राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, सत्तेचा मद चढायला नको... 

ncp
ncp

सोमेश्‍वरनगर (पुणे) : पांढरेफेक कपडे, डोळ्याला गॉगल, गळ्यात चेन, बोटात अंगठ्या, बसायला स्कॉर्पिओ आणि बोलण्यात मुजोरी...अशी सन 2014-15 पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याची प्रतिमा झाली होती. पक्ष सामान्य माणसांपासून दुरावला होता. त्यावेळी लोकसभा- विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे पानिपत हे महायुतीच्या कर्तुत्वापेक्षा पक्षाच्या तेव्हाच्या प्रतिमेनेच झाले. या पराभवाने पक्षनेतृत्व आणि कार्यकर्तेही जमीनीवर आले. पक्षानेही अंतर्बाह्य बदल करत सामान्य माणसाला आपलेसे करायला सुरवात केली आहे. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा- लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षातील अनेक बडे नेते पक्ष सोडून गेले. राष्ट्रवादीसाठी ही सत्तेची नव्हे, तर अस्तित्वाची लढाई होती. परंतु, शरद पवार नावाचा जनतेची नाडी माहित असणारा भिष्माचार्य होता. त्यांनी थेट तरुणाईला हाक घातली. शेतकरी, महिलांना आपलेसे केले. साध्या घरातून आलेले नव्या दमाचे नेते व्यासपीठावर आणले. डोळ्यासमोर पराभव स्पष्ट दिसत असतानाही हा वयोवृद्ध योद्धा भर पावसात रणांगण गाजवत दिल्लीकरांशी दोन हात करत आहे, हे समस्त महाराष्ट्राने अनुभवले. त्यामुळे अपेक्षा नसताना राष्ट्रवादी सिंहासनावर पोचली. एवढेच नव्हे, तर देशाच्या राजकारणाला नवी दिशा राष्ट्रवादीने दिली. त्यामुळे केवळ राष्ट्रवादीच्याच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात मागील वर्ष अविस्मरणीय राहणार आहे. 

पक्षाच्या स्थापनेनंतर लगेचच सत्तेचा वाटा चाखणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सन 2014 मधील लोकसभेच्या निवडणुकीत अवघ्या चार, तर विधानसभेला अवघ्या 41 जागा मिळाल्या. सतत सत्तेत असलेल्या आणि घराणेशाहीचा ठपका असलेल्या या पक्षाला वाळू, खाण, बिल्डींग, कंत्राटदार, पुरवठादार या क्षेत्रातील मांदियाळीने ग्रासले होते. सामान्य माणसाला, नव्या युवकाला राष्ट्रवादी आपलासा वाटत नव्हता. राष्ट्रवादीने विकास केला होता, पण त्याच पक्षाने यशंवतराव, शरद पवार यांची आपुलकी बाजूला ठेवली होती. जनतेने सत्तेतून बाजूला केल्यावर पक्षाच्या बड्या नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप झाले. काहींना तुरुंगाच्या वाऱ्याही खाव्या लागल्या. पक्षात घुसलेल्या अपप्रवृत्ती, बडे कंत्राटदार, उद्योजक एकेक करत सत्तेच्या वळचणीला जाऊन पोचल्या. भाजपनेही अनेकांचे शुद्धीकरण करून आयात केले. चौकशांचा ससेमीरा लागल्याने विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस- राष्ट्रवादीला जोरदार भूमिकाही बजावता आली नव्हती. 

या परिस्थितीत राष्ट्रवादीची भाषा मवाळ झाली अन्‌ दुसरीकडे भाजपची भाषा मुजोर होत गेली. राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांची प्रतिमा बदलली. मागास घटकातील नेत्यांना आवर्जून बळ दिले. महिलांचे नवनवे नेतृत्व पुढे आणण्याची चालही खेळली. वक्तृत्वाची देणगी लाभलेले सामान्य घरातले तरूण- तरूणी थेट शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत व्यासपीठ गाजवताना महाराष्ट्र पाहू लागला. मात्र, देशात सुरू असलेल्या मोदी लाटेत पक्षाचा टिकाव लागणार नाही, हेही निश्‍चित वाटू लागले होते. त्यामुळे राज्यातील बडे नेते पवारांच्या विचारांशी काडीमोड घेत मोदी- शहांच्या व्यासपीठावर "मोहित' झाले. मागील वर्षातल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे पुन्हा पानिपत केले. राष्ट्रवादीने कशाबशा चार जागा टिकवून ठेवल्या. पक्षाच्या 21व्या वर्धापनदिनानंतर आलेल्या विधानसभा निवडणुका मात्र राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी देऊन गेल्या. याचे कारण राष्ट्रवादीने खेळलेल्या चाली, दाखविलेली लढाऊ वृत्ती आणि तरूणाईची मिळालेली साथ. त्यामुळे 22 वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही राष्ट्रवादीसाठी दिलासादायक वाटला असेल, हे निश्‍चित. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधून दररोज एकेक मोहरा भाजपने टीपून महाभरती केली. आधीच मोदी लाट, त्यात निवडून येण्याची क्षमता असलेले शिलेदार सोडून गेले. त्यामुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला. कॉंग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने आज ना उद्या उभारी घेऊ शकतो, मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी संपला, तर कायमचा संपेल, अशी भिती व्यक्त होत होती. पण, जनतेला भाजपची महाभरती, आयाराम- गयाराम पसंत पडले नाही. शरद पवार यांना एकटे पाडण्याची आणि त्यांच्याविरूद्ध केंद्रातली आणि राज्यातली सगळी फौज उतरविण्याची चाल बूमरॅंग झाली. "इडी'च्या चौकशीतही पवारांनी सगळे फासे उलटे फिरविले. पवार जितके एकटे पडत गेले, जनतेला तितकी त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत केली. 

विधासभेचा विजय स्वप्नवत 
जनतेचा मूड शरद पवार यांनी ओळखला होता. सगळे काही हरलेय, असे वाटत असतानाच उरले सुरले शिलेदार घेऊन शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी आपले मतदारसंघ सोडून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, धनंजय मुंडे यांच्या तोफा धडाडत होत्या. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे यांनी शिकस्त केली. "शरद पवार यांनी पन्नास वर्षात काय केले?' असा सवाल सोलापुरात विचारणाऱ्या मोदी- शहांना सोलापुरात जाऊन शरद पवार यांनी उत्तर दिले. त्या सभेपासून शेवटपर्यंत गर्दीचा उच्चांक मोडत गेला. विशेष म्हणजे तरूणाई राष्ट्रवादीच्या पाठीशी उभी राहिली. भाजपच्या डिजिटल आक्रमणाला तोंड देताना राष्ट्रवादीनेही डिजिटल माध्यमाचा भरपूर वापर केला. साताऱ्यातील पावसातील सभेने राज्यात नव्हे, तर देशात इतिहास घडविला. त्यामुळे राष्ट्रवादी संपली, असे वाटत असतानाच राष्ट्रवादीने प्रचंड उसळी घेतली. फडणवीस- पाटील यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादी मिळून चाळीस जागा धरल्या होत्या. 220 ची हवा केली होती. परंतु, एकट्या राष्ट्रवादीने 54 जागा जिंकून स्वप्नवत विजय प्राप्त केला. त्यानंतर राजकीय घडामोडींनी संपूर्ण देश हलला आणि महाआघाडी असित्वात आली. शरद पवार यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत या सगळ्यांचा मेळ घालून, राजकीय कौशल्य पणाला लावून स्वप्नातही वाटली नव्हती, अशी त्रिकोणी सत्ता स्थापन केली. यानंतर हरियाणातील निवडणुकीत भाजपची पुरती दमछाक झाली. तेलंगणमध्येही सत्तेच्या जवळही जाता आले नाही. झारखंड राज्यातील निवडणुका तर भाजपाने हातच्या घालविल्या. तेथील नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शरद पवार यांच्यामुळे प्रेरणा मिळाली, असे स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या लढाईने देशातील राजकारणाला दिशा दिल्याचे बोलले जाते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सरंजामी वृत्ती घातक 
राष्ट्रवादीचा आजचा वर्धापनदिन हा ऐतिहासिक ठरला असता. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो साधेपणाने साजरा होत आहे. "हाच साधेपणा अंगी बाळगावा, लोकांमध्ये जाऊन कामे करा, तरूणाईशी जवळीक करा, पुस्तके वाचा,' असा सल्ला पवार यांनी आपल्या आमदारांना दिला आहे. बडे मोहरे गळाल्याने नव्या दमाचे, तरूण नेतृत्व पुढे आणण्यास पक्षाला संधी मिळाली. दुसऱ्या फळीत अडकून पडलेले नेतेही पुढे आले. त्यामुळे पक्षाची प्रतिमा कमालीची सुधारली आहे. आणखी महत्वाचे म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख टिकवून ठेवण्यासाठीही राष्ट्रवादीने मागील वर्षात जे योगदान दिले, ते निश्‍चितच राज्याच्या स्मरणात राहिल. त्यानंतरही राष्ट्रवादीपुढे अजूनही आव्हाने आहेत. सत्तेत पोचले म्हणून गाफील राहून चालणार नाही. सत्ता ही तीन पायांची शर्यत आहे, याचे भान ठेवावे लागणार आहे. तसेच, अजूनही पक्षातील सगळी सरंजामी वृत्ती संपली आहे, असे म्हणता येणार नाही. गावोगाव उभे राहिलेले साखर, दूध, वाळू क्षेत्रातील सम्राट यांना माणसांत ठेवण्याचे काम पक्षाला करावे लागणार आहे. कारण, सत्तेचा मद चढणे फारसे अवघड नसते. 

सामान्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे 
विकासकामांबाबत राष्ट्रवादीला कुणी सल्ला देण्याची गरज नाही. परंतु, सामान्य जनता रोज ज्या समस्यांनी त्रस्त असते, त्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. उंच इमारती, मेट्रो, ट्रेन, स्मार्ट सिटी यावर नव्हे, तर मला वीज कंपनीत कनेक्‍शन मिळत नाही, तलाठी इकरार नोंदवत नाही, रेशन कार्ड फोडून मिळत नाही, या त्यांच्या समस्या असतात, हे आता समजून घ्यावे लागणार आहे. वीज कंपनी, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, तहसील कचेरी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी विभाग, भूमी अभिलेख व पोलिस अशाच ठिकाणी सामान्य माणसाची लूट होते. लोकांचा रागही तिथेच वाढत जातो. त्याला आळा घालावा लागणार आहे. तालुकानिहाय जनता दरबार घेता येतात का, ते पहावे लागेल. पक्षाची "मराठा' ही असलेली ओळख मिटवावी लागणार आहे. महिलांचे, तरुणांचे नवनवे नेतृत्व पुढे आणावे लागेल. विचारवंत, साहित्यिक, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही पुन्हा जवळीक वाढवावी लागेल. पक्षाच्या विजयात त्यांनी केलेली वैचारिक घुसळणही तितकीच उपयुक्त होती, हे विसरून चालणार नाही. याबाबत पक्षाचे थिंक टॅंक नक्कीच विचार करतील! 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com