मोदी, शहा हे आरएसएस'चे दलाल; कोळसे पाटलांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

  • माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांची सीएएविरोधी महासभेत टीका

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दलाल तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना भारताचा मुख्य शत्रू आहे. शिवाय मोदी, शहा हे हिटलरपेक्षाही क्रूर राजकारणी आहेत. त्यातूनच ही जोडी देशासाठी घातक ठरणारे निर्णय घेऊ लागले आहेत. सीएए, एनपीआर आणि एनसीआर हा त्यांच्या कटकारस्थानाचाच एक भाग असल्याची टीका माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी गुरुवारी (ता.30) पुण्यात एका जाहीर सभेत बोलताना केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संविधान बचाओ मंच आणि कुल जमाएत-ए-तंजीम यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता.30) पुण्यात एनपीआर, एनआरसी, सीएएविरोधी महासभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानावरून कोळसे पाटील बोलत होते. यावेळी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी, सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, मानव अधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, मुन्नवर कुरेशी, जाहिदभाई, अभय छाजेड, प्रा. सुषमा अंधारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

तर आम्ही उपाशी राहू; चहातील भेसळीवर येवलेंचा खुलासा

ते म्हणाले, "सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात निकराचा लढा दिला होता. गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयोगासमोर मोदी, शहा हे खुनी असल्याने, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. एवढेच नव्हे या दोघांना कोणत्याही संविधानिक पदावर नियुक्त केले जाऊ नये, अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यांचा मुस्लिम तो बहाणा है, दलित-आदिवासी निशाणा है. तरीसुद्धा या दोघांचे मी आभार मानतो. कारण गेल्या 70 वर्षांपासून दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसींना एकत्र करण्याचे काम केले जात आहे. परंतु हे सर्व घटक एकत्र येण्यात अडचण येत होती. आता सीएए कायद्याला विरोध करण्याच्या उद्देशाने हे सर्व समाजघटक तन-मनाने एकत्र आले आहेत.''

भारतात कोरोना विषाणूचा पहिला बळी; केरळमध्ये आढळला रुग्ण

श्रीराम घरात ठेवा - मेवानी
गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी त्यांच्या भाषणात मोदी, शहाचा उल्लेख रंगा-बिलाची जोडी असा केला. सीएए हा कायदा हिंदू किंवा मुस्लिमांच्या नव्हे तर, तमाम भारतीय नागरिकांच्या विरोधातील आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी केले जाणारे जनआंदोलन ही देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई ठरणार आहे. या कायद्याला जात-पात किंवा धर्माच्या आधारावर विरोध करून चालणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने भारतीय नागरिक म्हणून रस्त्यावर उतरले तर नक्कीच यश मिळणार आहे. ही लढाई भाजप विरुद्ध 130 कोटी भारतीय नागरिक अशी आहे. त्यामुळे तुमचे जय श्रीराम घरात ठेवा, त्यांना रस्त्यावर आणू नका, असा सल्ला गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी यावेळी दिला. या रंगा-बिलाच्या जोडीला घरी पाठवणार, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi, Shah are RSS workers says kolse Patil in Pune