महावितरणच्या वसुलीत थकबाकीदारांची साथ; पण गती संथ

Mahavitaran
Mahavitaran

‘महावितरण’कडे ४७९ कोटी ६४ लाखांचा भरणा; अजून १३८४ कोटी येणे
पुणे - पश्चिम महाराष्ट्रातील चार लाख घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी गेल्या महिन्याभरात ४७९ कोटी ६४ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. मात्र, अद्यापही याच वर्गवारीतील तब्बल २३ लाख ७० हजार ७०० ग्राहकांकडे १३८४ कोटी ५७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई राहणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. 

१५ फेब्रुवारीपर्यंत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात २७ लाख ७२ हजार ३६० घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे १८६४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी होती. १५ मार्चपर्यंत ४ लाख १ हजार ७०० थकबाकीदारांनी ४७९ कोटी ६४ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख ५२ हजार ३८० घरगुती ग्राहकांनी ३०३ कोटी ३७ लाख, ४१ हजार ६२० वाणिज्यिक ग्राहकांनी १२० कोटी ४० लाख तर ७६६० औद्योगिक ग्राहकांनी ५५ कोटी ५६ लाखांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हानिहाय ग्राहक व थकबाकी
थकबाकीचा भरणा होत असला तरी अद्यापही घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल २३ लाख ७० हजार ७०० ग्राहकांकडे १३८४ कोटी ५७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा (१०,७५,६२६) - ७३८ कोटी १३ लाख, सातारा (२,१३,२८५)- ७५ कोटी ३३ लाख, सोलापूर (३,४०,२१८) - १७८ कोटी ६५, सांगली (२,७९,३४०)- १३६ कोटी ४७ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात (४,६२,२२५) - २५५ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरून सहकार्य करावे असे आवाहन प्रादेशिक संचालक  अंकुश नाळे यांनी केले आहे.

आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील ८० हजार ५९१ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये पुणे- ५४०३४, कोल्हापूर- ४३४१, सांगली- ४३४२, सोलापूर - ८१३८ व सातारा जिल्ह्यातील ९७३६ थकबाकीदारांचा समावेश आहे. नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यानंतर वेगवेगळ्या पथकांद्वारे वीजजोडण्यांची तपासणी सुरु आहे. यामध्ये थकीत रक्कम न भरता आजूबाजूच्या मीटरमधून किंवा अन्य प्रकारे परस्पर वीजपुरवठा घेतल्यास वीजचोरीचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

सुटीच्या दिवशी वीजबिल भरणा सुरू
चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च महिन्यातील सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाइट, मोबाईल अॅप किंवा इतर ऑनलाइन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com