'हिंमत असेल तर शिवसेनेने भाजप आमदार, खासदारांच्या घरासमोर ढोल वाजवावेत'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

'शिवसेनेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी कर्जमाफीसाठी जिल्हा बॅंकेसमोर ढोल वाजविण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर ढोल वाजवावेत', असे आव्हान नेवाळे यांनी दिले आहे.

टाकवे बुद्रुक (जि. पुणे) : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हा बॅंकेसमोर ढोल वाजवित आंदोलन केले. या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे. 'शिवसेनेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी कर्जमाफीसाठी जिल्हा बॅंकेसमोर ढोल वाजविण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर ढोल वाजवावेत', असे आव्हान नेवाळे यांनी दिले आहे.

नेवाळे म्हणाले, 'सध्याच्या सरकारमधील भाजप आणि शिवसेनेमध्ये कोणत्याही प्रकारचा मेळ नाही. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी लोकप्रिय योजनांची घोषणा केली जात आहे. या सरकारने प्रसिद्धीचा मोह टाळावा. राज्यातील जास्तीत जास्त जिल्हा बॅंकांवर कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. तरीही कर्जमाफी हा शासनाचा निर्णय आहे. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी शासनाची आहे. शिवसेनेने सत्तेत राहून विरोधकांसारखे रस्त्यावर उतरण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवायला प्राधान्य द्यावे.'

राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. दरम्यान कर्जमाफीचे श्रेय लाटण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. भाजपने मोठमोठाले बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केल्याचा दावा केला आहे. मात्र, अद्याप जिल्हा बॅंकांना त्या संदर्भात कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. जिल्हा बॅंक तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना शून्य टक्‍क्‍यांनी कर्ज पुरवठा करते. शासनाने कर्जमाफीचा निर्णय घोषित केल्यावर जिल्हा बॅंकेने लाभ मिळू शकणाऱ्या शेतकऱ्यांची यादी पाच वेळा शासनाला सादर केली आहे.

■ ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: marathi news sakal news bjp shivsena news nevale