पोटी वंशाचा दिवा की पणती, याचा निवाडा पुरुषाकडूनच होतो याचा हा निर्विवाद पुरावा मिळाला आहे..

गर्भाशयातले पहिले काही आठवडे त्या भ्रूणाची वाढ स्त्रीधर्मीयच होते. त्यानंतर मग पुढं पूर्णत्वाला जाताना स्त्रीरूपच टिकवायचं की पुरुषरूप धारण करायचं याचा निवाडा केला जातो.
girls birth rate
girls birth rategoogle

डॉ. बाळ फोंडके

एसआरवाय (SRY) हे जनुक केवळ पुरुषी संप्रेरकांच्या पाझरालाच चालना देतं असं नाही. तर पुरुषी वागणुकीची लक्षणंही स्थापित करतं. म्हणूनच या एसआरवाय जनुकाला म्हणूनच मेल डिटरमिनिंग जीन - पुरुषी गुणधर्मांचा कारक - ठरवलं गेलं आहे. लिंगभेद करणारं ते जनुक आहे, असाच वैज्ञानिकांचा होरा आहे.

बायबलमध्ये एक प्रख्यात कहाणी आहे, ॲडम आणि ईव्हची. जगातला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री यांची. त्या कहाणीनुसार सर्वप्रथम ॲडमचा जन्म झाला आणि नंतर त्याच्या बरगडीपासून ईव्ह उदयाला आली. पुरुषप्रधान संस्कृतीला ही कहाणी मानवणारी होती. कित्येक शतकं तिचाच पाठपुरावा केला गेला. पण जनुकीय विज्ञान प्रस्थापित झालं आणि त्या विज्ञानानं या कहाणीतल्या समजुतीला धक्का दिला.

जनुकीय विज्ञानानं दाखवून दिलं की जगातल्या प्रत्येक व्यक्तीची मूळ आवृत्ती स्त्रीचीच असते. गर्भाशयातले पहिले काही आठवडे त्या भ्रूणाची वाढ स्त्रीधर्मीयच होते. त्यानंतर मग पुढं पूर्णत्वाला जाताना स्त्रीरूपच टिकवायचं की पुरुषरूप धारण करायचं याचा निवाडा केला जातो.

बर्नार्ड शॉच्या पिग्मॅलियन या नाट्यकृतीवर आधारित माय फेअर लेडी या चित्रपटातला प्रोफेसर हिगिन्स आपल्या कर्नल मित्राला विचारतो, ‘व्हाय कान्ट ए वूमन बी मोअर लाइक ए मॅन?’ शॉनं जनुकीय विज्ञान वाचलं असतं, तर त्यानं या प्रश्नाचा व्यत्यासच सादर केला असता. ‘व्हाय कान्ट अ मॅन बी मोअर लाइक अ वूमन?’

वारशाच्या या कहाणीची सुरुवात केली तीही एक स्त्री आणि एक पुरुष यांनी स्वतंत्रपणे. नेली स्टीव्हन्स आणि एडमन्ड बीचर यांना १९०५मध्ये असं दिसून आलं, की स्त्री आणि पुरुष यांच्या पेशींमधल्या गुणसूत्रांची मांडणी थोडीशी निरनिराळी असते. प्रत्येक पेशीत गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या असतात हे तोवर मान्य झालं होतं.

प्रत्येक जोडीपैकी एक मातेकडून आणि दुसरा पित्याकडून मिळते हेही स्पष्ट झालं होतं. यापैकी बावीस जोड्या समानधर्मी असतात. दोन्ही जोडीदार एकसारखेच असतात. त्यांच्यावर वस्ती करून राहणारी जनुकंही सारखीच असतात. फक्त त्यांचे नेमके अवतार वेगवेगळे असण्याची शक्यता असते.

तेविसावी जोडी मात्र समानधर्मी असते किंवा विषमधर्मीही असते. स्त्रीच्या शरीरातील पेशींमध्ये या गुणसूत्रातील दोन्ही जोडीदार इतर गुणसूत्रांसारखे एकसारखेच असतात. त्यांना ‘एक्स’ हे नाव दिलं गेलं आहे. म्हणजे स्त्रीच्या शरीरातील या लिंगनिर्धारक गुणसूत्रांचे दोन्ही जोडीदार ‘एक्स’च असतात. पुरुषांच्या पेशींमध्ये मात्र ते समान नसतात.

एक जोडीदार ‘एक्स’च असतो. दुसरा त्या मानानं इटुकला पिटुकला, एखादा तुकडाच असल्यासारखा, असतो. त्याला ‘वाय’ म्हटलं गेलं आहे. थोडक्यात काय, तर पुरुषाच्या शरीरातील पेशींमध्ये एक ‘एक्स’ असतो, तर दुसरा ‘वाय’ असतो.

आता प्रत्येक अपत्याला मातेकडून एक जोडीदार मिळतो, तर दुसरा पित्याकडून दान केला जातो. मातेकडे दोन्ही जोडीदार ‘एक्स’च असल्यामुळं तिच्याकडून मुलगी आणि मुलगा यांच्यात भेदभाव केला जात नाही. ती दोन्ही अपत्यांना ‘एक्स’चाच वारसा देते.

पुरुषाकडून मात्र ‘एक्स’चं तरी दान मिळतं किंवा ‘वाय’चं तरी. ‘एक्स’चं मिळालं तर ते अपत्य मुलगी होतं. ‘वाय’चा वारसा मिळाला तर ते अपत्य मुलगा होतं. पोटी वंशाचा दिवा यायचा की पणती, याचा निवाडा पित्याकडूनच म्हणजेच पुरुषाकडूनच होतो याचा हा निर्विवाद पुरावा मिळाला आहे. म्हणजे पोटी मुलगीच आली म्हणून त्या मातेवर ठपका ठेवणं हे तिच्यावर धडधडीत अन्याय करण्यासारखंच आहे, हे समजून घ्यायला हवं.

पण जेव्हा मातेचं बीजांड आणि पित्याचा शुक्राणू यांचं मीलन होऊन नव्या जिवाचा ओनामा करणारी पिंडपेशी अस्तित्वात येते, त्यावेळी तिचं लिंग निश्चित होत नाही. त्या पिंडपेशीतून उदयाला आलेल्या भ्रूणाची पहिल्या सहा आठवड्यांपर्यंत स्त्री म्हणूनच वाढ आणि विकास होतो.

girls birth rate
Genetic Diagnosis : जनूकीय निदानासमोर 'नैतिक' आव्हान; डॉ. शुभा फडके यांचे मत

वाय गुणसूत्राचा वारसा जरी त्या भ्रूणाला मिळालेला असला तरी त्याकडे दुर्लक्ष होतं. पण त्यानंतर वाय गुणसूत्रावरील केवळ एकच जनुक त्याच्या पुढील वाटचालीचं नियंत्रण करतं. त्या भ्रूणाचं भवितव्य ठरवतं. या जनुकाची ओळखही आता पटली आहे.

त्याचं नाव एसआरवाय (SRY) असं ठेवलं गेलं आहे. त्याचा शोध १९९० साली लागला. ते जर कार्यान्वित झालं, तर मग त्या भ्रूणाच्या अंगी पुरुषी अवयवांची स्थापना होते. त्यांची वाढ होते. जर ते उपस्थितच नसेल तर मग त्याचा प्रभाव पडण्याची शक्यताच मावळते.

तो भ्रूण स्त्री शरीराचे अवयवच धारण करतो. बीजकोश रुजतात, गर्भाशयाची स्थापना होते, वयात आल्यावर स्तन विकसित होण्याचं सूत्र दिलं जातं.

पिंडपेशीची निर्मिती झाल्यापासून पहिले पाच आठवडे त्या भ्रूणात लिंगस्थापना होतच नाही. कारण तोवर जननेंद्रियांचे पूर्वसूरीही तयार झालेले नसतात. सहाव्या आठवड्यात त्यांची रुजवात होते. पण त्यांच्यात कोणत्याही एका लिंगाचं रूप नसतं.

ते स्त्री जननेंद्रियांच्या वाढीलाही चालना देऊ शकतात किंवा पुरुष जननेंद्रियाला. त्यावेळी त्या भ्रूणात जर ‘वाय’ गुणसूत्र असेल तर त्यावरचं एसआरवाय जनुक कार्यान्वित होतं. त्याच्या प्रभावाखाली मग टेस्टोस्टेरॉनसारख्या पुरुष संप्रेरकांचा पाझर सुरू होतो.

तो पुरुषी लिंगेंद्रियांच्या वाढीला चालना देतो. जर ते जनुक नसेल, किंवा कार्यान्वित झालं नसेल, तर मग पुढची वाटचाल स्त्रीरूप धारण करणारीच होते. अंगी ‘वाय’ गुणसूत्र असूनही स्त्रीच जन्माला येते. मात्र ती स्त्री वांझ होते. ती मूल जन्माला घालू शकत नाही.

girls birth rate
Kim Jong Un Crying Video : ..अन् किम जोंग उनला अश्रू अनावर; देशातील महिलांना केली आणखी मुलं जन्माला घालण्याची विनंती

काही वेळा ट्रान्सलोकेशन नावाच्या उत्परिवर्तनापायी हे एसआरवाय जनुक ‘वाय’ गुणसूत्रावरून उडी घेत ‘एक्स’ गुणसूत्रावर जाऊन बसतं. अशा परिस्थितीत शरीरात दोन्ही गुणसूत्रं ‘एक्स’ असूनही ती व्यक्ती पुरुषच बनते. तीही जननक्षम नसते.

हे जनुक केवळ पुरुषी संप्रेरकांच्या पाझरालाच चालना देतं असं नाही. तर पुरुषी वागणुकीची लक्षणंही स्थापित करतं. सर्वसाधारणपणे पुरुषांमध्ये धोका पत्करण्याची जास्ती तयारी असते. तसंच पुरुष अधिक आक्रमक असतात.

या वागणुकीलाही हे जनुक कारक ठरतं. त्याचं अस्तित्व नसल्यामुळं स्त्रिया अधिक सहनशील तसंच करुणेची भावना धारण करणाऱ्या बनतात. पुरुष गणिती समीकरणं सोडवण्यात अधिक पटाईत असतात. अर्थात ही सर्वसाधारण प्रवृत्ती झाली. प्रत्येक पुरुष आक्रमकच असतो आणि प्रत्येक स्त्री गणितात गटांगळी खाते असं नाही. त्या केवळ सरासरी प्रवृत्तीच दाखवतात.

आईच्या गर्भाशयात असतानाच या संप्रेरकांचा प्रभाव पडल्यामुळं या प्रवृत्तींची मुळं रुजतात हे बॅरन कोहेन यांच्या संशोधनातून दिसून आलं आहे. त्यांनी २३५ गर्भवती स्त्रियांच्या गर्भाशयातील द्रवपदार्थांची तपासणी केली. पोटी वाढत असलेल्या गर्भामध्ये एखादी विकृती तर नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी त्या द्रवाचे नमुने घेतले होते.

ते करत असतानाच त्या द्रवातील टेस्टोस्टेरॉनच्या मात्रेचंही मोजमाप त्यांनी केलं. त्यानंतर जेव्हा प्रसूत होऊन त्या मुलांचा जन्म झाला तेव्हा त्यांचीही पुढची वाढ कशी होते, त्यांचा स्वभावधर्म कसा फुलतो याचीही चाचपणी केली. त्यातूनच त्या मुलांमध्ये सुरुवातीपासूनच अंकसाक्षरता अधिक असल्याचं स्पष्ट झालं.

या एसआरवाय जनुकाला म्हणूनच मेल डिटरमिनिंग जीन - पुरुषी गुणधर्मांचा कारक - ठरवलं गेलं आहे. लिंगभेद करणारं ते जनुक आहे, असाच वैज्ञानिकांचा होरा आहे.

girls birth rate
Zombie gene काय प्रकार आहे? मृत्यूनंतर शरीराचा 'हा' भाग होतो ॲक्टिव्ह...वाचा काय म्हणतात शास्त्रज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com