वैद्यकी प्रवेशाचा आनंद; आता पेपर खरेदीचा आरोप

वैद्यकी प्रवेशाचा आनंद; आता पेपर खरेदीचा आरोप
Published on

जयपूर, ता.१४ (वृत्तसंस्था) ः राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा(नीट) २०२६चा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात राजस्थानमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी ज्या कुटुंबातील पाच मुलांची सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससाठी निवड झाली होती, त्याच कुटुंबावर यंदा मुलासाठी पैसे देऊन ‘नीट’चा पेपर खरेदी केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘सीबीआय’ आणि राजस्थानच्या विशेष कृती गटाच्या (एसओजी) तपासात जमवा रामगड येथील बिवाल कुटुंबाचे अनेक वर्षांपासून वैद्यकीय प्रवेश परीक्षा व्यवस्थेशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तपास केवळ यंदाच्या पेपरफुटीपुरता मर्यादित न राहता मागील काही वर्षांतील निवड आणि प्रक्रियेचाही शोध घेतला जात आहे.

पाच मुलांची वैद्यकीसाठी निवड
सोशल मीडियावर ६ नोव्हेंबर २०२५ रोजी केलेली पोस्ट आता तपास यंत्रणांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरत आहे. या पोस्टमध्ये दिनेश बिवाल यांनी त्यांच्या कुटुंबातील पाच मुलांची सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निवड झाल्याचा आनंद व्यक्त केला होता. त्या वेळी या कुटुंबाची परिसरात मोठी चर्चा झाली होती आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवलेले कुटुंब, असा गौरव करण्यात आला होता. मात्र आता त्याच पोस्टमुळे संशय निर्माण झाला आहे. ‘एसओजी’च्या सूत्रांच्या माहितीनुसार, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल आणि एमबीबीएस विद्यार्थी विकास बिवाल यांना नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आली असून, तिघांनाही ‘सीबीआय’ने दिल्लीला नेले आहे.
तपासात असे समोर आले आहे की, मागील वर्षी बिवाल कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांची सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निवड झाली होती. मांगीलाल बिवाल यांचा मुलगा विकास बिवाल याला सवाई माधोपूर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. मुलगी प्रगतीला दौसा वैद्यकीय महाविद्यालयात तर दुसरे भाऊ घनश्याम बिवाल यांची मुलगी पलक हिची जयपूरच्या एसएमएस वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली.
दुसरी मुलगी सानियाला मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला.

मुलासाठी ३० लाखांत पेपर खरेदी
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, दिनेश बिवाल यांचा मुलगा ऋषी बिवाल यंदा ‘नीट’ परीक्षा देत होता. त्याच्यासाठी त्यांनी सुमारे ३० लाख रुपयांत प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या मते, गुरुग्राममधून प्रश्नपत्रिका आणली होती आणि नंतर ती सीकरमधील इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. ही प्रश्‍नपत्रिका ऋषी बिवाल इतर विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांत विकत होता, असही तपासात समोर आले आहे. तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.


‘‘समाजात नैतिकता असती तर ‘नीट’सारख्या राष्ट्रीय परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली नसती. रामराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर न्याय आणि नैतिक मूल्यांवर आधारित समाज आहे. देशात पारदर्शकता आणि नैतिकतेची सर्वाधिक गरज आहे.’’
हरिभाऊ बागडे, राज्यपाल, राजस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com