पुण्यातील या ग्रामपंचायतीचा कोरोनाला रोखण्यासाठी भन्नाट फाॅर्म्यूला

lock down
lock down

नसरापूर (पुणे) : भोर तालुक्यातील नसरापूर येथे बाजारपेठेतील दुकाने सम- विषमच्या फाॅर्म्यूल्यानुसार चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

नसरापूर येथे 2 मे रोजी कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण बाजारपेठ अनेक दिवस बंद होती. त्यानंतर बाजारपेठ सुरू होण्यासाठी सरकारच्या नियमानुसार सम- विषम पद्धतीने बाजारपेठ उघडण्यात यावी, असे आदेश आले होते. परंतु, बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत आपण दररोज सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेऊन रविवारऐवजी गुरुवारी सर्व बाजारपेठ बंद ठेवूनगर्दी कमी करू असे ठरले. त्यानुसार नसरापूर व्यापारी असोसिएशनने प्रशासनास कल्पना देऊन तशी अंमलबजावणी चालू होती. 

मात्र, या वेळापत्रकात काही व्यापारी दुपारी तीननंतर देखिल दुकाने उघडी ठेवणे किंवा अर्धे शटर उघडे ठेऊन ग्राहकांना माल विकणे, गुरुवारी पूर्ण बंदच्या दिवशी दुकान उघडुन बसणे, असे प्रकार करत होते. याबाबत व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी अशा व्यापाऱ्यांना कल्पना देऊनही असे प्रकार दररोज होत होते. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी कायमच राहत होती. तसेच, नियम पाळणारे व्यापारीदेखिल नाराजी व्यक्त करत असोसिएशनकडे तक्रार करत होते.

या दरम्यान जुलै महिन्यात नसरापूर परिसरातील गावांमध्ये अनेक कोरोना रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नसरापूरसारख्या गर्दीच्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करून गर्दी कमी करण्यास सहकार्य करणे गरजेचे असताना नियम मोडलेच जात होते. त्यासाठी नसरापूरचे कोवीड 19 चे प्रभारी अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी, महसुल प्रशासन, पोलिस प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थापन समिती यांनी संयुक्त बैठक घेऊन गर्दीचे नियोजन करण्यासाठी एकाच वेळी सर्व दुकाने उघडी न ठेवता सम- विषम पद्धतीने सुरु राहावीत, असे नियोजन करण्यात आले आहे.

नियोजनात ठरल्याप्रमाणे बाजारपेठेतील मुख्य रस्ता चेलाडी- वेल्हे रस्त्याच्या दोन बाजूंपैकी उजवी बाजू सिद्धीविनायक हाॅस्पिटल ते भैरवनाथ मंदिर मेन आळी या बाजूची दुकाने मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवशी चालू राहतील, तर रस्त्याची डावी बाजू चेलाडी येथील नेवारा बिल्डिंग ते मटण मार्केट या बाजूची दुकाने सोमवार, बुधवार, शुक्रवार चालु राहतील. दुकानांची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत राहणार असून, दर रविवारी पूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. भाजीपाला विक्रेत्यांना फक्त सम तारखेस विक्रीची परवानगी देण्यात आली आहे, असे प्रभारी अधिकारी अभय निकम यांनी जाहीर केले आहे.

या बैठकीमध्ये पोलिस कर्मचारी नितीन रावते व सुधीर होळकर यांनी वरील आदेशाचा व्यापारयांनी भंग केल्यास कलम 188 नुसार कारवाई करण्यात येऊन दुकानाचा परवाना देखिल रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले आहे. या बैठकीस नसरापूरचे तलाठी जे. डी. बरकडे, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष अनिल गयावळ, कार्याध्यक्ष प्रकाश चाळेकर, प्रदिप राशिनकर, उपाध्यक्ष रमेश कदम, सचिव वैभव भुतकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com