भीमाशंकर महाशिवरात्र यात्रेनिमित्त भाविकांची सुरक्षा व प्लॅस्टिक बंदीला प्राधान्य

Bhimashankar-Temple
Bhimashankar-Temple

घोडेगाव - ‘श्री क्षेत्र भीमाशंकर येथील महाशिवरात्र यात्रेनिमित्त भाविकांची सुरक्षा व प्लॅस्टिक बंदीला प्राधान्य द्यावे. या वेळी मंचर शहरातून होणारी वाहतूक कमी व्हावी यासाठी पेठ, कळंब, नारायणगाव मार्गे वाहतूक वळवावी,’’ यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सूचना दिल्या.

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसील कार्यालयात मंगळवारी (ता. १८) सायंकाळी भीमाशंकर येथील महाशिवरात्र यात्रेचे नियोजन बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रांतअधिकारी जितेंद्र डुडी, खेड उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी, खेडचे तहसीलदार संजय तेली, मंचरचे पोलिस निरीक्षक कृष्णराव खराडे, घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे उपस्थित होते.

मंचर येथील शहरातील मुख्य रस्त्याचे क्राँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने येथून वाहतूक पूर्ण बंद आहे. उजवा डिंभा कालवा वाहतुकीस अरुंद आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पेठ, नारायणगाव, कळंब येथे पोलिस थांबून भीमाशंकरकडे जाण्याच्या सूचना करणार असल्याचे कृष्णराव खराडे यांनी सांगितले. पार्किंगसाठी भीमाशंकर मंदिराकडे जाताना वाहनतळ क्र. ४ येथे बससाठी पार्किंग केले आहे. ३ व २ क्रमांकावर चार चाकी कार पार्किंग व्यवस्था केली आहे. तसेच एक नंबरला दुचाकी पार्किंगसाठी व्यवस्था केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने उद्यापर्यंत खड्डे भरून घ्यावेत. नशाखोर तरुणांवर पोलिसांनी कारवाई करावी. आरोग्य विभागाने १०८ व १०२ रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. २४ तास आरोग्यपथक कार्यरत ठेवावे. शुद्ध पाण्याचा वापर करावा. लाईटची पूर्ण व्यवस्था करावी. देवस्थानच्या वतीने यात्रा नियोजन सुलभ पार पाडण्यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही खेड व आंबेगाव तहसील कार्यालयाने करावी. पोलिस बंदोबस्त २० ते २२ फेब्रुवारीपर्यंत ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महाशिवरात्रीसाठी प्रशासन सज्ज
शिनोली - श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे शुक्रवारी (ता. २१) होणाऱ्या शिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आंबेगाव प्रांताधिकारी जितेंद डुड्डी, खेड प्रांताधिकारी संजय तेली व भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी दिली.

दरम्यान, येथे येणाऱ्या वाहनांची संख्या विचारत घेऊन एमटीडीसी, फॉरेस्ट थांबा याच्यासह पाच वाहनतळांची सोय करण्यात आली आहे. वाहनतळ क्रमांक चार व पाच मोठ्या वाहनांचे नियोजन केले आहे. व बाकीच्या वाहनतळांवर दुचाकी गाड्यांचे नियोजन केले आहे. वाहनतळ ते बस स्थानकापर्यंत मिनीबस व्यवस्था ठेवण्यात आली आहे. एसटी महामंडळाकडून जादा गाड्यांची सोय करण्यात आलेली आहे. यात्रेस येणाऱ्या भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी पायऱ्यांच्यावर दर्शनबारी वाढविण्यात येणार आहे. दर्शनबारीत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. यात्रा काळात पाण्याचे व खाद्याचे नमुने तपासण्यासाठी आरोग्य पथके नेमण्यात आली आहे. हॉटेल व दुकान व्यावसायिकांना गॅस सिलिंडर वापरण्यास बंदी केली आहे.

यात्रा बंदोबस्तासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोंम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव व खेड पोलिस ठाण्याचा बंदोबस्त नेमला आहे. २० पोलिस अधिकारी, १८० पोलिस कर्मचारी तैनात करणार आहेत. ब्रेथ ॲनालायझर मशिनव्दारे मद्यप्राशन तपासणीसाठी पथक नेमण्यात आले आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मंदिर परिसरात अग्निशामक बंब, वैद्यकीय पथक ठेवण्यात आले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था व देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून वाहनतळ, दर्शनबारी व मंदिर परिसरात स्वच्छता ठेवली जाणार आहे. लाइट व मोबाईल सेवा सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागाचे कर्मचारी लक्ष देवून असणार आहेत. संपूर्ण यात्रेचे नियोजन खेड उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, आंबेगाव तहसीलदार रमा जोशी व खेड तहसीलदार सुचित्रा आमले व देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com