पॅरामिलिटरी कँटीनमधून १००० परदेशी उत्पादने हटविली; 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने पहिले पाऊल!

Paramilitary_canteen
Paramilitary_canteen

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत'चा नारा दिल्यानंतर विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरवात झाली. आणि अनेक नागरिकांनी विदेशी कंपनीच्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा स्वदेशी कंपनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे आपला मोर्चा वळविला. 

या पार्श्वभूमीवर देशभरातील अर्धसैनिक दलाच्या (Paramilitary Canteens) कँटीनमधील सुमारे १ हजार आयात केलेली उत्पादने हटविण्यात आली आहेत. आजपासून पॅरामिलिटरी कँटीनमधून 'मेड इन इंडिया' उत्पादनांचीच विक्री केली जाणार आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यांची उत्पादने यापुढे कँटीनमध्ये उपलब्ध होणार नाहीत.

पॅरामिलिटरी कँटीनमधून न्यूट्रीला, किंडर जॉय, हॉर्लिक्स ओट्स, युरेका फोर्ब्स, टॉमी हिलफिगर शर्ट आणि आदिदास बॉडी स्प्रे ही उत्पादने हटविण्यात आली आहेत. मायक्रोवेव ओव्हन आणि अन्य घरगुती वापराच्या वस्तूही यापुढे उपलब्ध होणार नाहीत.

१३ मे रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने केलेल्या घोषणेनुसार, यापुढे स्वदेशी उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे सीएपीएफच्या १७०० हून अधिक कँटीनमध्ये १ जूनपासून फक्त स्वदेशी बनावटीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. ज्या वस्तू पूर्णपणे आयात केलेल्या उत्पादनांपासून तयार केल्या जातात त्या सीएपीएफच्या कँटीनच्या यादीमधून हटविण्यात येत आहेत, असेही गृह मंत्रालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ब्लू स्टार लिमिटेड, बोरोसिल ग्लास वर्क्स लिमिटेड, कोलगेट पामोलिव इंडिया, डाबर इंडिया, व्हीआयपी इंडस्ट्रीज, यूरेका फोर्ब्ज, जकुआर, एचयूएल (फूड्स), नेस्ले इंडिया यांसारख्या कंपन्यांची उत्पादने यादीतून हटविण्यात आली आहेत. 

पॅरामिलिटरी कँटीनमधून वर्षभरात सुमारे २८०० कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री केली जाते. या कँटीनमधून १० लाख कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसाठी सामानाची खरेदी करत असतात. या कँटीनद्वारे विक्री होणाऱ्या वस्तूंचा वापर सुमारे ५० लाख नागरिक करत आहेत.

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे (सीएपीएफ) जवान अंतर्गत आणि सीमा सुरक्षा राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सीएपीएफमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआईएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलिस (आईटीबीपी), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) आणि आसाम रायफल्स यांचा समावेश होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com