) पास्ता तर अगदी कॉमन झालाय. पण त्याशिवाय अॅग्लिओ ए ओलियो, पेस्तो, बोलोनेज पास्ता आणि आणखी इतर प्रकारसुद्धा आता सगळीकडे मिळतात.

अनेकजण पास्त्याला ‘देशी’ टचही देतात; पेरीपेरी, मसाला पास्ता वगैरे. अनेक ब्रँडच्या रेडी टू कुक पास्त्याची पाकिटं तर कितीतरी दुकानांत मिळतात. पास्त्याचा शिरकाव घराघरांतल्या स्वयंपाकघरातही झाला आहे.

कारण एकदा का परफेक्ट पास्त्याची चव जिभेला माहिती झाली आणि डोक्यात घट्ट बसली की पास्ता करणंही सोप्पं होतं. बिना सॉसचा पास्ता तर आणखीनच सोप्पा.

पास्त्यासाठी लागणारे सॉस, पार्सली, बेसिलसारखे इटालियन हर्ब; झुकिनी, ब्रोकोलीसारख्या एक्झॉटिक भाज्यासुद्धा अगदी सहज मिळतात.

तर असा हा इटालियन पास्ता आपल्या आहारात कधी येऊन बसला आणि आवडीचा झाला, हे आपल्यालाही कळलं नाही.

ज्यांना मनापासून पास्ता आवडतो, ते सगळे वर उल्लेख केलेल्या संशोधनाला पुष्टी देतील, म्हणतील पास्ता खाल्ला की मन खरंच आनंदून जातं.

परफेक्ट क्रीमी अलफ्रेडो पास्त्याचा एक घास खाल्ला की मूड अपलिफ्ट होतो, तर आंबटसर चव असणाऱ्या अॅराबिता पास्त्याची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत राहते... खरंच आहे!

----------------

Food Recipe
Video Viral: आज्जींने पहिल्यांदाच खाल्ला 'Pasta'; पाहा तिची Reaction

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com