#WeCareForPune : कोरोनाबाधित आठपैकी चौघांची प्रकृती स्थिर

Corona-Danger
Corona-Danger

coronavirus पहिल्या भेटीमधील ४३ व्यक्‍ती निरीक्षणाखाली; शाळा-महाविद्यालये सुरू राहणार
पुणे - शहरात सध्या नायडू रुग्णालयात कोरोनाचे १७ संशयित रुग्ण आहेत, त्यापैकी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आठ रुग्णांपैकी चौघांची प्रकृती स्थिर आहे. तर, अन्य एका बाधित रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. उर्वरित संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड, पोलिस आयुक्‍त के. वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘दुबईवरून आलेल्या कोरोनाबाधित दोन रुग्णांच्या पहिल्या भेटीमध्ये आलेल्या ४३ व्यक्‍तींना त्यांच्याच घरी निरीक्षणाखाली ठेवले आहे. मगरपट्टा आणि हिंजवडीसह आयटी कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय घेतला असून, याचे स्वागतच आहे. पुणे विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाबाबत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.  

आपत्ती व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आवश्‍यक उपाययोजनांचे अधिकार आहेत, त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर कोरोनाबाधितांची नावे पसरवू नयेत. अफवा किंवा चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर पुणे पोलिस लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना कोरोनाबाबत आवश्‍यक खबरदारी घेण्यासाठी होर्डिंग्ज उभारण्यात येणार आहेत.’’

१८ खासगी रुग्णालयांची मदत घेणार 
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १८ खासगी रुग्णालयांची मदत घेणार आहे. त्यात पुणे महापालिका हद्दीतील दहा आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील आठ खासगी रुग्णालये आहेत. तेथे २०० बेड्‌स तयार ठेवले आहेत. याबाबत राज्य सरकारच्या वतीने अधिसूचना काढण्यात येईल. सद्यःस्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित संशयित रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी सुरू करण्याची सुविधा सुरू केलेली नाही. याबाबत सरकारच्या धोरणात्मक निर्णयानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

रोजचे व्यवहार सुरळीत
पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पुणेकरांनी त्याची धास्ती घेतली असली, तरी आज शहरात दैनंदिन व्यवहार सुरळीत होते. दुपारच्या सुमारास रस्त्यावर कमी दिसणारी वाहनांची गर्दी सायंकाळी वाढली होती. शाळाही नियमितपणे सुरू होत्या. पण, विद्यार्थी तोंडाला मास्क लावून येत होते.

जिल्हा प्रशासनाने पुण्यातील रुग्णाबाबत माहिती जाहीर केल्याने पुणेकर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परंतु, नागरिकांनी खबरदारी घेण्यासही सुरुवात केली आहे. सकाळी मेडिकलच्या दुकानांमधून मास्क आणि सॅनिटायझर खरेदी करण्यासही नागरिक प्राधान्य देत होते. आजाराची धास्ती असली, तरी पुणेकरांनी त्यांचे दैनंदिन व्यवहार थांबविले नाहीत. खासगी आस्थापना, तसेच सरकारी कार्यालये नियमितपणे सुरू होती. रस्त्यावरही वाहनांची रेलचेल आणि माणसांची वर्दळ होती.

पुण्यातही काही सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असले, तरी बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. तेथील कार्यक्रमांनाही चांगली गर्दी दिसून आली. ‘आयसर’ या शिक्षण संस्थेत शुक्रवारी होणारा संगीत महोत्सव मात्र पुढे ढकलण्यात आल्याचे संयोजकांनी कळविले आहे.

विद्यार्थी मास्क लावून शाळेत
शाळा बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही आदेश जारी केलेला नाही. परंतु, कात्रज व सिंहगड रस्ता आणि धायरीतील तीन शिक्षण संस्थांनी शाळांना सुटी जाहीर केली आहे. काही शाळांनी दुपारनंतर विद्यार्थ्यांना सोडून दिले, तर काही शाळा दिवसभर सुरू होत्या. विद्यार्थी मात्र तोंडाला मास्क लावून येत होते. 

न्यायालय परिसरात खबरदारी
शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात दररोज पाच हजारांपेक्षा अधिक पक्षकार आणि वकिलांची ये-जा सुरू असल्यामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे बार असोसिएशन आणि पुणे फॅमिली कोर्ट असोसिएशनकडून खबरदारीचे आवाहन केले आहे.
जिल्हा न्यायालयातस्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घेण्यात आल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सतीश मुळीक यांनी दिली. न्यायालयाच्या आवारात वकील आणि पक्षकार यांना तीनशे ते चारशे मास्कचे वाटप करण्यात आले. स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत. पक्षकारांनी त्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुणे फॅमिली कोर्ट असोसिएशनकडून गुरुवारी फॅमिली कोर्टाच्या आवारात सॅनिटायझर आणि हॅंडवॉशचे वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक कोर्टात सॅनिटायझर ठेवण्यात येणार असल्याची माहिती ॲड. वैशाली चांदणे यांनी दिली.

आरटीओ कर्मचाऱ्याला संसर्ग नाही
पुणे - ‘कोरोना’ची लागण झालेल्या रुग्णाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) भेट दिल्याचे निष्पन्न झाल्यावर, त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्याची वैद्यकीय चाचणी करून १७ मार्चपर्यंत घरी विश्रांती घेण्याचा सल्ला बुधवारी देण्यात आला. त्या कर्मचाऱ्याला ‘कोरोना’चा संसर्ग झालेला नसल्याचे तपासणीत उघड झाले.  सिंहगड रस्ता परिसरातील ‘कोरोना’ची लागण झालेल्या दांपत्यासाठी संबंधित रुग्णाने चालक म्हणून मोटार चालविली होती. खबरदारीचा उपाय म्हणून त्याची डॉक्‍टरांनी वैद्यकीय चाचणी घेतली. त्यात त्याला कोरोनाचा संसर्ग नसल्याचे निष्पन्न झाले. संबंधित चालकाने ३ मार्च रोजी संगम पुलाजवळील ‘आरटीओ’ कार्यालयाला भेट दिली होती. त्या वेळी स्वाक्षरी करताना त्याचा संपर्क एका कर्मचाऱ्याशी आला होता. लगेचच आरटीओ कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्याची महापालिकेच्या नायडू रुग्णालयात तपासणी केली.

सॅनिटायझर संपले
पुणे - शहरात ‘सॅनियाटझर संपले’ आणि ‘मास्कची चौकशी करू नये’ असे फलक सदाशिव पेठेतील औषधाच्या घाऊक बाजारात दिवसभर झळकत होते. त्यामुळे याच्या किमती वाढल्या. साबणाने स्वच्छ हात धुणे आणि मास्कऐवजी रुमाल नाका-तोंडावर बांधणे हादेखील प्रभावी उपाय असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. उत्पादक आणि वितरक यांनी रिटेलरला सॅनिटायझरची विक्री करू नये, अशी स्पष्ट सूचना केली आहे, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली. उत्पादकांकडून पुरवठा होईल त्या प्रमाणात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देऊ, असे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍टचे सचिव अनिल बेलकर यांनी सांगितले.

‘कोरोना’बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासनाकडून शोध
पुणे - ‘कोरोना’ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी पथकांकडून खातरजमा करण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण ज्या परिसरात गेले असतील त्या ठिकाणी कोरोनाबाधित अथवा संशयित व्यक्ती आढळल्यास त्यांना तातडीने विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी सर्व उपविभागीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, खासगी रुग्णालयांच्या प्रमुखांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी ‘कोरोना’बाबत नागरिकांनी आवश्‍यक ती घ्यावयाची खबरदारी आणि उपाययोजनांबाबत आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी 
उपस्थित होते.

कंपनीच्या प्रवेशद्वारावरच तपासणी
बालेवाडी - ‘कोरोना’ आजार पसरू नये यासाठी बाणेर येथील अमर सदानंद टेक पार्क या इमारतीच्या प्रवेशद्वारावरच कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना आत सोडले जात आहे. या ठिकाणी दहा कंपन्या असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचारी येत असतात. त्यामुळे खबरदारी म्हणून सुरक्षारक्षकांकडे एक छोटे मशिन दिले आहे. त्याद्वारे शरीराचे तापमान तपासल्यानंतरच प्रत्येक कर्मचाऱ्यास प्रवेश दिला जातो. गेल्या गुरुवारपासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्मचाऱ्यास ताप असल्यास त्याला आतमध्ये जाऊ दिले जात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com