यंदा आळंदीची वारी विक्रमी भरण्याची शक्यता; काय आहे कारण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा आळंदीची वारी विक्रमी भरण्याची शक्यता

कोरोनामुळे गेली दोन वर्षांनंतर यंदा पंढरपूरमध्ये कार्तिकी वारी भरली. आता संतज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीबाबत वारकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, एसटीचा संप याकारणांमुळे पंढरपूरला येऊ न शकलेले वारकरी आळंदी वारीला निश्चित हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची आळंदीतील कार्तिकी वारी विक्रमी भरण्याची शक्यता आहे.

यंदा आळंदीची वारी विक्रमी भरण्याची शक्यता; काय आहे कारण?

कोरोनाच्या हाहाकारामुळे गेल्या दोन वर्षांपासून कार्तिकी आणि आषाढी वारी होऊ शकली नाही. सरकारच्या निर्बंधांमुळे समस्त वारकरी संप्रदायाने घरातूनच मनवारी केली. ‘ठायीच बैसोनि करा एक चित्त’हा संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे घरोघरी ग्रंथ वाचून वारकऱ्यांनी आध्यात्मिक सुखाचा आनंद घेतला. वारीच्या वाटेवर मरण येवो, ही प्रत्येक वारकऱ्यांची इच्छा असते. त्यामुळे त्या वाटेवर मरण आले तरी चालेल, या भावनेने वारकरी वारीला जाण्याचे थांबले नसते. मात्र, आपल्याबरोबर कोरोनाचा संसर्ग दुसऱ्याला होऊ शकतो, या परोपकाराच्या भावनेने वारकऱ्यांनी वारीला न जाता घरीच थांबणे योग्य मानले. कारण वारकरी संप्रदायाचे मूलतत्त्वच परोपकार हेच आहे. ते तत्त्व दोन वर्ष वारकऱ्यांनी जोपासले. मंदिरे बंद असल्याने देवाच्या दर्शनाला जाणेही थांबले. मात्र, प्रत्येकाने घराचेच मंदिर केले. कोणी ग्रंथांची पारायणे केली. परंपरेची कीर्तने, जागर घरातील माणसांना सोबत घेऊन अनेकांनी केले. त्यात कुठेही खंड पडू दिला नाही.

गतवर्षीची वारी भयावह

गतवर्षी कार्तिकी वारीवर निर्बंध आल्याने वारकऱ्यांना घरूनच मनवारी करावी लागली. मात्र, गतवर्षीची वारी भयावह होती. गेल्या वर्षी पंढरीच्या सर्व रस्ते तीन किलोमीटर बाहेरच बंद केले होते. पंढरीच्या लोकांना गावाबाहेर येऊ दिले गेले नव्हते. तसेच बाहेरच्या कोणाला पंढरीत येऊ दिले गेले नाही. बंद बाजारपेठ, मोकळे रस्ते, रस्त्यावर शुकशुकाट, अशा वातावरणामुळे नेहमी हरिनामाने गजबजणारी पंढरी भयावह वाटत होती. एखाद्या मंदिरात अधूनमधून भजनाचा क्षीण वाटणारा आवाज येत होता. वारकऱ्याच्या गर्दीने भरून जाणारे चंद्रभागेचे वाळवंट ओसाड बनले होते. पोलिसांनी चंद्रभागेचे सर्व रस्ते बंद केले होते. त्यामुळे चंद्रभागेच्या तीरावर पोलिस बंदोबस्तासाठी थांबलेल्या पोलिसांशिवाय कोणीच नव्हते. सामाजिक हिताची जपणूक करण्याच्या हेतूनेच वारकरी संप्रदायाने खूप संयमी भूमिका घेतली. त्यामुळे वारकऱ्यांचे सर्वस्तरावर कौतुक झाले. या काळात संतांची वारी एसटी बसने झाली. राज्याच्या नऊ ठिकाणांवरून पहिल्या वर्षी वीस वारकऱ्यांना, तर दुसऱ्या वर्षी पन्नास वारकऱ्यांना सरकारने संतांसमवेत वारीची परवानगी दिली. एसटी गाड्या उपलब्ध करून दिल्या. त्यातूनच ही परंपरा अखंड राहिली.

हेही वाचा: आळंदीत २६ नोव्हेंबरपासून कार्तिकी वारी सोहळा

अखेर वारी भरली

कोरोनाचा कहर हळूहळू कमी होऊ लागला. लॉकडाउन टप्याटप्याने कमी होत गेला. प्रवासाचे निर्बंध कमी झाले. सर्वात शेवटी मंदिरांचे दरवाजे खुले झाली. जसजसे दरवाजे उघडले भाविकांनी दर्शनाला मंदिरांमध्ये गर्दी केली. त्यानंतर पुन्हा संख्येचे, तसेच वयाची बंधने घालण्यात आली. लशीच्या दोन्ही डोसचा आग्रह झाला. अशा वातावरणात यंदाची पंढरपूर वारी भरणार की नाही, या बाबत संभ्रम होता. गणेशोत्सवानंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत सरकारने दिले होते. मात्र, त्यामध्ये कोरोनाचा तेवढा प्रभाव राहिला नाही. दिवाळीही महाराष्ट्राने धुमधडाक्यात साजरी केली. सर्व काही पूर्वपदावर येऊ लागले आहे. मंदिरे खुली झाली. गावोगावी कार्यक्रम सुरू झाल्याने गावे गजबजू लागली. हरिनामाचे सूर काकड्याच्या माध्यमातून मंदिरांमधून घुमू लागले. मात्र, यंदाच्या कार्तिक वारीबाबत वारकऱ्यांना कमालीची उत्सुकता होती. मात्र, सरकारने त्याबद्दल निर्बंध जाहीर न केल्याने पंढरपूरची कार्तिकी वारी होणार हे निश्चित झाले. त्याप्रमाणे सुमारे दोन लाख भाविक पंढरीत वारीसाठी दाखलही झाले. धर्मशाळांमधून फडांमधून परंपरागत कार्यक्रम झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पावले पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. वारीला आलेल्या भाविकांनी पंढरीतील वारीची परंपरा मनोभावे जोपासली. त्या सावळ्या विठ्ठलाला लांबून का होईना, पण डोळे भरून पाहिले. मनोमन कृतकृत्य झाल्याची भावना अनुभवली. चंद्रभागा तीर अन् सर्व धर्मशाळाही हरिनामाच्या गजराने गजबजून गेल्या. पंढरीला दरवर्षी इतके नाही, पण काही प्रमाणात का होईना भूवैकुंठचे स्वरूप पुन्हा एकदा प्राप्त झाले. कार्तिकी एकादशीला निघणारी दिंडी प्रदक्षिणाही दरवर्षीप्रमाणे निघाल्या. मंदिरात दर्शन रात्रंदिवससुरू ठेवण्यात आले. मात्र, तरीही रांग काही हटत नव्हती. त्यात सरकारने साठच्या पुढील वारकऱ्यांनाही मंदिर प्रवेश दिल्याने ज्येष्ठ वारकऱ्यांनी त्या सावळ्याच्या वारीला हजेरी लावली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात एसटी महामंडळाचा समावेश राज्य सरकारमध्ये करावा, यासाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील एसटीची चाके थांबली. परिणामी, दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. दरम्यानच्या काळात कार्तिकी वारी आल्याने एसटीचा संप मिटेल, अशी वारकऱ्यांना आशा होती. मात्र, ती आशा फोल ठरली. दशमी आली तरी संप सुरूच असल्याने वारकरी खासगी वाहनाने, रेल्वेने पंढरीत दाखल झाले. दोन वाऱ्या चुकल्याने कधी एकदाचा वारीत सहभागी करून त्यासावळ्या विठुरायाच्या चरणी आपली वारी रुजू होईल, अशी वारकऱ्यांची भावना होती. त्यामुळे सुमारे दोन लाख भाविकांच्या उपस्थित यंदाची कार्तिकी वारी भरली.

हेही वाचा: ‘ज्ञानेश्वर माऊलीच्या गजरात सजवलेल्या वाहनातून निघाली वारी

आता आळंदीच्या वारीबाबत उत्सुकता

दोन वर्षांपासून आळंदीत वारी झाली नाही. त्यामुळे यंदाच्या वारीबाबत कमालीची उत्सुकता आहे. पंढरपूरची कार्तिकी वारी एसटी महामंडळाच्या संपामुळे तुलनेने कमी भरली. यंदा ३० नोव्हेंबरला आळंदीची कार्तिकी वारी आहे. तोपर्यंत एसटीचा संप मिटेल, अशी अपेक्षा आहे. तसे झाल्यास गेल्या दोन वर्षांपासून आळंदीत न आलेले राज्यातील भाविक आणि यंदा एसटी संपामुळे पंढरीला जाऊ न शकलेले वारकरी न चुकता आळंदीत वारीला येणार यात शंका नाही. तसेच पंढरपूरच्या कार्तिकीवारीला मराठवाड्यातील वारकरी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. मात्र, त्या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यात एसटीचा संप. त्यामुळे मराठवाड्यातील भाविकांना वारीला येऊ शकले नाहीत. ते वारकरी आळंदीच्या कार्तिकी वारीला आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आळंदीची कार्तिकी वारी यंदा विक्रमी भरण्याची दाट शक्यता आहे. पंढरपूरच्या कार्तिकी वारीमध्ये सरकारने कोणतेही निर्बंध टाकले नाहीत.त्यामुळे आळंदीच्या वारीतही तशाच स्वरूपाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. वारी तोंडावर आली, तरी अद्याप त्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे वारकऱ्यांनी वारीची तयारी केली आहे. पंढरपूरहून काही दिंड्या पायी आळंदीला येत असतात. त्या तेथून निघण्यास सुरुवात होईल. तसेच आळंदीच्या वारीला कोकणातून मोठ्या प्रमाणात दिंड्या पायी येतात. त्यांचाही पायी प्रवास आता सुरू होईल. त्यामुळे यंदाची वारी मोठी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काळजी घेण्याची गरज

कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला, तरी राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांनी आळंदीत येताना काळजी घेण्याची गरज आहे. सामाजिक भान राखून वारकऱ्यांनी वारी करावी. सरकारकडून अपेक्षा न धरता वैयक्तिक पातळीवर वारकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. म्हणजे आळंदीत कार्तिकीत धर्मशाळांमधून सप्ताहाचे कार्यक्रम असतात. त्यामुळे येणाऱ्या वारकऱ्यांनी आळंदी कुठेही न फिरता आपापल्या धर्मशाळांमध्ये थांबून भक्तिसुखाचा आनंद घ्यावा. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा अखंड वापर करावा, जसा संयम दोन वर्ष वारकऱ्यांनी धरला. तसाच संयम ठेऊन आळंदीत वारीला येऊन नियमांचे पालन करून धरावा. वयस्कर तसेच आजारी असलेल्या वारकऱ्यांनी यंदाही घरातूनच मनवारी करावी. आळंदीत येणे टाळावे. आळंदी संस्थान, तसेच धर्मशाळांनी आपल्या पातळीवर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आळंदी नगर परिषदेने येथील नियोजन राज्य सरकारकडे पाठविले आहे.

हेही वाचा: माऊलींच्या चोपदारांची अंतरंगवारी! आळंदी ते पंढरपूर प्रवास

असा असेल संजीवन समाधी सोहळा

- कार्तिक वद्य अष्टमी (ता. २७ नोव्हेंबर) ः माऊली मंदिराच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्यास प्रारंभ

- कार्तिक वद्य एकादशी (ता. ३० नोव्हेबर) ः माऊलींच्या संजीवन समाधी दिनमध्यरात्री समाधीवर पवमान अभिषेक,दुधारती. रात्री बारा ते दोन जागर

- कार्तिक वद्य त्रयोदशी (ता. २डिसेंबर) ः पहाटे तीन ते साडेपाच वाजतामाऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक दुधारती. सकाळी साडेआठ ते दहाहैबतबाबांच्या वतीने महाद्वारात,तर दहा ते बारा वीणा मंडपात संतनामदेवांचे वंशजांचे परंपरेने कीर्तन. दुपारी बारा वाजता घंटानाद वपुष्पवृष्टी होऊन समाधिदिन सोहळा होईल

- कार्तिकी वद्य अमावस्या (ता. ४ डिसेंबर) ः रात्री ‘श्रीं’च्या छबिना मिरवणूक

loading image
go to top