रानगवा आणि बोध भविष्याचा... 

Indian bison
Indian bison

पुण्यात गेल्या बुधवारी कोथरूड परिसरात भल्या पहाटे थेट जंगलातून रानगवा आला आणि एकच हलकल्लोळ माजला. त्यामुळे गव्याला पकडण्यातही अनेक अडचणी उभ्या ठाकल्या. पकडले जाण्यापासून वाचण्यासाठी रानगवा बेभान धावला, यातच अखेर त्याचा मृत्यू झाला. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात असा अनोखा पाहुणा जेव्हा थेट रस्त्यावर अवतरतो, त्या वेळी त्याला पाहायला गर्दी होणारच. त्यामुळे आता यातून आपण भविष्यासाठी काय बोध घेणार, हे महत्त्वाचे आहे...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुळात पुणे शहर हे पश्‍चिम घाटाचाच एक भाग आहे. या भागात संपन्न अशी जैवविविधता आहे. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या शहराच्या काही सीमा थेट डोंगरालाच जाऊन भिडतात. तुम्ही चांदणी चौकातून पुढे गेल्यावर पौंड, मुळशी आणि पुढे थेट कोकणात उतरता. कात्रजहून पुढे महाबळेश्‍वर, कोयनेपर्यंत डोंगररांगा आहेत. या हिरव्यागार डोंगररांगा प्राण्यांसाठी सुखेनैव संचार करण्यासाठीचे कॉरिडॉरच आहेत, हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे अनेकदा जंगलात भटकणारे प्राणी वाट चुकतात आणि भरकटतात. याही वेळी तसेच झाले. हा गवा महाबळेश्वर किंवा मुळशी, पौडमार्गे पुण्यात शिरला असल्याचे मानले जाते. पुण्याच्या आसपासच्या डोंगररांगांत बिबट्या, लांडगे, चितळ, सांबर, तरस असे वन्यजीव आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेकदा बिबट्याचे दर्शन घडते. थोडक्‍यात, पुण्याच्या वेशीवर वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. त्यातील एखादा प्राणी चुकून केव्हातरी जंगलाची हद्द ओलांडून शहरात प्रवेश करणारच. अशावेळी त्याचा सामना कसा करायचा हे आता निश्‍चित करण्याची वेळ आली आहे. 

प्राणी-मानव संघर्ष
प्राणी व मानव यांचा संघर्ष हा साऱ्या देशातील सध्याचा कळीचा मुद्दा आहे. शहरांची झालेली बेसुमार वाढ, जंगलतोड, अन्न-पाण्याचे दुर्भिक्ष अशा कारणांमुळे वन्यप्राणी जंगलातून बाहेर पडतात. कर्नाटकातून दरवर्षी हत्ती मोठ्या प्रमाणात कोकणात येतात, ते यामुळेच. त्यामुळेच विदर्भातील अनेक गावांत वाघांची, तर आपल्याकडे बिबट्याची अशीच दहशत आहे. तुलनेने पुण्यात असे प्रसंग फार कमी घडतात. सुमारे २० वर्षांपूर्वी पुण्यात असाच रानगवा शिरला होता. त्यावेळी त्याचाही मृत्यू झाला होता. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, गव्यासारख्या वजनदार प्राण्याला फारसे धावता येत नाही. धावल्याने त्याच्या हृदयावर ताण येतो व त्यातच हृदय बंद पडून त्याचा मृत्यू होतो. पुण्यातही नेमके हेच घडले. वीस वर्षांपूर्वी जेव्हा गवा आला होता त्यावेळी फारसे मोबाईलही नव्हते.

सोशल मीडिया तर नव्हताच. यावेळी गवा येताच त्याची छबी टिपण्यासाठी, चित्रण करण्यासाठी सर्वांचे मोबाईल कॅमेरे सरसावले. आपण जंगलात जातो, त्यावेळी आपले वर्तन वेगळे असते. पण, आपल्याच शहरात एखादा वन्यप्राणी समोर उभा ठाकतो, त्यावेळी ते नेमके वेगळे असते. याचे कारण म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना अशावेळी नेमके काय करायचे याचीच माहिती नसते. त्यांना ती देण्याची वनखात्याने मोहीम राबवायला हवी.

जागरुकता आवश्‍यक
खरे तर केवळ शासकीय यंत्रणांनाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनीही यात आता सहभागी करून घेण्याची गरज आहे. त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे वनखात्याला सहज शक्‍य आहे. वनखात्याने आता शहराच्या सर्व भागातील पाच नागरिकांना प्रशिक्षण देण्याचे सुतोवाच केले आहे. त्याची खरेच तातडीने अंमलबजावणी करायला हवी. काही वर्षांपूर्वी सापांबाबत नागरिकांमध्ये प्रचंड भिती होती. पण गेल्या काही वर्षांत शहराच्या विविध भागांत सर्पमित्रांची संख्या वाढल्याने सापांचा जीव वाचणे सहज शक्‍य झाले आहे. अशाच प्रकारे नागरिकांचे सतत प्रबोधन व काही निवडक जणांना मानवी वस्तीतील वावराबाबतचे प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे. शेवटी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून, सहभागांतूनच भविष्यात आपण अशा प्रसंगी वन्यजीवांचे संरक्षण करू शकू!

शासनाच्या ‘एसओपी’नुसार जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस, वनविभाग, अग्निशामन दल, रेस्क्‍यू पथकाने वन्य प्राणी आल्यास काय करायचे हे ठरविलेले आहे. मात्र, गवा अचानक आल्याने या यंत्रणांची समन्वय साधताना तारांबळ उडाली. याबाबत पुढील काळात या यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा बैठक घ्यायला हवी. त्यामुळे समन्वय साधणे सोपे जाईल. भविष्यात एखादा वन्यप्राणी शहरात आल्यास आपण नेमके काय करायचे हे पोलिसांना, वन विभागाला तसेच अग्निशमन दलाला माहिती असेल. 
- अनुज खरे, वन्यअभ्यास

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com