बारामतीकरांनो, सावध व्हा, धोका संपलेला नाही...  

मिलिंद संगई
Monday, 1 June 2020

इतकी गर्दी होत असताना आणि पोस्ट कार्यालयाकडून वारंवार सूचना देऊनही स्थानिक प्रशासनाने मात्र याबाबत काहीही कार्यवाही केली नाही.

बारामती (पुणे) : बारामती शहरातील पोस्ट कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीने आज शहरातील सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले. विशेष म्हणजे, इतकी गर्दी होत असताना आणि पोस्ट कार्यालयाकडून वारंवार सूचना देऊनही स्थानिक प्रशासनाने मात्र याबाबत काहीही कार्यवाही केली नाही.

- पैसे गेले अन् गाडीही सुटली; परराज्यातील कामगारांवर भामट्यांमुळे आली ही वेळ!   

पोस्टाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खात्यात गेल्या काही दिवसांपासून सरकारी अनुदान जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही पैसे या खात्यात जमा करणार आहेत, कोरोनासाठी काही पैसे या बँकेच्या खात्यावर जमा होणार आहेत, अशा स्वरुपाच्या अफवांमुळे हे खाते उघडण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे. 

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली घोषणा!

अनेक महिला पहाटे पाच वाजल्यापासूनच उपाशीपोटी रांगा लावत आहेत. आज सकाळ प्रतिनिधीने सकाळी या महिलांची भेट घेत चौकशी केल्यानंतर अनेक महिलांना हे खाते नेमके कशासाठी सुरु करायचे आहे, याची काहीही माहिती नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यात काही पैसे जमा करणार आहेत आणि इतर महिलांनी ही खाती सुरु केली आहेत, या साठी आम्हीही हे खाते सुरु करण्यासाठी आलो आहोत, असे या महिलांनी नमूद केले. या संदर्भात पोलिसांकडून बंदोबस्त दिला जात आहे, मात्र आपले खाते लवकर सुरु व्हावे, या साठी महिलांकडून गर्दी केली जात आहे. 

पुणेकरांनो सावधान : पुढचे चार दिवस धोक्याचे, हवामान खात्यानं दिलाय इशारा

या संदर्भात पोस्ट खात्याचे प्रमुख अमेय निमसुडकर यांनीही महिलांना याबाबत माहिती दिली, मात्र काहीही करा पण आमचे पोस्टातील खाते सुरु करुन द्या, असा आग्रह त्यांनी धरला होता. रांगेत थांबतो, कितीही वेळ थांबतो, पण खाते सुरु करा, यावर महिला ठाम होत्या. 

गुड न्यूज गुड न्यूज : कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा रेट मंदावतोय; वाचा सविस्तर आकडेवारी

सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा...
जवळपास दोनशेहून अधिक महिला रांगेत परस्परांच्या अगदी जवळ अनेक तास उभ्या असतात. यात संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे. याबाबत माध्यमांनी दखल घेऊनही स्थानिक प्रशासन काहीही उपाययोजना आखत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आमराई परिसरात एकाच वेळेस अनेक तास या महिलांचा वावर धोकादायक असून कोरोनामुक्त बारामतीसाठी ही गर्दी भविष्यात चिंतेचा विषय ठरु शकते. महिलांसमवेत ज्येष्ठ नागरिक व छोटी मुलेही येथे येतात ही अजून चिंताजनक आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowd of women to open an account at india Post Payment Bank in Baramati