esakal | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; खरिपासाठीच्या पीककर्जाचं वितरण; पुणे, नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer-Kharip-Crop

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बॅंकांकडून पीककर्ज वितरीत करण्यात येते. राज्यात एक एप्रिल ते 31 ऑक्‍टोबरपर्यंत 46 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; खरिपासाठीच्या पीककर्जाचं वितरण; पुणे, नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक

sakal_logo
By
अनिल सावळे

पुणे : राज्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 34 हजार 916 कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले आहे. पीककर्जाचे सुमारे 76 टक्‍के उद्दिष्ट पूर्ण झाले असून, पुण्यासह नगर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. 

पदवीधर निवडणूक - मतदान ओळखपत्र नसेल तर जवळ ठेवा ही कागदपत्रे​

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बॅंकांकडून पीककर्ज वितरीत करण्यात येते. राज्यात एक एप्रिल ते 31 ऑक्‍टोबरपर्यंत 46 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात आले आहे. सहा टक्‍के व्याजदराने हे पीककर्ज दिले असून, एक वर्षात त्याची परतफेड करावी लागणार आहे. 
नगर जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे तीन हजार 147 कोटींचे पीककर्ज वितरीत करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात दोन हजार 465 कोटी, नाशिक जिल्ह्यात दोन हजार 342 कोटी, कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार 982 कोटी, सातारा जिल्ह्यात एक हजार 737 कोटी, सोलापूर जिल्ह्यात एक हजार 356 कोटी, यवतमाळ जिल्ह्यात एक हजार 576 कोटी, बुलडाणा जिल्ह्यात एक हजार 260 कोटी आणि लातूर जिल्ह्यात एक हजार 241 कोटींचे पीककर्ज वितरीत करण्यात आले आहे. 

'शनिवारवाडा पर्यटकांसाठी खुला करा, नाहीतर आम्ही उघडू'; ब्राह्मण महासंघाचा इशारा

विभागनिहाय कर्ज वितरण : (शेतकरी संख्या आणि कंसात कर्जवाटप कोटींमध्ये) : 
पश्‍चिम महाराष्ट्र : 18 लाख 27 हजार 46 (16 हजार 729 कोटी) 
मराठवाडा : 13 लाख 46 हजार 827 (8 हजार 212 कोटी) 
विदर्भ : 12 लाख 20 हजार 735 (8 हजार 994 कोटी) 
कोकण : 2 लाख 9 हजार 76 (979 कोटी) 

उद्दिष्टाच्या तुलनेत निम्मेच पीककर्ज - 
अमरावती, बुलडाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, लातूर, उस्मानाबाद, पालघर आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. या जिल्ह्यांमध्ये 46 ते 60 टक्‍के कर्ज वितरण झाले आहे. हिंगोली, वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी 46 ते 47 टक्‍के कर्ज वाटप झाले आहे. लातूर आणि धुळे जिल्ह्यात 54 टक्‍के पीककर्ज वाटप झाले आहे. 

बारामती : व्यापाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी नगरसेवक आणि माजी सभापतीसह ९ जणांवर गुन्हा दाखल​

शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पीककर्ज - 
नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, अकोला, औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यात शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पीककर्ज वाटप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत 160 टक्‍के पीककर्ज वाटप झाले आहे. 

राज्यात खरीप हंगामासाठी ऑक्‍टोबरपर्यंत 76 टक्‍के पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. एक लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज एक वर्षात परत केल्यास त्यावरील संपूर्ण व्याज माफ करण्यात येणार आहे. काही बॅंकांनी तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जरकमेवरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- अनिल कवडे, सहकार आयुक्‍त

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)