वैदिक आणि श्रमण परंपराच्या समन्वयातून भारत विश्वगुरू होईल : मोरे

Vallabh_Vatika
Vallabh_Vatika

पुणे : वैदिक आणि श्रमण परंपरा या भारतातल्या दोन महत्त्वाच्या परंपरा असून, त्यांच्या समन्वयातूनच भारत विश्वगुरू होईल, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. महावीर जैन विद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या 'वल्लभ निसर्ग वाटिके'चे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

जैन समाजातील शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत आणि पंजाब केसरी या नावानं ओळख असणाऱ्या आचार्य विजय वल्लभ सूरीश्वरजी यांचा 151 व्या  जयंती सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे, महावीर जैन विद्यालयाचे सचिव आणि वाटिकेचे संकल्पक युवराज शहा, 'सरहद'चे संजय नहार, संजय सोनवणी, डॉ. सतिश देसाई, विकास मठकरी, जितेंद्र भुरूक, वर्धमान जैन, विवेक शहा, प्रशांत शहा, विजेंद्र पटणी, शरद शहा, प्रज्ञा शहा, कल्पेश शहा, धनश्री हेबळीकर, अभिजित चौधरी आदी उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, "वैदिक आणि श्रमण परंपरेत अनेकांतवाद महत्त्वाचा धागा आहे. त्यातूनच सगळ्या पैलूंचा समन्वय साधता आला पाहिजे, असा संदेश दिला गेला आहे. हाच धागा पकडून विजय वल्लभ यांनी कार्य केले. त्यांची शैक्षणिक दृष्टी महत्त्वाची होती. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी त्यांची सगळी शक्ती पणाला लावली. फाळणीसारखी घटना घडलेली असतानाही त्यांनी हे काम जोमाने उभे केलं. विरोध होत असतानाही संपूर्ण भारतभरात शिक्षणाचा प्रसार केला. त्यामुळंच लोक त्यांना पंजाब केसरी म्हणू लागले."

दरेकर म्हणाले, "इतिहासातील माणसांकडून पुढच्या पिढीला दिशा मिळते. विजय वल्लभ यांनी पुढची सक्षम आणि विचारी पिढी तयार व्हावी यासाठी शिक्षणाचा प्रचार केला. समाज मानसिकतेच्या विरोधात जाऊन त्यांनी हे काम केले. शिक्षण हा सगळ्याचा पाया आहे. ते मिळाले नाही की पिढी दिशाहीन होण्याचा संभव असतो. शिक्षणाचं कार्य करून जैन समाजाला आचार्य वल्लभ यांनी दिशा दिली आहे.

नहार म्हणाले, आज देश-विदेशात १०० हून जास्त अग्रेसर शैक्षणिक संस्था वल्लभसूरीश्वरजींनी संस्थापित केलेल्या संस्था मौलिक शैक्षणिक योगदान देत आहेत. महावीर जैन विद्यालय हे एक त्याचेच उदाहरण आहे. त्यांनी धार्मिक, सामाजिक आणि तात्विक विषयात महत्त्वपूर्ण लेखन केलं आहे. त्यांचं लेखन समाजाला कायम प्रगतीची दिशा दाखवेल.

वाटिकेची माहिती देताना युवराज शहा म्हणाले, "डेक्कन जिमखान्यावरील महावीर जैन विद्यालयात ही निसर्गरम्य वाटिका निर्माण करण्यात आली असून वल्लभसूरीश्वरजींची आकर्षक संगमरवरी बैठी प्रतिमा प्रस्थापित केली आहे. सभोवताली सुंदर उद्यान तयार करण्यात आले असून पुतळ्याच्या मागे असलेल्या पेशवेकालीन विहिरीवर सुंदर कारंजे उभारण्यात आलेले आहे. ही वाटिका पुण्याच्या वैभवात भरच घालेल."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com