Pune Rains : सासवडजवळ पुरात दोन महिला गेल्या वाहून

2 women died at pune rains flood at saswad
2 women died at pune rains flood at saswad

सासवड (पुणे) : वज्रगड, किल्ले पुरंदर व लगतच्या डोंगरी भागात बुधवारी रात्री तब्बल साडेचार तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे आलेल्या पुरात सासवडसह भिवडी, नारायणपूर, नारायणपेठ, चिव्हेवाडी आदी गावांमध्ये शेतजमीन, उभी पिके, घरे, गोठे, जनावरे, वाहने, छोटे पुल, साकव वाहून गेले. विहिरी गाळाने भरल्या. रस्त्यांचेही खचून मोठे नुकसान झाले. 

वज्रगडकडून आलेल्या पाण्यामुळे भिवडीतील ओढ्याने रौद्ररुप धारण केले होते. ओढ्याच्या क्षमतेच्या पाचपट पाणी आल्याने लगतची कित्येक एकर शेतजमीन, उभी पिके वाहून नेली. दोन बंधारे फुटले. ओढ्यालगच्या कित्येक घरात पाणी शिरले. दहा जनावरे या परिसरातून वाहून गेली. काम सुरु असलेले रस्ते काही ठिकाणी खचले. याबाबत पोलिस पाटील अक्षय शिंदे, नरेश मोकाशी यांनी सांगितले की, अजून आतल्या शिवेपर्यंतची माहिती आल्यावर नुकसानाचा नेमका अंदाज येईल. 

नारायणपूरला पुराचा वेढा 
श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे ओढ्याने पात्रात अडथळे आल्याने गावाला वेढा घालून घरातून, बोळांतून मार्ग काढत घरांच्या भिंती, चीजवस्तू, दगड, वीटा, माती व वाहनेही वाहून नेली. 25 हून अधिक घरांचे व त्याहून अधिक वाहनांचे नुकसान झाल्याचे भरतनाना क्षीरसागर, सदाशिव बोरकर यांनी सांगितले. क्षीरसागर यांच्या घराची भिंत तोडून पाणी घरात घुसले. शेतजमिनीचे व पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे माजी सरपंच रामभाऊ बोरकर यांनी सांगितले. दरम्यान, चिव्हेवाडी, केतकावळे, कुंभोशी, देवडी, पानवडी येथेही या अतिवृष्टीचा फटका बसला. लगतचे डोंगर वा टेकड्या खचण्याचा धोका वाढल्याचे अनेकांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

भेटी व पंचनामेही सुरू 
राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, हरिभाऊ लोळे, प्रांत प्रमोद गायकवाड, तहसीलदार सरनौबत आदींनीही प्रत्येक ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. भेटीतच तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी पंचनाम्यास सुरवात केल्याचे सांगण्यात आले. एनडीआरएफ टीम दाखल झाली असून पूरग्रस्त भागात कामही सुरू केले आहे, असे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. सासवड भागात 140 मिमी पाऊस झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र किल्ले पुरंदर ते भिवडी दरम्यानचा पाऊस याच्या कितीतरी पट म्हणजेच ढगफुटीसारखा होता. 

दरम्यान, भिवडी येथील दोन महिला पुरात वाहून गेल्या, असे पोलिसांनी सांगितले. भिवडीनजीक खोमणेवस्तीला ओढ्याच्या पुराच्या पाण्याने वेढा दिला. त्यातून सहा जणांना वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. मात्र गजराबाई सुदाम खोमणे (वय 65) व छकुली अनंता खोमणे (वय 22, दोघीही रा. खोमणेवस्ती, भिवडी, ता. पुरंदर) या दोघी वाहून गेल्या. भिवडीत रस्त्यालगतच्या लोकांनी नारायणपूरचे दोन भक्त रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात आमच्यासमोर वाहून गेल्याचे सांगितले. त्याबाबत निश्‍चित माहिती शासकीय यंत्रणेकडून मिळाली नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com