सिंहगड, प्रतापगडावर वाढला गोंगाट;अतिगर्दीने किल्ले प्रदूषित

सिंहगड, प्रतापगडावर वाढला गोंगाट;अतिगर्दीने किल्ले प्रदूषित

पुणे - पश्‍चिम महाराष्ट्राला किल्ल्यांचा वैभवशाली वारशासह निसर्गाचे सौंदर्य देखील लाभले आहे. पण किल्ल्यांची व्यवस्थित माहिती न मिळणे, पर्यटकांसाठी आवश्‍यक सुविधा नसल्याने अद्यापही अनेक किल्ले पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. सिंहगड, प्रतापगडासारखे किल्ले मात्र अतिगर्दीने प्रदूषित होत आहेत. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्थानिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक धोरण तयार केल्यास त्यातून रोजगार आणि पर्यटन वाढविले पाहिजे असा निष्कर्ष अभ्यासातून समोर आला आहे.

डॉ. वैशाली तळेले यांनी "डेव्हलपमेंट ऑफ हेरिटेज टुरिझम इन वेस्टर्न पार्ट ऑफ इंडिया ए जिऑग्राफिकल स्टडी' याचा अभ्यास करून भूगोल विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली आहे. वैशाली तळेले यांनी प्रत्येक किल्ल्यास अनेक वेळा भेटी दिल्या, त्यामध्ये सिंहगड, तोरणा, प्रतापगड, सज्जनगड हे किल्ले वगळता इतर ठिकाणी पर्यटकांची गर्दी अतिशय कमी आहे. नागरिकांना किल्ल्यांवर पर्यटनासाठी जाण्याची इच्छा आहे, पण त्यांची भौगोलिक, ऐतिहासिक माहिती मिळत नसल्याने व सुविधा नसल्याने त्या दिशेने पाऊले वळत नाहीत. या सुविधा निर्माण केल्या गेल्या तर इतर किल्ले बघण्यासाठी नागरिकांचा कल वाढेल. असे अभ्यासात समोर आले आहे.

वन्य अधिवास कमी झाला
सिंहगडावर पर्यटकांची गर्दी वाढल्याने त्यामुळे गोंगाट तर वाढलाच आहे, पण कचरा, हवा प्रदूषण वाढणे, वन्य प्राण्यांचा अधिवास कमी होणे या समस्या निर्माण झाल्या आहेत. किल्ल्यांवरील वाढती बांधकामे, स्थानिक व्यावसायिकांमधील वाढती स्पर्धा आणि वाद हे टाळायला हवे. प्रतापगडावरही असेच प्रश्‍न निर्माण होत आहेत, असे तळेले यांनी सांगितले.

या किल्ल्यांचा केला अभ्यास
पुणे जिल्ह्यातील तोरणा, जीवधन, सिंहगड, मल्हारगड, भोरगिरी, घनगड, अनघाई, रोहिडा किल्ल्यांचा तर, सातारा जिल्ह्यातील सज्जनगड, पांडवगड, प्रतापगड, वासोटा, महिमानगड, वसंतगड, नांदगिरी आणि वर्धनगड या किल्ल्यांचा अभ्यास केला आहे.

संवर्धनासाठी हे करणे आवश्‍यक
- किल्ले संवर्धनासाठी जवळच्या गावातील नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांना जबाबदारी देणे
- किल्ल्यांवर प्रवेश शुल्क ठेवावे, जमा झालेल्या निधीतून विकास करावा
- किल्ल्यावरील उत्सव, परंपरा यावेळी पर्यटक गडावर यावेत यासाठी प्रयत्न
- किल्ल्यांचा इतिहास पर्यटकांसमोर आला पाहिजे

पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांबाबत पर्यटक म्हणतात
किल्ल्याचा नकाशा व माहितीचा बोर्ड आवश्‍यक - 96.8 टक्के
चांगले रस्ते हवे - 94.04 टक्के
वाहतूक व्यवस्था असावी - 79.2 टक्के
स्वच्छतागृह सुविधा असावी - 79.2 टक्के
कचरा व्यवस्थापन आवश्‍यक - 74.4 टक्के
प्रशिक्षित गाइड आवश्‍यक - 72 टक्‍के

""स्थानिकांच्या सहभागातून किल्ल्यांचा विकास व संवर्धन शक्‍य आहे, तसेच किल्ल्यांवरचा प्रवेश सशुल्क केला पाहिजे. ज्या किल्ल्यांची माहिती कमी आहे, तेथे पर्यटन वाढविण्यासाठी हेरिटेज वॉक प्रमाणे उपक्रम राबविणे आवश्‍यक आहेत. सध्या किल्ल्यांचे जीएसआय मॅपिंग झालेले आहे, पण त्यांची खूप त्रोटक माहिती ऑनलाइन आहे, ती सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.''
- डॉ. वैशाली तळेले, संशोधक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com