esakal | कोरोनाबाधितांच्या मनातील भीती दूर करुन आत्मविश्वास निर्माण करा : गृहमंत्री

बोलून बातमी शोधा

कोरोनाबाधितांच्या मनातील भीती दूर करुन आत्मविश्वास निर्माण करा : गृहमंत्री
कोरोनाबाधितांच्या मनातील भीती दूर करुन आत्मविश्वास निर्माण करा : गृहमंत्री
sakal_logo
By
डी के वळसे पाटील

मंचर : ''कोरोनाचे महाभयंकर संकट रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक पुढाकार घेण्याची गरज आहे. बाधित रुग्णांच्या मनातील भीती दूर करा. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करा. अंगावर आजार न काढता ताबडतोब डॉक्टरांकडे जा. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्कचा वापर करा.'' असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

राज्याच्या गृहमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर शनिवारी प्रथमच दिलीप वळसे पाटील यांचे मंचर येथे आगमन झाले. वळसे पाटील यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने शरद सहकारी बँकेच्या सभागृहात वळसे पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

हेही वाचा: छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अनिल बागल यांच्यावर प्राणघातक हल्ला

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, ,बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेबां बाणखेले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन वळसे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कोरोना आढावा बैठकीत वळसे-पाटील म्हणाले" कोरोना च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये मोठा फरक आहे. सद्यस्थितीत लक्षणे लवकर आढळून येत नाहीत. परिणामत: कुटुंबातील जवळपास सर्व लोक बाधित होतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची धावपळ सुरू होते. ऑक्सिजन , व्हेंटिलेटर बेड व रेमेडीसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य व केंद्र स्तरावर शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच हे प्रश्न सुटतील. पण हा संसर्ग वाढू नये म्हणून प्रत्येक कुटुंबाने काळजी घेणे गरजेचे आहे.''

''आंबेगाव तालुक्यात शिनोली, अवसरी खुर्द, लांडेवाडी येथे कोवीड उपचार केंद्र सुरू झाली आहेत. त्याचा उपयोग प्राथमिक अवस्थेतील कोरोना बाधित रुग्णांना होणार आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड ची संख्या वाढविण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन केले आहे. एचआरसिटी स्कोर दहापर्यंत असलेले अनेक रुग्ण रेमेडीसिवर इंजेक्शन विना घरी बरे झाल्याची उदाहरणे आहेत. गरज नसताना या इंजेक्शनचा आग्रह रुग्ण व नातेवाईकांनी धरू नये. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील कोरोना उपाययोजनांसाठी सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत मी दररोज सकाळ-संध्याकाळी प्रशासन व कार्यकर्त्यांकडून आढावा घेत असतो. आवश्यक त्या उपाययोजना करण्याविषयी सूचना देऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. काही खाजगी डॉक्टर ज्यादा बिले घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर बिलांची तपासणी करून रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले जाईल. अठरा वर्षापुढील व्यक्तींना प्रतिबंधात्मक लस देण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या आठ-दहा दिवसात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होईल. लसीकरणाबाबत कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात जनजागृती करून पहिल्या व दुसऱ्या डोसपासून एकही व्यक्ती वंचित राहणार नाही. अशा पद्धतीचे नियोजन करावे. दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना मृत्यूचा धोका नसतो. त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी. प्लाज्मा शिबिर घेण्याबाबत केलेल्या मागणीची कार्यवाही केली जाईल."' अशी माहिती त्यांनी यावेळी सांगितली.

हेही वाचा: बारामतीत डॉक्टरांची व्हेन सर्किट प्रणाली रुग्णांना ठरतेय वरदान

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंचर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सदर संकलित झालेल्या रक्ताचा उपयोग अनेक रुग्णांना झाला.अशाच पद्धतीने कोरोना बाधित रुग्ण व कुटुंबियांना मदत व आधार देण्याचे काम प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी करावे. संसर्ग आटोक्यात येण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे.

देवेंद्र शहा यांनी लोकसहभागातून सहकारी पतसंस्था , दानशूर व्यक्ती व भीमाशंकर साखर कारखान्याच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या व्हेंटिलेटर व ऑक्सिजन उपकरणांची माहिती दिली.यावेळी झालेल्या चर्चेत वसंतराव भालेराव, कैलास बुवा काळे, विवेक वळसे पाटील, अरुणा थोरात, अंकित जाधव,रमेश खिलारी,जयसिंगराव काळे, दत्ता थोरात ,संतोष गावडे सुहास बाणखेले, सुरेश निघोट, निळकंठ काळे, संतोष धुमाळ, अक्षय काळे, राजेंद्र थोरात, जगदीश घीसे आदींनी भाग घेतला.

हेही वाचा: 'विद्युतदाहिनीतील राख थांबवण्यासाठी पुणे महापालिकेच्या उपाययोजना काय?'