काय सांगता! कोरोना रुग्णांवर उपचार करण्याच्या अटीवर डॉक्टरला जामीन मंजूर!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

डॉ. इंद्रकुमार देवराव भिसे (वय ५२, रा. शिरुर) असे जमीन मंजूर झालेल्या डॉक्टराचे नाव आहे.​

पुणे : मोक्काअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असलेल्या एका आरोपी डॉक्टरने कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी जामीन देण्यात यावा, अशी मागणी करत जामिनासाठी अर्ज दाखल केला.

- Unlock 1 : देशभरात दुकानांची वेळ एकच असावी; पाहा कुणी केली मागणी?

त्यावर संबंधित डॉक्टरला ससून रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाच्या रुग्णांवर आठवड्यातून पाच दिवस उपचार करण्याच्या अटीवर न्यायालयाने ६० दिवसांचा तात्पुरता जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी अटी-शर्तीवर हा जामीन मंजूर केला.

- परीक्षा रद्द केल्या ते ठीक, पण बॅकलॉगचं काय होणार? विद्यार्थी चिंतातूर!

डॉ. इंद्रकुमार देवराव भिसे (वय ५२, रा. शिरुर) असे जमीन मंजूर झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. येरवडा कारागृहात असलेल्या डॉ. भिसे यांनी करोना रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त करत जामीन मिळावा म्हणून ऍड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जामीनाच्या सुनावणीला डॉ. भिसे हे येरवडा जेलमधून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर झाले होते.

- पॅरामिलिटरी कँटीनमधून १००० परदेशी उत्पादने हटविली; 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने पहिले पाऊल!

राज्याचे तत्कालीन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करण्याची धमकी देऊन 30 कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात मोकाअंतर्गत डॉ. भिसे यांच्यावर बारामती पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे.

गेली एक वर्षे ते येरवडा कारागृहात आहेत. आरोपीने त्याला असलेल्या वैद्यकीय सेवेचा अनुभव सार्वजनिक आरोग्य विभागाला उपयोगी होईल, म्हणून अर्ज केला असून तो मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद केले.

- कोरोनाला बसणार आळा; पुण्यातील तंत्रज्ञांनी विकसित केलं विषाणूरोधी आवरण!

डॉ. भिसे यांनी आठवड्यातील पाच दिवस डॉक्टर म्हणून ससूनमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करावेत. साक्षीदारांवर दबाव टाकू नये. जामीनाची मुदत संपण्याअगोदर कारागृहात हजर राहावे. ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांचे प्रमाणपत्र सादर करावे, या अटींवर न्यायालयाने त्यांना 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर 60 दिवसांसाठी तात्पुरता जामीन मंजूर केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor was granted bail on the condition of treating Corona patients