तीव्र लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन करा

Dr-Deepak-Mhaiskar
Dr-Deepak-Mhaiskar

पुणे - कोरोनाचे पॉझिटिव्ह असलेले परंतु, तीव्र स्वरूपाची लक्षणे नसलेले सुमारे 40 टक्के रुग्ण शहरातील विविध दाखल आहेत. प्रकृती स्थिर असेल तर, त्यांचे समुपदेशन करून त्यांना होम क्वारंटाईन केल्यास गंभीर रुग्णांसाठी ते बेड उपलब्ध होतील, यासाठी आता या पुढे प्रयत्न करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड 19 रिस्पॉन्सतर्फे समन्वयक सुधीर मेहता यांनी कोरोनाची शहरातील सद्यस्थिती आणि खासगी रुग्णालयांची जबाबदारी, या बाबत आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठकीत डॉ. म्हैसेकर बोलत होते. महापालिका विभागीय कार्यालयातील विशेष अधिकारी सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह शहरातील विविध खासगी रुग्णालयांच्या संचालकांनी बैठकीत भाग घेतला. 

शहरावर कोरोनाचे सावट अजून सुमारे एक वर्ष राहणार असून त्यादृष्टीने खासगी रुग्णालयांनी तयारी केली पाहिजे. तसेच ऑक्सिजनचे बेडस पुरेसे नसून व्हेंटिलेटरचीही संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही यावेळी ठरले. स्मार्ट सिटीच्या डॅश बोर्डवर पुरेसे तपशील अचूकपणे नोंदवावेत, असे आवाहनही या वेळी रुग्णालयांना करण्यात आले. डॉक्टर, परिचारिकांची संख्या वाढविण्यासाठी आरोग्य विद्यापीठ, खासगी परिचारिका महाविद्यालयांशी संपर्क साधला आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. सातारा आणि सोलापूरमध्ये कोरोनाचा मृत्यूदर जास्त आहे त्यामुळेच तेथील रुग्ण पुण्याकडे येत आहेत, असेही सांगितले. तर, खासगी रुग्णालयांकडून जादा दराने आकारणी होत असल्याच्या नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. एका रुग्णालयात सकाळी 9 वाजता रुग्ण दाखल झाला आणि सायंकाळी 5 वाजता त्याला डिस्चार्ज दिला तरी, त्याचे बिल 25 हजार रुपये झाले, असे प्रकार होऊ नयेत, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. शहरात पुरेसे बेडस आहेत परंतु, व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

डॉ. धनंजय केळकर यांनी प्रायव्हेट रुममध्ये आता दोन रुग्ण ठेवण्यास सुरवात केली आहे, तसेच ऑक्सिजन कनेक्शनचीही संख्या वाढविण्यात येत आहे, असे सांगितले. डॉ. परवेझ ग्रॅंट यांनी हिंजवडीतील सुमारे 70 बेडचे रुग्णालय तयार आहे, परंतु, परिचारिकांच्या निवासाचा प्रश्न असून त्यासाठी महापालिकेने मदत करावी, असे सांगितले. 

'या' डॉक्टरांचा सल्ला ऐकाल, तर तुम्हीही व्हाल कोरोनामुक्त

प्रशासनाने सांगितले की.....
- खासगी रुग्णालयांनी किमान 50 बेड हे कोरोनाच्या रुग्णांसाठी आरक्षित करावे 
- रुग्णालयांत आलेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करावेत, त्यांना इतरत्र फिरवू नये 
- कोरोनाच्या रुग्णांसाठीची बेड क्षमता वाढविण्यावर भर द्या 
- राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दरांनुसारच रुग्णांकडून आकारणी करा, जादा पैसे आकारू नका 
- गरीब रुग्णांसाठी आरक्षित असलेले बेडस त्यांना मोफत उपलब्ध करून द्या 

खासगी रुग्णालये म्हणतात
- पुण्यालगतच्या इतर जिल्ह्यांतील रुग्ण मोठ्या संख्येने पुण्यात येत आहेत 
- व्हेंटिलेटरच्या बेडसाठी राज्य सरकारने निश्चित केलेले दर परवडत नाहीत
- परिचारिकांची संख्या कमी आहे, तंत्रज्ञ मनुष्यबळ कमी पडत आहे 
- कोरोनाच्या औषधांचा तुटवडा पडत आहे 
- ग्रामीण भागात ऑक्सिजन कमी पडत आहे 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com