#BanManja मांजाने गळा कापलेल्या प्रिया शेंडे म्हणतात, चिलखत घालून फिरायचे काय?

#BanManja मांजाने गळा कापलेल्या प्रिया शेंडे म्हणतात, चिलखत घालून फिरायचे काय?

पुणे - हवेत तरंगणाऱ्या मांजाने कोणत्याही क्षणी गळा कापण्याची भीती दिवसेंदिवस वाढत असल्याने, आता आम्ही काय चिलखत घालून फिरायचे काय, असा सवाल गळ्याला मांजा कापून गंभीर जखमी झालेल्या सीड इन्फोटेकच्या प्रिया शेंडे यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या प्रश्‍नाने पोलिस आणि महापालिकेसारख्या निगरगट्ट व्यवस्थेसह बेफिकीर समाजालाही अक्षरशः चपराक लगावली आहे.

संबंधित वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा - 
मांजामुळे उडतेय प्राणज्योत!
मांजाचा दोर अन्‌ जिवाला घोर! 
साडेपाचशे पक्ष्यांवर मांजामुळे "संक्रांत'  
पक्ष्यांसाठीही मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा

पुण्यामध्ये ‘सकाळ’च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार, त्यानंतर नाशिक फाट्यावरील उड्डाण पुलावर डॉ. कृपाली निकम या दोन तरुणींचा जीव मांजाने घेतला. त्यानंतर माणसांना जखमी करत मांजाने शेकडो पक्ष्यांचेही जीव घेतले. त्यातच १५ जानेवारीला पुन्हा एकदा मांजाने सीड इन्फोटेक आयटी ट्रेनिंग कंपनीच्या ‘ग्लोबल सर्टिफिकेशन डिव्हिजन’च्या विभाग प्रमुख प्रिया शेंडे यांचा गळा कापला. नातेवाइकांकडे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी शेंडे आपल्या पुतणीसमवेत दुचाकीवरून कोथरूड  परिसरातील डीपी रस्त्याने जात होत्या. तेवढ्यात त्यांच्या गळ्याला काहीतरी काचले. शेंडे यांनी गाडी थांबवून गळ्याला हात लावला, तेव्हा हाताला मांजा लागला आणि त्याबरोबर रक्तस्राव होऊ लागला. त्यांच्या पुतणीने त्यांना तत्काळ रुग्णालयात नेऊन उपचार केल्याने त्या मृत्यूच्या दाढेतून परतल्या. त्यांच्या गळ्याचे टाक्‍यांच्या जखमा अजून ओल्या आहेत. तरीही लोकांनी मांजाचा वापर करून नये, असे त्यांना वाटू लागले आणि या अवस्थेतही त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.

मध्यमवर्गीय कुटुंबातील शेंडे या आईसमवेत कोथरूडमध्ये राहतात. मांजाच्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबालाही धक्का बसला. या घटनेविषयी पोलिस ठाण्यात आपण कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करणार, असा प्रश्‍न शेंडे यांनी उपस्थित केला. ‘‘मांजामुळे कोणाचा तरी जीव नक्कीच जाणार आहे, हा मांजा विक्री करणारा आणि पतंग खेळणाऱ्यांना माहिती असते. तरीही असा मांजा वापरून ते इतरांच्या जिवाशी खेळतात. पूर्वीही पतंग उडविले जायचे, पण ते कोणाचे जीव घेत नव्हते. आताचा मांजा माणसांबरोबरच पशुपक्ष्यांचाही जीव घेत आहे. मांजाने पुण्यात दोघींचा जीव घेतला, माझी दुचाकी वेगात असती तर मांजाने माझाही शिरच्छेद केला असता.’’

आई-वडिलांनी मुलांना समजवावे
मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर पोलिस व महापालिका प्रशासन कधीच कारवाई करणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. आता आई-वडिलांनीच आपल्या मुलांनी मांजा वापरू नये, यासाठी समजून सांगितले पाहिजे. साध्या दोऱ्याचा वापर करून मोकळे मैदान किंवा सुरक्षितस्थळी पतंग उडवावेत. लोकवस्ती, गर्दी व वर्दळीच्या ठिकाणी पतंग उडवू नये, एवढी तरी लोकांनी काळजी घ्यावी, असे भावनिक आवाहन शेंडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com