मोठी बातमी : 'या' पाच प्रभागांतील निम्म्या पुणेकरांना कोरोनाची लागण; सर्व्हेतून पुढे आली माहिती!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

महापालिकेच्या मदतीने भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पाच प्रभागातील 18 वर्षांपुढील नागरिकांच्या रक्त नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

पुणे : कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या पाच प्रभागांतील अर्ध्या लोकसंख्येत कोरोनाचा प्रसार झाल्याचे रक्तनमुन्यांच्या चाचणीतून स्पष्ट झाले आहे. मात्र, समूह रोगप्रतिकारकशक्ती (हर्ड इम्युनिटी) विकसित झाल्याबद्दल अजूनही ठोस विधान करता येत नसल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. 

Video : राज्यात पावसाची बॅटिंग सुरूच राहणार; हवामान खात्यानं दिलाय इशारा​

महापालिकेच्या मदतीने भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पाच प्रभागातील 18 वर्षांपुढील नागरिकांच्या रक्त नमुन्यांची चाचणी करण्यात आली. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी आयसरचे शास्त्रज्ञ डॉ. अर्णब घोष, डॉ.एल.एस. शशिधरन, विद्यापीठाच्या डॉ. आरती नगरकर आदी उपस्थित होते.

ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्सेस ऍन्ड टेक्‍नॉलॉजी इन्स्टिट्यूट, वेल्लूर येथील ख्रिश्‍चन मेडिकल कॉलेजचाही या सर्वेक्षणात सहभाग होता. पर्सिंस्टंट फाउंडेशनने आर्थिक साहाय्य केले. डी.वाय.पाटील विद्यापीठ आणि बी.जै.वैद्यकीय महाविद्यालयाच्या मदतीने अजून काही सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. 

गणेशोत्सवात 'या' चार दिवशी ध्वनीवर्धक रात्री बारापर्यंत सुरू राहणार; पुणे पोलिसांनी केले जाहीर!​

सर्वेक्षणाचे निष्कर्ष :
- पाच प्रभागांतील 36 ते 65 टक्के लोकसंख्येत कोरोनाचा प्रसार 
- ज्येष्ठांमध्ये (66 वर्षांपुढील) तुलनेने कमी प्रसार 
- सर्व प्रकारच्या निवासस्थानांमध्ये कोरोनाचा प्रसार 
- तुलनेने झोपडपट्टीत राहणाऱ्यांमध्ये प्रसार अधिक 
- सामूहिक शौचालय वापरणाऱ्यांमध्ये 62.3 टक्के प्रसार 
- महिला आणि पुरुषांमध्ये कोरोनाचा प्रसार सारखाच 

प्रभागानुसार कोरोनाचा लोकसंख्येतील प्रसार (टक्‍क्‍यांमध्ये) : 
1) येरवडा : 56.6 
2) कसबा पेठ-सोमवार पेठ : 36.1 
3) रास्ता पेठ-रविवार पेठ : 45.7 
4) लोहिया नगर-कासेवाडी : 65.4 
5) नवीपेठ-पर्वती : 56.7 

वयानुसार कोरोनाचा प्रसार (टक्‍क्‍यांमध्ये) 
1) 18 ते 30 वर्ष : 52.5 
2) 31 ते 50 वर्ष : 52.1 
3) 51 ते 65 वर्ष : 54.8 
4) 66 वर्षाच्या पुढील : 39.8 

पानशेतही ओव्हर फ्लो; मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढला!​

आकडे बोलतात... 
- सर्वेक्षणाचा कालावधी : 20 जुलै ते 5 ऑगस्ट 
- रक्त नमुने : 1,664 
- पाच प्रभागातील सरासरी ग्रीडची संख्या : 12 
- एका ग्रीडमधील कुटुंबांची संख्या : 25 
- सरासरी कोरोना प्रसार : 51.5 

अशा सर्वेक्षणातून प्रशासनाची आजवरच्या कार्यपद्धतीबद्दल स्पष्टता येते. तसेच भविष्यात साथीच्या नियंत्रणासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी शास्त्रीय माहितीचा आधार उपलब्ध होतो. 
- सौरभ राव, विभागीय आयुक्त. 

पाच प्रभागांतील अर्धी लोकसंख्येत कोरोनाचा प्रसार झाल्याचे स्पष्ट होते. मात्र, समूह प्रतिकारशक्ती विकसित झाली असून, पुन्हा कोरोनाचा प्रसार होणार नाही, असा निष्कर्ष काढणे सध्यातरी शक्‍य नाही. त्यासाठी अधिकचे सर्वेक्षण व्हावे लागेल. 
- डॉ. अर्नब घोष, शास्त्रज्ञ, आयसर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona spread to half the population in five wards of Pune city survey conducted by IISER and Pune University